कोरोनातून बरं व्हायला रुग्णाला नेमका किती वेळ लागतो?

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी

कोरोनाच्या बाधेतून आता जगभरात जवळपास 2 कोटी 83 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर हे आकडे सतत वाढत आहेत. परंतु, प्रत्येक रुग्णाला हे शक्य होताना दिसत नाहीये. जगभरात आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झालाय.

भारतात आतापर्यंत 38 लाखांपेक्षा अधिक व्यक्ती कोव्हिड 19 मधून बऱ्या झाल्या आहेत. राज्यातला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 70 दिवसांवर गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 10,77,374 एवढी झाली आहे, तर देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने 49 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

कोव्हिड-19 आजारातून बरं होण्यासाठी लागणारा कालावधी हा रुग्ण किती गंभीर आजारी आहे यावर अवलंबून आहे. काही लोक यातून लवकर बरे होतात तर काही लोकांना यातून बरं व्हायला वेळ लागतो.

रुग्णाचं वय, लिंग आणि इतर आरोग्याच्या तक्रारी यांवर कोव्हिड-19 आजाराचं गांभीर्य प्रामुख्याने अवलंबून आहे.

यासोबतच लक्षणं आढळल्यानंतर रुग्णांनी त्वरित डॉक्टर्सशी संपर्क साधावा, असं आवाहनही करण्यात येतंय. कारण जितक्या लवकर उपचार सुरू होतील, त्याचा त्या रुग्णाला फायदा होण्याची शक्यता असते.

उपचारांना प्रतिसाद द्यायला रुग्णाला जितका वेळ लागेल तितका रुग्ण बरा होण्याचा कालावधी वाढेल. उपचारांना त्वरित प्रतिसाद देणारे रुग्ण यातून बरेही झाले आहेत. पण, त्यासाठी रुग्णांना बरेच प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कोणत्या स्वरुपाचे आहेत हेच आपण आता पाहुयात.

कोरोनाची सौम्य लक्षणं असली तर काय कराल?

ज्यांना-ज्यांना कोरोनाची बाधा होते त्यांना खोकला आणि ताप ही प्रमुख लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर अंगदुखी, थकवा, घसा दुखणे, डोकंदुखी यासारखी लक्षणंही त्यांच्यात आढळतात. यात खोकला बऱ्याचदा कोरडा असतो. मात्र, काही जणांना खोकल्यानंतर कफही पडतो. या कफमध्ये व्हायरसमुळे फुप्फुसात मेलेल्या पेशीही असतात.

या लक्षणांवर आराम, नारळ पाणी, फळांचा रस, पाणी आणि पॅरासिटमॉल गोळी यांसारखे घरगुती उपाय करून उपचार करता येतात.

कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्यांवर हे उपाय केले तर त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होते. यातला ताप हा आठवडाभरात बरा होतो. फक्त खोकला बरा व्हायला जास्त कालावधी लागू शकतो. WHO ने केलेल्या संशोधनानुसार हा खोकला बरा व्हायला दोन आठवड्यांहून जास्तीचा कालावधी लागतो.

कोरोनाची गंभीर लक्षणं असली तर?

काही जणांसाठी कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं त्रासदायक ठरू शकतात. व्हायरसचा संसर्ग झाल्यापासून 7 ते 10 दिवसांत ही गंभीर लक्षणं दिसून येतात आणि तेव्हा रुग्णाची परिस्थिती लवकर खराबही होताना दिसते.

अशावेळी श्वास घ्यायला त्रास होतो आणि फुप्फुसांवर सूज येते. कारण, यावेळी रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसच्या परिणामांशी लढत असते. त्याचा परिणाम पर्यायाने शरीरावरच होत असतो.

यावेळी लोकांना ऑक्सिजन मास्क लावण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. यानंतर जेव्हा रुग्णाची परिस्थिती बरी होते. तेव्हा श्वास घ्यायला शरीराला झालेल्या त्रासामुळे पुढचे 8 आठवडे थकवा जाणवू शकतो.

आयसीयूची गरज भासली तर?

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 20 पैकी एका रुग्णाला आयसीयूची गरज भासू शकते. जर, यात रुग्णाची परिस्थिती जास्त गंभीर झाली तर त्याला व्हेंटिलेटरवही ठेवावं लागू शकतं.

जर, एखाद्या व्यक्तीला एकदा आयसीयूमध्ये जावं लागलं तर तो आजार कोणता का असेना, त्या व्यक्तिला पूर्ण बरं व्हायला आणि थकवा जायला महिनाभराचा किंवा सहा महिन्यांचा काळ लागू शकतो. त्यामुळे आयसीयूतून एकदा बाहेर आणलेल्या रुग्णांना पुढचे काही दिवस सामान्य रुग्णांच्या कक्षामध्ये ठेवलं जातं.

हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर घरी आलेल्या रुग्णाला स्नायू कमकुवत झाल्यामुळेच हा थकवा जाणवत असतो. जोपर्यंत स्नायू मजबूत होत नाहीत तोपर्यंत रुग्णामध्ये अशक्तपणा कायम राहतो. काही रुग्णांना फिजिओथेरपीचीही गरज भासते.

याबद्दल अधिक माहिती देताना, कार्डिफ अँड वेल युनिव्हर्सिटी इथले क्रिटीकल केअर फिजिओथेरपीस्ट पॉल ट्वोज सांगतात, "आयसीयूमध्ये उपचार करतानाच्या काळात देण्यात आलेल्या औषधांच्या मोठ्या डोसमुळे शरीरावर झालेला परिणाम आणि या काळात वजन कमी होणे त्यातही विशेषतः स्नायूंचं वजन कमी झाल्याने रुग्ण अशक्तच राहतो. या काळात रोगप्रतिकारक शक्ती घटल्याने दुसऱ्या आजारांची बाधाही रुग्णाला होऊ शकते."

इटली आणि चीनमधल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर रुग्णांना कायम अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास, खोकला आणि सारखी झोप येणे ही लक्षणं त्यांच्यामध्ये आजारानंतर दिसून आली.

कोरोनामुळे आरोग्य कायम बिघडलेलं राहील?

कोरोना व्हायरसचा उद्रेक होऊन अजून वर्षभराचा काळ झालेला नसल्याने कोरोनाचे दूरगामी परिणाम कितपत जाणवतील हा अभ्यास झालेला नाही. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आणि फुप्फुसांची क्षमता कमकुवत झाल्याने रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास पुढेही जाणवू शकतो.

युकेमधल्या वार्विक मेडीकल स्कूलमधले प्रा. डॉ. जेम्स गिल सांगतात, "रुग्णांना मानसिक आरोग्य राखण्यासाठी सहकार्याची गरज असते. पॉस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डीसऑर्डरमुळे (PTSD) लोकांवर अशा आजारांचे खोल परिणाम होतात. त्यामुळे रुग्णांना अशा आजारांमधून बरं झालेल्यानंतर मानसिक आरोग्यावरही उपचार घेण्याची वेळ येऊ शकते."

कोव्हिड-19 होण्याची सातत्याने भीती?

कोरोनाची बाधा होऊन आजारी पडणं हे सर्वस्वी रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. बऱ्याचदा रुग्णांना कोरोनाची बाधा होऊनही त्यांच्यात लक्षणं दिसत नाही आणि कालांतराने थोडासा आराम करून ते बरं झाल्याचं दिसून आलंय. त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीने व्हायरसवर मात केल्याचंच ते लक्षण असतं.

त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टम उत्तम राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा आणि जोपर्यंत खोकला, ताप यांसारखी लक्षणं एकत्र दिसून येत नाहीत तोवर कोव्हिड-19 झाला या चिंतेने खचून जाऊन नये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)