भात, पास्ता जास्त खाल्ला तर मासिक पाळी लवकर थांबू शकते?

महिलांच्या आहारात ठराविक पदार्थ जास्त खाण्यात आले तर त्यांची रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी वेळेआधी थांबू शकते का?

महिलांच्या खाण्यात पास्ता आणि भात जास्त प्रमाणात आला तर त्यांची मासिक पाळी सरासरी वयापेक्षा एक ते दीड वर्षं अगोदर थांबू शकते, असं एका वैद्यकीय संशोधनात दिसून आलं आहे. UKमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सनं 914 ब्रिटीश महिलांची मासिक पाळी आणि त्यांचा आहार यांचा अभ्यास केला.

त्यातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. ज्या महिलांच्या आहारात मासे, हिरवे वाटाणे, सोयाबीन यांचा समावेश असतो, त्यांच्या रजोनिवृत्तीचा कालावधी सरासरी काळापेक्षा एक ते दीड वर्षं लांबू शकतो, असंही या संशोधनात लक्षात आलं.

मासिक पाळी थांबण्याच्या प्रक्रियेत महिलेच्या जनुकीय गुणधर्माचा समावेश असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

अर्थात, आहारामुळे मासिक पाळीवर कितपत परिणाम होतो याचे ठोस पुरावे मात्र सापडले नाहीत. त्यामुळं महिलांनी लगेच आहारात बदल करण्याची गरज नसल्याचा निर्वाळाही तज्ज्ञांनी दिला आहे.

अहवाल काय म्हणतो?

द जर्नल ऑफ च्या अंकात हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या दैनंदिन आहाराचा अभ्यास करण्यात आला.

आहारात शेंगदाणे, वाटाणे, सोयाबीन, डाळींचं प्रणाम चांगलं असेल, तर महिलांची पाळी सरासरी एक ते दीड वर्षं उशिरापर्यंत लांबू शकते.

रिफाइन्ड कार्बोहायड्रेड पदार्थ विशेषत: पास्ता आणि भात खाण्यात आला तर पाळी लवकर थांबू शकते.

महिलांचं वजन, त्यांची प्रजनन क्षमता, हॉर्मोन्स यांचाही यात अभ्यास करण्यात आला. परंतु, जनुकीय गुणधर्मांचा मासिक पाळीवर काय परिणाम होतो याचा ते अभ्यास करू शकले नाहीत.

शेंगदाणे म्हणजे तेलयुक्तबिया, यात अँटिऑक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असतं. तसंच माशांतील ओमेगा-3 अॅसिडमुळे शरिरातील अँटिऑक्सिडेंट्स उत्तेजित होतात. यामुळे रजोनिवृत्तीचा काळ वाढू शकतो.

आरोग्यावर होणारे परिणाम

कार्बोहायड्रेटसमुळे शरिरातील इन्सुलीनची प्रतिकार क्षमता कमी होते. तसंच, ते सेक्स हॉर्मोन्समध्ये ढवळाढवळ करतात आणि शरिरातील ऑस्ट्रोजनचं प्रमाण वाढवतात. त्यामुळे मासिक पाळीची वारंवारता वाढते आणि प्रजनन क्षमता लवकर संपुष्टात येते.

अचानक पाळी थांबल्यावर महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असं न्युट्रिशनल इपिडिमियॉलॉजीचे अभ्यासक जॅनेट केड यांचं मत आहे.

पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्यानं फायदा होऊ शकतो.

UKच्या मासिक पाळी तज्ज्ञ कॅथी अॅबर्निथी सांगतात, "आहाराचा मासिक पाळीवर काय परिणाम होतो याचा आतापर्यंत सखोल अभ्यास झालेला नाही. त्यामुळं महिलांच्या रजोनिवृत्तीच्या वयाबाबत ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पण पाळी थांबण्यासाठी अनेक कारणं असतात."

महिलांच्या प्रजनन आरोग्याचे अभ्यासक डॉ. चन्ना जयसेना सांगतात, "शरिरातल्या चयापचय क्रियेचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर बराचसा परिणाम होतो. खाण्याच्या सवयीमुळं पाळी लवकर थांबते किंवा काळ वाढतो, असं म्हणण्याची इच्छा होऊ शकते. मात्र, दु्र्देवानं, अशा प्रकारच्या निरिक्षणात्मक अभ्यासांची एक मोठी मर्यादा म्हणजे त्यावरून आहाराच्या सवयींमुळे रजोनिवृत्तीचा काळ कमी होतो असं म्हणता येत नाही. जोवर तशाप्रकारचे ठोस पुरावे मिळत नाहीत तोवर आहारात बदल करण्याची गरज नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)