जेव्हा अरुण दातेंबरोबर 'शुक्रतारा' गायला अमेरिकेत गायिका नव्हती...

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांचं आज सकाळी निधन झालं. एक दिलदार व्यक्ती, खाण्याचे शौकीन, संगीतावरचं अपरंपार प्रेम... या आणि अशा अनेक आठवणींना त्यांच्या निकटवर्तीयांनी बीबीसी मराठीशी बोलताना उजाळा दिला.

1. एक गाणं 40 शुक्रतारका

अरुण दातेंचं नाव घेतलं की 'शुक्रतारा मंद वारा...'ची सुरावट आपोआप कानात वाजायला सुरुवात होते. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेल्या गीतामुळे अरुण दातेंचा रोमँटिक आवाज घराघरात पोहोचला. पण प्रत्येक ठिकाणी मूळ गायिकेला नेणं शक्य नसल्यामुळे विविध गायिकांनी, हे गाणं अनेक कार्यक्रमांतून गायलं.

"हे गाणं अफाट गाजलं होतं, इतकं की एकदा अमेरिकेत आम्ही 40 कार्यक्रम केले तेव्हा त्या 40 कार्यक्रमात 10 ते 60 वयोगटातल्या वेगवेगळ्या गायिकांनी हे गाणं अरुणजींबरोबर गायलं," अशी माहिती नरेंद्र चिपळूणकर यांनी दिली.

"भारतातसुद्धा आम्हाला कार्यक्रमाला कधी गायिका मिळाली नाही, तर आम्ही तिथल्या स्थानिक गायिकेशी संपर्क साधायचो. हे गाणं येत नाही, असं म्हणणारी एकही गायिका आम्हाला मिळाली नाही. एवढं ते गाणं लोकप्रिय होतं. रसिकांनी या गाण्यावर प्रेम केलंच पण गायकांनीसुद्धा या गाण्याला तितकाच जीव लावला," असंही चिपळूणकर म्हणाले.

चिपळूणकर यांनी 1992 पासून जवळजवळ 1,200 प्रयोगांमध्ये दातेंना हार्मोनिअमची साथ केली.

2. 60 दिवसांत 33 कार्यक्रम

अरुण दातेंच्या गाण्यांचा चाहता वर्ग जगभरात पोहोचला होता. अजय धोंगडे सांगतात, "1993 साली आमचा अमेरिकेचा दौरा ठरला. जेव्हा दौरा ठरला तेव्हा 11 कार्यक्रम ठरले होते. पहिला कार्यक्रम झाला. तो अतिशय गाजला. त्यानंतर अमेरिकेतल्या अगदी छोट्या छोट्या गावातसुद्धा आम्हाला कार्यक्रम करण्याची गळ घालण्यात आली." अजय धोंगडे यांनी अरुण दातेंच्या गाण्यांना 28 वर्षं तबल्याची साथ केली.

"काही ठिकाणी तर महाराष्ट्र मंडळसुद्धा नव्हतं. पण अरुणजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लगोलग महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. दौरा संपण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही तिथे कार्यक्रम करत होतो. असे एकूण 33 कार्यक्रम दोन महिन्यांत केले. पण प्रत्येक कार्यक्रमात अरुणजींचा उत्साह तितकाच दांडगा होता," असं धोंडगेंनी बीबीसी मराठीला सांगितलं.

3. लोकांनी छत्र्या घेऊन कार्यक्रम ऐकला

अरुण दातेंच्या गाण्यांच्या एक कार्यक्रम मुंबईच्या बोरिवलीत एका अॅम्फीथिएटरमध्ये आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू होणार तितक्यात पाऊस सुरू झाला. अॅम्फीथिएटर असल्यामुळे लोक भिजणार, हे निश्चित होतं.

पण त्याही परिस्थितीत लोकांनी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. लोकांनी अक्षरश: छत्री धरून अरुणजींची गाणी ऐकल्याची आठवण निवेदिका अनुश्री फडणीस सांगतात.

"हा अतिशय भावूक क्षण होता. मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. अरुणजींच्या गाण्यावर लोक किती प्रेम करतात, हे मला त्या दिवशी कळलं," अनुश्री पुढे सांगतात.

4. 'असा आवाज मी कधीच ऐकला नाही'

अरुण दाते इंदोरहून मुंबईला कसे आले, याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे सांगतात -

श्रीनिवास खळे आणि अरुणजींचे वडील रामूभय्या दाते, हे चांगले मित्र होते. एकदा खळे काका इंदोरला गेले असता, "अरुणसाठी काय जमतंय का बघ," अशी विनंती रामूभय्यांनी केली. तेव्हा खळे काकांनी लगेच हार्मोनियम काढलं. अरुणजींनी गीत सादर केलं. ते गाणं ऐकून खळे काका भारावून गेले.

"असा आवाज मी कधीच ऐकला नाही आणि भावसंगीतासाठी हा उत्तम आवाज आहे," अशी लगेच पावती दिली.

पुढे मुंबईला आल्यावर श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, आणि अरुण दाते या त्रिमूर्तींनी एक काळ गाजवला. "जेव्हा खळे काका गेले, तेव्हा त्रिमूर्तीतला एक चेहरा गेला, अशी प्रतिक्रिया मी दिली होती. आज खळे काका, पाडगावकर आणि दाते तिघंही नाहीत. त्यामुळे ही त्रिमूर्ती आता हरवली," अशी भावना हुंजे यांनी व्यक्त केली.

5. विस्मृतीचा त्रास

उतारवयात दातेंना अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता. पण गाण्यावरची अढळ श्रद्धा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र मग लाईव्ह कार्यक्रमात ते गाण्याच्या ओळी विसरायला लागले.

याबद्दल बोलताना नरेंद्र चिपळूणकर सांगतात, "त्यांच्या विस्मृतीचा अनेकांनी गैरफायदा घेतला. काही आयोजकांनी पैसै न देताच 'पैसै दिले', असं सांगत फसवणूक केली. अशा वेळेला मी जर आयोजकांशी वाद घातला तर ते मला थांबवायचे. 'कार्यक्रमातून आपल्याला आनंद मिळाला ना, मग पैशाचं फार मनाला लावून घेऊ नको,' अशा शब्दांत ते माझी समजूत घालायचे. ते कधी ओळी विसरले तर मी प्रॉम्प्टिंग करायचो. इतकं झालं तरी त्यांच्या गाण्याचा उत्साह कमी झाला नाही."

30 एप्रिल 2014 ला दातेंचा शेवटचा कार्यक्रम झाला. तो अगदी ठरवून शेवटचा कार्यक्रम नव्हता. पण प्रकृती साथ देत नसल्यामुळे आणि विस्मृतीच्या आजारामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी पुढे कार्यक्रम करण्यापासून परावृत्त केलं.

गाण्याबरोबरच खाण्यावरही अरुणजींनी प्रेम केल्याचे किस्से या मान्यवरांनी सांगितले.

नरेंद्र चिपळूणकरांना एकदा अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाला नाही. तेव्हा संपूर्ण दौराच अरुण दातेंनी रद्द केला, यातून आपल्या सहवादकांचा सुद्धा ते तितकाच विचार करायचे, हे दिसून येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)