कोरोना व्हायरस : स्वीडनमध्ये लॉकडाऊन का नाही?

    • Author, मॅडी सेवेज
    • Role, स्टॉकहोमहून

युरोपच्या बहुतांश भागात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. मात्र स्वीडनमध्ये जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे. कसं शक्य आहे?

गारेगार थंडीचा मोसम नुकताच संपला आहे. त्यामुळे स्वीडनमध्ये आता बाहेर हिंडणं शक्य होतं आहे. उन खाण्यासाठी, स्वच्छ सूर्य प्रकाशाचे-कवडशांचे अनुभव घेण्यासाठी स्वीडनकर आता घराबाहेर पडू लागले आहेत.

मारिआटोरगेट चौकात व्हायकिंग गॉड थोर यांच्या भव्य पुतळ्याजवळच्या परिसरात स्वीडनकर आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसत आहेत. तरुण मुलंमुली हॅपी अवर्समध्ये भटकंती करताना दिसत आहेत.

स्टॉकहोम शहरात नाईटक्लब सुरू आहेत. मात्र रविवारपासून ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येत नाहीत.

स्वीडनचा सख्खा शेजारी असलेल्या डेन्मार्कमध्ये एकावेळी केवळ १० लोक एकत्र येऊ शकतात. यूकेमध्ये तर तुमच्या घराबाहेरही तुम्ही कोणाला भेटू शकत नाही.

प्रत्येकावर मोठी जबाबदारी

स्वीडनमधल्या रस्त्यांवर एरव्हीच्या तुलनेत शांतता आहे. एसएल ही स्टॉकहोममधल्या सार्वजनिक वाहतुकीचं नियंत्रण करणारी कंपनी. गेल्या आठवड्यात प्रवासी वाहतुकीत निम्म्याने घट झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सबवे आणि पॅसेंजर गाड्यांची वर्दळ कमी झाली आहे.

सरकारतर्फे होणाऱ्या निधी पुरवठ्यावर स्टॉकहोम बिझनेस रिजन कंपनी चालते. शहरातून चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापारउदीम या कंपनीच्या मार्फत चालतो. या कंपनीच्या मते, सार्वजनिक वाहतुकीत ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. टेक्नोसॅव्ही मनुष्यबळ आणि कामाच्या सोयीस्कर वेळा आणि घरून काम करण्याची सुविधा यामुळे हे शक्य झालं आहे.

प्रत्येक कंपनीला हे करणं शक्य आहे. बहुतांश कंपन्या हे प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. त्यांनी शक्य करून दाखवलं आहे, असं कंपनीचे सीईओ स्टाफन इन्गव्हॅरसन यांनी सांगितलं.

त्यांचे शब्द आणि सरकारने आखलेले धोरण यामध्ये कमालीचं साधर्म्य आहे. स्वयं जबाबदारी. ऐतिहासिक मोठा निर्णय न घेताही कोरोना व्हायरसचा फैलाव मर्यादित राहू शकतो, असं सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि राजकारण्यांना वाटतं.

स्वीडनमध्ये कठोर निर्बंधापेक्षा मार्गदर्शक तत्वं आहेत. तुम्हाला बरं नसेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही घरी राहणंच योग्य आहे. तुमचे हात सातत्याने धुवा, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, अशा या सूचना आहेत.

स्वीडनमध्ये कोरोनाच्या 3500 केसेस नोंदल्या गेल्या आहेत आणि 105 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपण सगळे प्रौढ आहोत आणि तसंच आपलं वागणं हवं. कोणत्याही स्वरुपाच्या अफवा किंवा लोकांमध्ये घबराट उडेल अशा गोष्टी पसरवू नयेत. हे शब्द आहेत स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांचे. गेल्या आठवड्यात त्यांनी टीव्हीवरून स्वीडनवासीयांना उद्देशून भाषण केलं.

या संकटकाळात कोणीही एकटं नाही, परंतु आपल्या प्रत्येकावर मोठी जबाबदारी आहे.

प्रचंड विश्वास

स्वीडनच्या बहुतांश नागरिकांनी स्टेफान यांचं भाषण ऐकलं आणि त्यांना पंतप्रधानांचं म्हणणं पटलं असं नोव्हूस या प्रमुख सर्वेक्षण कंपनीने सांगितलं.

स्वीडनच्या नागरिकांना त्यांच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा विश्वास आहे. त्यामुळेच नागरिक स्वेच्छेने या नियमांचं पालन करत आहेत.

डेमोग्राफी अर्थात लोकांच्या राहण्याचं स्वरुपही लक्षात घेणं आवश्यक आहे. मेडिटेरिअन देशांमध्ये अनेकांची पिढीजात घरं आहेत. स्वीडनमधल्या या निम्म्याहून अधिक घरांमध्ये एक-एकच माणसं राहतात. त्यामुळे कुटुंबांत व्हायरस पसरण्याचा धोका कमी होतो.

दरम्यान स्वीडनच्या माणसांना घराबाहेर मोकळ्या वातावरणात वावरायला आवडतं. कोरोनासारख्या संकटकाळात लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखणं आवश्यक आहे. नियमांचा बडगा दाखवून त्यांना कोंडून ठेवण्याचा नियम केलेला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी कोणकोणते पर्याय आजमावता येतील हे पाहायचं आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं स्टॉकहोम चेंबर ऑफ कॉमर्सचे सीईओ आंद्रेस हॅट्झीगुआरगियू यांनी सांगितलं.

स्वीडनचं सरकार आणि स्वीडनवासीयांचा दृष्टिकोन हा अन्य देशांच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचं इथल्या उद्योग जगताला वाटतं.

काळच ठरवेल

युरोपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना, स्वीडनने पत्करलेल्या या दृष्टिकोनावर अनेकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

लोक सरकारने केलेल्या सूचना, शिफारशी अंमलात आणत आहेत. मात्र हा संकटाचा काळ आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत तेवढं पुरेसं नाही, असं डॉ. इमा फ्रान्स यांनी म्हटलं आहे. स्वीडिश मेडिकल युनिव्हर्सिटीत द कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट मधील त्या साथीच्या रोगांच्या तज्ज्ञ आहेत.

लोकांनी सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच दुकानं आणि जिममध्ये कसं वागायला हवं आणि काय करायला नको याचे स्पष्ट आणि थेट शब्दांत निर्देश द्यायला हवेत, असं इमा यांना वाटतं.

जनजीवन सुरळीत सुरू असलं तरी काहीजणांना कोरोनाचा फटका बसला आहे. मारियाटोरगेटच्या गजबजलेल्या परिसरातच अल मोकिका हे प्रसिद्ध सलून आहे. या दुकानात ग्राहकांची संख्या घटली आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेऊनही ग्राहक फिरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

"माझ्या बायकोची स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत. व्यापार थंडावला आहे. मला बिलं चुकती करायची आहेत. आम्हाला आर्थिक मदतीसाठी बँकेला कॉल करावा लागेल असं दिसतंय," असं अल मोकिकाच्या मालकांनी सांगितलं.

स्वीडनच्या प्रशासनाने लॉकडाऊनची शक्यता नाकारलेली नाही.

युरोपमधल्या कोणत्या शास्त्रज्ञांनी आणि राजकारण्यांनी घेतलेले निर्णय योग्य होते हे येणारा काळच ठरवेल, असं डॉ. इमा यांना वाटतं.

कोरोनाला रोखण्यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना प्रभावी आहेत हे खरंतर कुणालाच माहिती नाही, असं त्यांना वाटतं. हे निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्याकडे नाही, याचं बरं वाटतंय असंही त्या म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)