You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : 'फाळणी व्हावी अशी जिन्नांची इच्छा नव्हती'
अलीगढ मुस्लीम विद्यापीठात लावलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या फोटोवरून वादंग सुरू आहे. अभ्यासक आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे एके काळचे सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी बातचीत केली.
जिन्ना यांच्या फोटोवरून चालू असलेलं वादंग निरर्थक आहे असं सांगत कुलकर्णी यांनी जिन्ना, त्यांचे धर्मनिरपेक्षतेबद्दलचे विचार, भारताशी असलेलं नातं याबाबत चर्चा केली तसंच बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. या चर्चेचा हा संक्षिप्त गोषवारा.
1. हा वाद अचानक कसा उद्भवला?
जिन्नांचा फोटो अलीगढ विद्यापीठात 1938 पासून आहे. गेली 80 वर्षं कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता, तो आत्ताच कसा उद्भवला? असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
हा वाद उभा करण्यामागे फूट पाडण्याची मानसिकता आहे. मुसलमान समाजावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा हा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. या वादादरम्यान झालेल्या हिंसेकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
भारतात जिन्नांचा फोटो का असावा? या प्रश्नावर सुधींद्र कुलकर्णींनी पाकिस्तानात कराची शहरात गांधी स्ट्रीट आहे, भारतात कुठे जिन्ना स्ट्रीट आहे का? असा प्रतिप्रश्न केला. मुंबईतल्या जिन्ना हाऊसबद्दल जिन्नांना फाळणीनंतरही ममत्व होतं आणि त्यांना तिथं येऊन राहायची इच्छा होती. ते फाळणीनंतरही स्वतःला भारतीय मानत असत असाही युक्तीवाद त्यांनी केला.
2. 'जिन्ना भारत-पाकिस्तानातला दुवा'
कुलकर्णींच्या मते, फोटो काढण्याचा वाद म्हणजे काही लोकांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. इतिहासात काय घडलं यापेक्षा दोन्ही देश वर्तमानात आणि भविष्यात कसे जवळ येऊ शकतील याबद्दल विचार करायला हवा असंही त्यांनी सुचवलं. जिन्नांवरून वाद होण्यापेक्षा जिन्ना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला पूल कसा होऊ शकतील याकडे पाहावं असंही ते म्हणाले.
3. फाळणीला कोण जबाबदार?
बीबीसी मराठीच्या वाचकांनी विचारलं, जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार धरायचं नाही का? कुलकर्णींच्या मते, जिन्ना नक्कीच फाळणीदरम्यान झालेल्या रक्तपाताला जबाबदार होते.
त्यांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताची ज्याप्रकारे मांडणी केली ती चुकीची होती. पण फाळणीपाठोपाठ झालेल्या हिंसाचाराची सगळ्यात मोठी जबाबदारी इंग्रजांवर आहे. लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीचं वेळापत्रक अलिकडे आणलं, त्यामुळे उडालेल्या गोंधळात हिंसा झाली. पण द्विराष्ट्रवाद ही फक्त मुस्लीम लीगची आणि जिन्नांची संकल्पना नव्हती असं सांगत वि. दा. सावरकर, लाला लजपतराय आणि डॉ. आंबेडकरांनीही या संकल्पनेला पाठिंबा दिला होता असं ते सांगतात.
4. 'जिन्नांना भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हवे होते'
बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, जिन्ना भारतीयांसाठी कधीही पूजनीय होऊ शकत नाहीत, पण त्यांच्या जीवनातले आणि विचारसरणीतले दोन कालखंड समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1930 पर्यंत जिन्ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. सरोजिनी नायडूंनी 'हिंदू-मुस्लीम एकतेचे दूत' अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली होती.
जिन्नांना इंग्रजांनी ज्याप्रकारे फाळणी केली ती मान्य नव्हती. त्यांना भारत आणि पाकिस्तानात मैत्रीपूर्ण संबंध असावेत अशी अपेक्षा होती. जसे संबंध अमेरिका आणि कॅनडामध्ये आहेत तसे या दोन शेजाऱ्यांमध्ये असावे असं ते मानत.
5. 'जिन्नांना खलनायक बनवू नका'
भारतीय लोक जिन्नांना समजून घेण्यात कमी पडतात असं सुधींद्र कुलकर्णींचं मत आहे. फाळणीचा सगळा दोष जिन्नांना दिला जातो. पण काँग्रेस नेत्यांनाही शेवटी शेवटी फाळणी करण्याची घाई झाली होती.
जिन्ना धर्मांध नव्हते कारण 11 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तान धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावं असं म्हटलं होतं. पाकिस्तानची शोकांतिका हीच आहे की त्यांनी सेक्युलर जिन्ना त्यांच्या देशवासियांपर्यंत पोहोचू दिले नाहीत.
जिन्नांचं हे भाषणही पाकिस्तानी इतिहासातून गाळलं गेलं जेणेकरून त्यांचा हा चेहरा येणाऱ्या पिढीला कळू नये. 'फाळणी आणि त्याच्या हिंसाचारात अनेकांचा दोष आहे. जिन्नांचा जास्त आहे पण म्हणून त्यांना एकट्याला खलनायक ठरवू नका' असंही सुधींद्र कुलकर्णी म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)