सेक्स वर्करच्या जीवनात जेव्हा प्रेम फुलतं...

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"सुरुवातीला तो केव्हा तर कुंटणखान्यात यायचा. कधी माझ्यासोबत तर कधी दुसऱ्या मुलीसोबत वेळ घालवायचा. पण नंतर तो फक्त माझ्यासाठीच कुंटणखान्यात यायला लागला आणि मग आमच्या प्रेम फुलू लागलं"

हे शब्द आहेत मेरठच्या रेड लाईट एरियात आयुष्यातले काही दिवस घालवलेल्या अनिता (नाव बदललेलं आहे) यांचे. इथल्या कबाडी बाजार या रेडलाईट एरियात अनिता यांना विकण्यात आलं होतं. पण एक व्यक्ती अनिताच्या जीवनात आली आणि त्यांच पूर्ण आयुष्य बदलून गेलं.

सेक्स वर्करच्या जीवनात प्रेमाला काही स्थान नसतं असं म्हटलं जात. अनिता यांच्या जीवनात प्रेमाचा शिडकाव झाला आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. देहविक्रीच्या व्यवसायातून कधी बाहेर पडू असं त्यांना वाटलंही नव्हतं, पण एका युवकामुळं हे घडू शकलं.

खरं तर अनिता अनेक भावनाहीन आणि कोरड्या संबंधातून गेल्या होत्या. त्यामुळे प्रेमावरचा त्यांच्या विश्वास उडाला होता, कुणावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी कठीणच होतं. पण या प्रेमाच्या रूपाने त्यांच्या जीवनात आशेचा किरण आला आणि जगण्याची नवी उमेद मिळाली.

पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्याची कसलीच अपेक्षा नसलेल्या अनिताला नवं आयुष्य तर मिळालंच शिवाय समाजात पुन्हा आदराचं स्थानही मिळालं.

नोकरीच्या आमिषानं विक्री

अनिता यांना पश्चिम बंगालच्या 24 परगणा इथून मेरठला आणण्यात आलं.

"माझ्या घरी आईवडील, एक लहान भाऊ आणि बहीण होती. घरी पैशांची नेहमी चणचण असायची. अशावेळी घरात दुसऱ्या कमावत्या हाताची गरज होती. त्यामुळे मी पैसे कमावले तर घरच्यांना मदत होईल, असं मला वाटलं. शहरात नोकरी मिळवून देतो, असं मला गावातल्या एका माणसानं सांगितलं," अनिता त्यांच्या हकीकत सांगतात.

"काहीतरी काम मिळवून देतो आणि त्या बदल्यात चांगले पैसे मिळतील, असं त्यानं माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं. ही घटना जवळपास 5 वर्षांपूर्वींची आहे. काही दिवस मी इथं काम केलं. त्यानंतर त्याने मला कुंटणखान्यात विकलं," अनिता सांगत होत्या.

धमक्या आणि रोजची मारहाण

आपल्याला विकलं आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा मात्र अनिता यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यासोबत काय झालं आहे, याबद्दल त्यांना काहीही समजत नव्हतं.

आपल्याला जाऊ दिलं जावं, अशी त्यांनी विनंती तिथल्या लोकांना वारंवार केली पण त्यांच्या हाकेला कुणी दाद दिली नाही, असं त्या सांगतात.

नोकरी करण्यासाठी आलेल्या अनिता यांना सेक्स वर्कर बनावं लागलं होते. त्यांच्यासाठी हे मरण पत्करल्यासारखं होतं. सुरुवातीला अनिता यांनी खूप विरोध केला. यामुळे मग अनिता यांना मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी तसंच चेहरा खराब धमकी देण्यात आली.

"माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. एक तर मी त्या ठिकाणी नवीन होते. माझ्यासोबत बळजबरी करण्यात आली. जेणे करून ग्राहकांसाठी मी तयार व्हावं. देहविक्रीला होकार म्हणणं किंवा मरण पत्करणं याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता. मी पूर्ण कोलमडले होते आणि मी या धंद्यात आले," अनिता सांगतात.

'नरकातून बाहेर पडायचं होतं'

पण मनीषची (नाव बदलण्यात आलं आहे.) भेट झाल्यानंतर अनिता याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. "मनीष आणि माझ्यात केव्हा नातं निर्माण झालं ते आम्हाला दोघांनाही कळालं नाही," अनिता सांगतात.

"मनीष दररोज मला भेटायला येत होता. तो माझ्यासोबत बोलायचं आणि मलाही तो आवडू लागला होता," अनिता पुढे सांगतात.

त्यानंतर एका दिवशी अचानक मनीषनं त्यांच्या मनातली गोष्ट अनिताला सांगितली. अनिताला कुंटणखान्याच्या नरकातून सुटका हवी होती. त्यांना मनीषमध्ये आधार दिसत होता.

पण मनीषवर त्यांचा सहजासहजी विश्वास बसत नव्हता.

कुंटणखान्यातून बाहेर पडायची इच्छा अनिता यांनी मनीष यांना बोलून दाखवली. मनीष यांचं नियमितपणे कुंटणखान्यात येणं तिथल्या लोकांना अंगवळणी पडलं होतं.

स्टॅम्प पेपरवर अंगठा

पण कुणालातरी आपण आवडणं हे अनिता यांच्यासाठी नवीन गोष्ट नक्कीच नव्हती. कारण कुंटणखान्यात अनेकदा असे ग्राहक येत ज्यांना कुणी ना कुणी मुलगी पसंत पडत. तेव्हा मनीष यांनी एका एनजीओसोबत संपर्क केला.

मेरठमध्ये कार्यरत असलेली ही संस्था वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना सोडवण्याचं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते.

"मनीष माझ्याकडे आला होता. कुंटणखान्यातल्या एका मुलीवर प्रेम करत असल्याचं आणि तिला त्यातून बाहेर काढण्याची इच्छा असल्याचं त्यानं मला सांगितलं," एनजीओच्या संचालक अतुल शर्मा सांगतात.

"कुंटणखान्यातून बाहेर पडल्यावर या मुलीचं काय, असं मी त्याला विचारलं. तो म्हणाला की तो तिच्यासोबत लग्न करणार आहे," अतुल सांगतात.

मनीषवर अचानक विश्वास ठेवणं अवघड होतं, असं अतुल सांगतात. त्यांनी मनीष यांना काही दिवसांनंतर यायला सागितलं. सेक्स वर्करशी लग्न करण्याचा मनीष यांचा निर्णय किती ठाम आहे, हे त्यांना पाहायचं होतं.

मनीष 2 दिवसांनंतर परत आले आणि त्यांनी तीच गोष्ट परत अतुल यांना सांगितली. तेव्हा कुठे अतुल यांना थोडाफार विश्वास बसला.

कुंटणखान्यातून बाहेर काढलं तेव्हा...

बळजबरीनं मुलीला कोठ्यातून बाहेर काढणं अवघड असल्यामुळे मुलीची परवानगी घेऊन ये, असं अतुल यांनी मनीषला सांगितलं. मनीषनं अनिताकडे जाऊन तिला ही गोष्ट सांगितली.

तिथून बाहेर पडण्यासाठी अनिता इतक्या उत्सुक होत्या की त्यांनी एक स्टॅम्प पेपर मागवला. मनीष पेपर घेऊन गेले तेव्हा अनिता यांनी रिकाम्या पेपरवर आपल्या अंगठ्याचे अनेक ठसे उमटवले.

"मला लिहिता येत नाही. मी बाहेर कुणाशी बोलूही शकत नसे. तिथून बाहेर काढा, असं मला ओरडून सांगावसं वाटत होतं," अनिता सांगतात.

यानंतर अतुल शर्मा पोलिसांना सोबत घेऊन कोठ्यावर पोहोचले.

दलालाची भीती

अतुल अनितांना ओळखत नव्हते. त्यांनी 'अनिता' अशी मोठ्यानं हाक मारली तेव्हा एक मुलगी उठून उभी राहिली.

"हीच ती मुलगी आहे असं माझ्या लक्षात आलं. मी तिचा हात पकडला आणि सोबत चल असं सांगितलं. तिला भीती वाटत होती कारण कोठ्यातून बाहेर पडल्यानंतरही दलालाची भीती कायम राहते. त्यानंतर कुंटणखाना चालवणारी महिला मला थांबवायला लागली. या मुलीला इथून बाहेर पडायचं आहे असं मी तिला सांगितलं," अतुल सांगतात.

"जर ती या पायऱ्या उतरणार असेल तर ती आमच्यासोबत येईल नाही तर मी परत जातो. मी इतकंच म्हटलं आणि अनिता पळतंच पायऱ्या उतरून आमच्या गाडीत जाऊन बसली," अतुल पुढे सांगतात.

यानंतर अतुल यांनी मनीषच्या आईवडिलांशी चर्चा केली. सुरुवातीला ते या लग्नासाठी तयार नव्हते. पण मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना माघार घ्यावी लागली.

पण लग्नासाठी त्यांनी मुलीचा भूतकाळ लपवून ठेवण्याची अट ठेवली.

वागण्या-बोलण्याची ट्रेनिंग

"लग्नाचा विचार करणं मी सोडून दिलं होतं. पण मनीष आयुष्यात आला आणि आशा पल्लवीत झाल्या. त्याच्या आईवडिलांनी माझा स्वीकार नसता केला तरी वाईट वाटलं नसतं. शेवटी बदनामी कोण स्वीकारेल? पण हळूहळू त्यांनी पूर्णपणे मला स्वीकारलं," अनिता सांगतात.

"आता मला एक मुलगी आहे आणि सन्मानपूर्वक आयुष्य तिच्या नशीबात आहे," अनिता पुढे सांगतात.

मेरठचा कबाडी बाजार रेड लाईट एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. इथं मुलींचं शिट्टी वाजवून ग्राहकांना बोलावणं सामान्य गोष्ट आहे. यामुळे सामान्य मुलींपेक्षा त्यांचं वेगळं असणं लक्षात येतं. पण आता तिथून बाहेर पडलेल्या अनेक मुलींचा संसार सुखात सुरू आहे.

या मुलींना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. तिथून बाहेर काढल्यानंतर आता ही संस्था या मुलींना राहण्याची, वागण्याची आणि बोलण्याची प्रशिक्षण देते.

यासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या घरी त्यांना काही दिवसांसाठी ठेवलं जातं. जेणे करून तिथल्या महिलांकडून सामान्य महिलांप्रमाणे राहण्या-वागण्याची पद्धत त्या आत्मसात करू शकतील.

कुंटणखान्यात दीर्घकाळ काम करणाऱ्या मुलींच्या चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात बदल झालेला असतो. त्यामुळे एका सामान्य कुटुंबात या मुली राहू शकतील यासाठी हे प्रयत्न केले जातात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)