अरुण दाते : ‘संगीतातला राजा माणूस’ हरपला

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं रविवारी सकाळी सहा वाजता निधन झालं. वयाच्या 84व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणानंतर दाते यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

'शुक्रतारा मंदवारा', 'भातुकलीच्या खेळामधली', 'स्वरगंगेच्या काठावरती', 'या जन्मावर या जगण्यावर'... अशी अनेक गाणी अरुण दाते यांच्या आवाजात अजरामर झाली.

सुप्रसिद्ध गायक रामुभय्या दाते यांचे सुपुत्र असलेल्या अरुण दातेंचा जन्म 4 मे 1934 रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढे गायनावर आणि विशेषतः भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं.

'शतदा प्रेम करावे' हे त्यांचं आत्मचरित्र 2016 साली प्रकाशित झालं होतं. या आधीही दातेंच्या आयुष्यावर एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, पण त्याची उपलब्धता नसल्याने हे नवीन चरित्र प्रकाशित करण्यात आलं होतं.

'गाण्यावर कमालीची श्रद्धा'

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "अरुण दाते मला मोठ्या भावाप्रमाणे होते. ते एक श्रेष्ठ गायक तर होतेच पण माणूस म्हणूनही तितकेच चांगले होते. सगळ्या संगीतप्रेमींना हा खूप मोठा धक्का आहे आणि संगीतविश्वाचं हे फार मोठं नुकसान आहे. अरुण दाते ही भारताला मिळालेली फार मोठी देणगी होती, ती आज हरपली."

'शुक्रतारा' या अरुण दातेंच्या भावगीतांच्या कार्यक्रमाचे देश-विदेशात 2500 वर प्रयोग झाले होते. 2014 साली त्यांनी नाशिकमध्ये शेवटचा कार्यक्रम केला, असं त्यांच्याबरोबर 28 वर्षं तबल्याची साथ केलेले अजय धोंगडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"इतके कार्यक्रम केले तरी प्रत्येक कार्यक्रमाआधी रिहर्सल करण्यावर त्यांचा भर असायचा. गाण्यावर त्यांची कमालीची श्रद्धा होती," असंही धोंगडे यांनी सांगितलं.

यशवंत देव, मंगेश पाडगांवकर, श्रीनिवास खळे आणि अरूण दाते या चौघांना मराठी भावगीत विश्वात विशेष स्थान आहे. याबद्दलची आठवण सांगताना धोंगडे म्हणाले, "यशवंत देव, मंगेश पाडगांवकर आणि श्रीनिवास खळे या तिघा कलाकारांबरोबर दातेंचं विशेष नातं होतं. त्यांनी अनेकदा एकत्र काम केलं होतं पण यांच्यापैकी कुणालाही भेटल्यानंतर ते वाकून नमस्कार करायचे, कारण त्यांना या लोकांबद्दल प्रचंड आदर होता."

अरुण दाते यांच्यावर आज दुपारी चार वाजता मुंबईच्या सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

4 मे 1934 साली इंदूरमध्ये जन्मलेल्या अरुण दातेंचा नागपूरशीही जवळचा संबंध होता. त्यांची आठवण सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "अरुण दातेंशी माझा जवळून संबंध आला. नागपुरात त्यांनी एम्प्रेस टेक्सटाईल मिलमधून काम सुरू केलं. त्यांची गीतं आणि शब्द मराठी माणूस कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या आठवणी नेहमीच रसिकांच्या मनात संगीत आणि गाण्याच्या माध्यमातून जाग्या राहतील."

'संगीतातला राजा माणूस'

अरुण दाते पुण्यात राहत असताना त्यांचे शेजारी असलेले गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यांनी बीबीसी न्यूज मराठीला सांगितलं की, "अरुण दाते मला त्यांच्या 'अरे यार!' म्हणण्याच्या खास शैलीमुळे लक्षात राहतील. मी कधी त्यांना दुर्मुखलेलं पाहिलं नाही. 1998 साली आमची पहिली भेट झाली, तेव्हा जसे ते प्रसन्न होते तसेच ते शेवटपर्यंत होते. एखादं गाणं त्यांना आवडलं की ते लगेच सांगायचे 'अरे यार! काय मस्त चाल केली आहेस तू.' दाते म्हणजे संगीतातला राजा माणूस होता."

दातेंबद्दलची एक खास आठवण सांगताना कुलकर्णी म्हणतात, "भावसरगम हा कार्यक्रम सुरुवातीला हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि अरुण दाते असे तिघं मिळून करायचे. ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहिती आहे. नंतर दातेंनी आपला शुक्रतारा हा कार्यक्रम सुरू केला."

"सुरुवातीला ते इंदोरहून महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांची मराठीत मोजकीच गाणी होती. पण मला असंही म्हणावंसं वाटतं की ते मराठीत आल्यामुळे आपल्याला अनेक चांगली भावगीतं मिळाली पण एका उत्तम गझल गायकाला आपण मुकलो," असंही कुलकर्णी सांगतात.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी अरुण दातेंच्या लोकप्रिय गाण्यांच्या ओळींमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)