2025 : भारतीय महिला खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पद; खेळाच्या भवितव्यासाठी हे वर्ष टर्निंग पॉइंट ठरलं का?

हरमनप्रीत कौरपासून ते दिव्या देशमुखपर्यंत, भारताच्या महिला खेळाडूंसाठी 2025 हे वर्ष खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरलं.

कारण या वर्षात भारतीय महिला खेळाडूंनी विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

त्यांनी केवळ प्रतिस्पर्ध्यांनाच हरवलं नाही, तर अनेक पूर्वग्रहांवर मात केली आणि आपली स्वप्नं पूर्ण करता येतात हा विश्वास नव्या पिढीला दिला.

केवळ या वर्षापुरती नाही तर भारतीय क्रीडाविश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी अशी कामगिरी काहीजणींनी बजावली आहे. त्याचाच हा लेखाजोखा...

1. महिला क्रिकेट टीमचा विश्वचषक विजय

2 नोव्हेंबर 2025च्या मध्यरात्री भारताच्या हरमनप्रीत कौरनं नदीन डी क्लार्कचा झेल टिपला आणि महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तो क्षण भारतीय क्रिकेटसाठीच नाही तर देशातल्या क्रीडाक्षेत्रातील महिलांसाठी कदाचित सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरावा.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि पहिल्यांदाच ICC वन डे विश्वचषक जिंकत नव्या युगाची सुरुवात केली.

हरमनप्रीतच्या टीमनं सेमीफायनलमध्येही सात वेळा विश्वचषक विजेता ठरलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विक्रमी विजय मिळवला. त्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जच्या धाडसी खेळीने विजयाचा मार्ग मोकळा केला.

स्मृती मंधाना, हरमनप्रीत, जेमिमा, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि इतर सर्व आता घराघरात परिचित झाले आहेत.

फायनलमध्ये भारताच्या या लेकींनी बजावलेल्या कामगिरीनं सर्वांनाच महिला क्रिकेटची दखल घ्यायला लावली. इतकी की, त्याच दिवशी पुरुष संघाने ऑस्ट्रेलियात जिंकलेला सामना अनेकांना आठवतही नसेल.

तज्ज्ञांच्या मते, या लोकप्रियतेमुळे महिला खेळाडूंसाठीची स्पॉन्सरशिप आणि मार्केटिंगमध्ये वाढ होऊ शकते ज्याचा फायदा उत्तम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी होईल आणि आणखी चांगले निकाल पाहायला मिळतील.

पण केवळ क्रिकेटपुरता हा परिणाम मर्यादीत न राहता देशातील महिला खेळाडूंसाठीच ही नव्या पर्वाची नांदी ठरू शकते, अशी आशा अनेकांना वाटते आहे.

दिव्या देशमुखचं यश

2025 च्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाची फायनल म्हणजे 'ऑल इंडिया' मॅच ठरली.

कारण त्यात भारताच्याच दोन खेळाडू, उदयोन्मुख दिव्या देशमुख आणि अनुभवी कोनेरू हंपी एकमेकींना भिडल्या.

दिव्यानं अखेर हंपीला पराभूत करून विजेतेपद पटाकवलं. 19 वर्षीय दिव्या भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली आणि तसंच ती देशातील चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली.

भारतामध्ये बुद्धिबळाचा वेगाने प्रसार होत असतानाच महिलांनीही या खेळात नवी मजल मारली आहे.

ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप

हरमनप्रीतच्या टीमनं महिला वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काही दिवसांतच भारताच्या ब्लाइंड महिला क्रिकेट संघानेही पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला आणि देशाचं लक्ष वेधून घेतलं.

एरवी दृष्टीहीन क्रिकेटर्स कडे अजूनही फारसं लक्ष दिलं जात नाही, त्यांना पुरेशा सुविधांसाठीही संघर्ष करावा लागतो. पण भारताच्या महिला टीमच्या कामगिरीनं ही परिस्थिती बदलू शकते, अशी आशा निर्माण केली आहे.

शीतल देवी सक्षम खेळाडूंच्या स्पर्धेत पात्र

दोन्ही हात नसलेली भारतीय पॅरा-तिरंदाज शीतल देवीनं अनेक गैरसमज मोडीत काढले असून ती अनेकांचं प्रेरणास्थान बनली आहे.

शीतलनं या वर्षी पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलंच शिवाय त्यानंतर राष्ट्रीय पात्रता स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत ती पहिल्यांदाच सक्षम खेळाडूंच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र ठरली.

अशी पात्रता मिळवणारी शीतल पहिली भारतीय पॅरा-आर्चर आहे.

18 वर्षीय शीतलने सोनीपतमध्ये झालेल्या निवड चाचणीत 60 स्पर्धकांमध्ये तिसरे स्थान मिळवले आणि आता ती भारताच्या ज्युनियर संघात आशिया कपसाठी खेळणार आहे.

आईस हॉकी आशिया कपमध्ये कांस्य पदक

जून 2025 पर्यंत बहुतांश भारतीयांना आईस हॉकी हा खेळ माहितही नव्हता. पण भारताच्या महिला महिला संघाने यूएईला हरवून आशिया कपमध्ये कांस्य पदक जिंकले आणि ते चित्र बदलले.

भारतीय महिला टीमचं ते पहिले आंतरराष्ट्रीय पदक.

एकेकाळी लडाख आणि हिमाचलमधील गोठलेल्या तलावांवर आणि तात्पुरत्या रिंकवर सराव करणाऱ्या या मुलींनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि हिवाळी खेळांतही चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेले खेळाडू भारतात असल्याचं पुन्हा सिद्ध केलं.

बॉक्सिंग रिंगमध्ये राज्य

2025 च्या वर्षीच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तीन महिला खेळाडूंनी पदके जिंकली. मिनाक्षी हूडा हिने 48 किलो वजनी गटात तर जास्मिन लांबोरियानं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकांची कमाई केली तर नुपूर शेओरननं रौप्यपदक पटकावलं.

त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नोएडा इथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये भारताने नऊ सुवर्णपदके जिंकली, त्यापैकी सात महिला बॉक्सर्स होत्या.

निखत झरीन, मीनाक्षी हूडा, प्रीती पनवार, जास्मिन लांबोरिया, परवीन हूडा, अरुंधती चौधरी आणि नुपूर शेओरन यांनी भारताचा झेंडा उंचावला.

फुटबॉलमध्ये लक्षवेधक कामगिरी

फुटबॉलमध्ये भारताचा पुरुष संघ संघर्ष करत असताना, महिलांनी मात्र 2026 च्या आशिया चषकाचं तिकिट मिळवलं. 2003 नंतर पहिल्यांदाच भारताची महिला टीम या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

2027 च्या FIFA महिला वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या दिशेनं हे मोठे पाऊल ठरू शकते.

नवे वर्ष, नवी आव्हानं

2025 साली भारतीय महिलांनी खो-खो आणि कबड्डीमध्येही वर्ल्ड कप जिंकले. तर हॉकी आणि शूटिंगसारख्या ऑलिंपिक खेळांमध्ये मात्र कामगिरी मिश्र होती.

आता 2026 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि T20 वर्ल्ड कप अशा मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या महिला खेळाडूंना पुन्हा चमकण्याची संधी मिळणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)