कोरोना: मुंबईतल्या या भागात पुन्हा लॉकडाऊन, रुग्णांची संख्या वाढली

कोरोनानं मुंबईत थैमान घातलंय. त्यामुळे देशातील इतर राज्य-शहरांप्रमाणे मुंबईतही लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही मुंबईतील एकूण रुग्णांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केलाय.

पाच लॉकडाऊन झाल्यानंतर 8 जूनपासून महाराष्ट्र 'अनलॉक' करण्यास सुरुवात झाली. मुंबईतल्याही काही भागात लहान-मोठी दुकानं उघडण्यास सुरुवात झाली खरी, पण काही भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय.

मुंबईच्या उत्तर भागातील म्हणजेच, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या उपनगरांमधील काही भागात कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर वाढतच चालला असल्यानं, या भागात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आलंय.

या भागात आता केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच सुरू राहतील. म्हणजेच, हॉस्पिटल, औषधांची दुकानं, किराणा इत्यादी जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व गोष्टी बंद राहतील.

उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी ही माहिती दिली.

मुंबईतल्या 'या' भागात पुन्हा लॉकडाऊन

  • काजूपाडा (बोरिवली पूर्व)
  • केतकीपाडा (दहिसर पूर्व)
  • गणपत पाटील नगर (दहिसर पूर्व)
  • पोईसर (कांदिवली पश्चिम)
  • मढ आयलंड (मालाड पश्चिम)
  • संतोष नगर (गोरेगाव)
  • मालाड पश्चिममधील काही भाग

मुंबईतील कोणत्या भागात कोरोनाचा प्रसार वाढतोय, याची माहिती देणारा नकाशा मुंबई महापालिकेने जारी केलाय. त्याद्वारेही आपल्या लक्षात येऊ शकतं की, उत्तर मुंबईत कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर जास्त आहे.

R/C, P/N, R/N हे वॉर्ड उत्तर मुंबईतील आहेत.

उत्तर मुंबईतील अनेक भागात झोपडपट्ट्या सुद्धा आहेत. त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केलीय.

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा - मुख्यमंत्री

आज पत्रकारांसोबत घेतलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.""गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)