कोरोना: मुलांचा स्क्रीनटाइम किती असावा?

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

माझ्या मुलांनी अॅंटीग्लेअर चष्मा वापरावा की नाही?

माझ्या मुलीच्या डोळ्यांची जळजळ होते आणि तिचे डोळे लाल होतात.

माझ्या मुलाला आजकाल डोकेदुखीचा त्रास होत आहे.

हे काही प्रश्न आहेत ज्यांचा सामना पालकांना गेल्या काही दिवसांपासून करावा लागत आहे. याचं कारण आहे ते म्हणजे त्यांच्या मुलांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. त्यांचा जास्त वेळ हा लॅपटॉप किंवा मोबाइल स्क्रीनवर जात आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होत आहे.

दिल्लीत राहणाऱ्या शर्मिला यांची मुली आयुषी सहावीत शिकत आहे.

ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यापासून आयुषी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत लॅपटॉपवरच असते. त्यामुळे तिला पाठदुखी, कंबरदुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊ लागली आहे.

शर्मिला सांगतात, जी गोष्ट पाहू नका किंवा वापरू नका म्हणून आम्ही मुलांना सांगत होतो आता तीच गोष्ट त्यांच्या हातात द्यावी लागत आहे. माझ्या मुलाचे दिवसभरात तीन चार क्लास असतात. क्लासच्या वेळी ती खुर्चीवर बसलेली असते आणि नंतर ती बेडवर बसून किंवा लोळत पडून लॅपटॉप वापरते.

क्लास संपल्यावर रिलॅक्स होण्यासाठी ती लॅपटॉपवर थोडं काही पाहते. या सर्व गोष्टींमुळे गेल्या महिन्यात तिला त्रास होऊ लागला. त्यानंतर मी तिच्या रूटीनमध्ये बदल केला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाबाबत काही गाईडलाइन्स दिल्या आहेत. सरकारने प्रज्ञाता नावाने काढलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मुलांच्या ऑनलाईन क्लासेची वेळ आणि स्क्रीनचा वापर किती असावा याबाबत सूचना दिल्या आहेत.

  • प्री - प्रायमरी - मुलांना ऑनलाईन क्लासेस नाहीत. फक्त त्यांच्या पालकांसाठी एक सेशन होईल.
  • पहिली ते आठवी - रोज 30 ते 45 मिनिटांचे दोन क्लासेस.
  • नववी ते बारावी - रोज 30 ते 45 मिनिटांचे चार क्लासेस.

या गाईडलाईन्समध्ये आई-वडिलांसाठी देखील भरपूर सूचना आहेत. इंटरनेटचा वापर कसा करावा तसेच नव्या परस्थितीमध्ये मुलांना कसं सामावून घ्यावं याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वेळोवेळी ब्रेक घेणे आणि ऑफलाइन खेळ खेळणे तसेच आई-वडिलांच्या देखरेखीखाली क्लास घेणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्रालयानेच मार्गदर्शक तत्त्वं काढल्यानंतर यावरील चर्चा आणखी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर, मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित असणे किती महत्त्वाचं आहे, हे आपण पाहू. त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेसच्या वेळी कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवणं अपेक्षित आहे, हेसुद्धा पाहू.

स्क्रीनटाइम म्हणजे काय?

स्क्रीनटाइम म्हणजे तुमचं मूल 24 तासांमध्ये किती काळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेट सारख्या गॅजेटसचा वापर करतं.

'अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स'ने लहान मुलांच्या स्क्रीनटाइम संबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की 18 महिन्यांपेक्षा लहान मुलांना या गॅजेटसचा वापर करू देऊ नये.

18 ते 24 महिन्याच्या काळात आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना उच्च गुणवत्ता असलेलेच कार्यक्रम दाखवावेत.

2 ते 5 वर्षांच्या मुलांना एका तासापेक्षा जास्तवेळ हे गॅजेट्स वापरू देऊ नयेत.

सहा वर्षं आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांचा स्क्रीन वापराबाबत वेळ निश्चित असावा. त्याचबरोबर त्यांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेसा वेळ असावा.

पण प्रत्यक्षात असं दिसत आहे की मुलांना क्लाससाठी तर लॅपटॉप वापरावाच लागत आहे पण त्यांना असाइनमेंट, रिसर्च आणि मनोरंजनासाठी देखील मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करावा लागत आहे. यामुळे अर्थातच त्यांचा स्क्रीनटाइम वाढला आहे.

स्क्रीन टाइमचा मुलांवर परिणाम

गुरुग्राम येथील फोर्टीस रुग्णालयातील नेत्रविज्ञान विभागाच्या संचालक डॉ. अनिता सेठी सांगतात की आजकाल अनेक पालक आपल्या मुलांच्या डोळ्यांच्या समस्या घेऊन येत आहेत. अॅंटीग्लेअर चष्मे वापरावेत का? असं ते विचारत आहेत. अशावेळी स्क्रीनटाइम कमी करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे असं त्या सांगतात.

जास्त काळ स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढते, टीव्ही किंवा लॅपटॉप जवळून पाहिल्यामुळे डोळ्यांवर तणाव येतो, डोळ्यांवर सूज येणे, जळजळ होणे, डोळे कोरडे होणं. या गोष्टींमुळे मुलांची दृष्टी अशक्त होऊ शकते आणि ज्यांना आधीपासूनच चष्मा आहे त्यांचा नंबर वाढू शकतो.

डॉ. अनिता सांगतात की डोळ्यांबरोबरच पाठ आणि कंबरेची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्यावं.

बसण्याची स्थिती- लॅपटॉप किंवा फोन लोळून वापरू नका. खुर्ची आणि टेबलचा वापर करा. लॅपटॉप आणि फोनची उंची डोळ्यांच्या समांतर असायला हवी.

स्क्रीन 33 सेमी दूर असायला हवी. मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये काही विशेष फरक नसतो. त्यामुळे दोन्हींचा वापर करताना त्यांना स्टॅंडवर एका लेव्हलवर ठेवावे.

प्रकाश - काही मुलं लाईट बंद करून लॅपटॉप किंवा मोबाईल चालवतात. लक्षात ठेवा पुरेशा उजेडातच त्यांना या गोष्टींचा वापर करू द्यावा.

ब्रेक घेणं आवश्यक आहे- मुलं थोडी मोठी असली की त्यांना क्लास व्यतिरिक्तही लॅपटॉप आणि मोबाईल वापरावा लागतो. त्यामुळे त्यांनी अधूनमधून ब्रेक घ्यावा. काही वेळासाठी डोळे मिटून बसावे त्यानंतर दूरची वस्तू पाहिली तर डोळ्यांना आराम मिळतो.

अॅंटीग्लेअर चष्मा - ज्या मुलांचा खूप वेळ स्क्रीनवर जातो त्यांनी अॅंटीग्लेअर चष्मा वापरावा. पण योग्य उपाय हाच आहे की स्क्रीन टाइम कमी करणे.

जास्त वेळ बसून राहिल्यामुळे वजन वाढू शकतं आणि शिथिलता येऊ शकते त्यामुळे थोडा व्यायाम करणं देखील आवश्यक आहे.

मुलांवर होणारा मानसिक परिणाम

स्क्रीनटाइम वाढल्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो असं सफदरजंग हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज कुमार सांगतात. ते सांगतात काही अभ्यासांनुसार, मुलांनी सहा सात तासाहून अधिक स्क्रीनचा वापर केला तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये प्रमुख आहे आत्मसंयमाचा अभाव, जिज्ञासेचा अभाव, भावनात्मकदृष्ट्या अस्थिर राहणे, मित्र न बनवता येणे अशा गोष्टी होऊ शकतात.

अर्थात हे यावरही अवलंबून आहे की तुम्ही स्क्रीनवर काय पाहत आहात. स्क्रीनवर तुम्ही पिक्चर पाहात आहात, सोशल मीडिया पाहात आहात की काही वाचत आहात. यानुसार प्रत्येक मुलावर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो.

मोबाईल आणि लॅपटॉपच्या जास्त वापरामुळे मुलांच्या सवयी बदलू शकतात. शैक्षणिक गोष्टींमुळे त्यांचा व्हॉट्सअॅप आणि व्हीडिओचा वापर देखील वाढला आहे.

शर्मिला सांगतात की त्यांच्या मुलीने कुणाला न सांगताच लहान मुलांचे चॅनेल सबस्क्राइब केले आणि ती पाहू लागली. तसेच सतत हेडफोन लावून ते कार्यक्रम ऐकत असे. मग मी तिला स्पीकरवरच ऐक असा आग्रह केला. तिचं रूटीन बदललं. ती आता सायकलिंग आणि योगासनंही नियमित करत आहे. यामुळे आयुषीला खूप फायदा झाला.

फोन आणि लॅपटॉपची सवय भविष्यात त्रासदायक ठरू शकते असं डॉ. पंकज कुमार यांना वाटतं. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा त्यांच्या या सवयी बदलण्यात खूप वेळ जाईल. हायपरअॅक्टिव्ह डिसॉर्डर, डिप्रेशन आणि सोशल अँग्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे आकर्षित होतात.

या गोष्टींवर लक्ष ठेवावं असा सल्ला पंकज कुमार देतात.

  • मुलांवर लक्ष ठेवता येईल अशा जागी कॉम्प्युटर ठेवावा.
  • हेडफोनऐवजी स्पीकर वापरण्यास सांगावं.
  • मुलांना स्पष्ट सूचना दिल्या तरच ते त्या सुचनेनुसार तसं वागतात. केव्हा आणि कधी लॅपटॉप मिळेल हे त्यांना सांगावं.
  • त्यांच्याकडून व्यायाम करवून घ्यावा.
  • स्क्रीनटाइम मोजणारे अॅप असतात. ते डाऊनलोड करावेत आणि त्यावर हे देखील कळतं की कोणत्या अॅक्टिव्हिटीसाठी किती वेळ देण्यात आला आहे.

लहान मुलांचं आरोग्य आणि अभ्यासक्रम

यावेळी शाळांसमोर दुहेरी आव्हान आहे. एकाबाजूने त्यांना त्यांचा अभ्यासक्रमही संपवायचा आहे आणि दुसरीकडे त्यांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवायचं आहे.

अशा वेळी सरकारने दिलेली नियमावली फायदेशीर ठरू शकते.

दिल्लीच्या जहांगीरपूरच्या के ब्लॉकमध्ये असलेलं गवर्नमेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूलच्या प्रमुख बेला जैन म्हणतात की स्क्रीनटाइम करण्याची दोन तीन कारणं होती.

पहिलं कारण म्हणजे पालकांचे फोन येत असत आणि ते सांगत की मुलांचं लॅपटॉपवर बसणं वाढलं आहे आणि ते कुणासोबत मिसळत नाहीत. काही कुटुंबं अशी आहेत ज्यांच्याकडे एकच मोबाईल आणि शिकणारी मुलं जास्त आहे. क्लासेस कमी झाल्यावर सर्वांना संधी मिळेल.

यामुळे शिक्षकांना देखील थोडीशी उसंत मिळेल. कारण सातत्याने ते देखील स्क्रीनवरच असत. आता वेळ अधिक मिळाल्यावर त्यांना अधिक विचार करता येईल.

ग्रेटर नोएडातील सर्वोत्तम इंटरनॅशल स्कूलच्या संचालक प्रिन्सिपल डॉ. प्रियंका मेहता सांगतात की या नियमावलीमुळे स्पष्टता आली आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या आव्हानाबद्दल त्या सांगतात, सर्वांनी हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की या कठीण काळात शिक्षण सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण गोष्टी सुटता कामा नयेत याची आम्ही काळजी घेत आहोत.

आम्हाला हे देखील पाहावं लागत आहे की कोणत्या मुलाला काय शिकवायचं आहे आणि त्या मुलाचे पालक त्याला कोणत्या सुविधा देऊ शकतात. त्यांनी सांगितलं की सीबीएसई शाळेत पाचवी पर्यंतचा सिलॅबस आम्ही ठरवू शकतो. याबरोबरच हे देखील सांगितलं जात आहे की ऐच्छिक कॅलेंडरही फॉलो करा.

नॅशनल करिकुलम फ्रेमवर्कमध्ये हे देखील सांगण्यात आलं आहे की कोणत्या वयापर्यंत मुलाला काय येणं आवश्यक आहे. प्रत्येकवेळी एका टॉपिकसाठी 10-12 पानं शिकवली जावीत हे आवश्यक नाही. हेच टॉपिक लहान-लहान तुकडे करूनही शिकवता येतात. शिक्षकदेखील तसा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)