You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक निवडणूक 2023: भाजपामध्ये बी. एस. येडियुरप्पा यांना का महत्त्व आहे?
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे दक्षिणकेडील राज्यांमध्ये भाजपची पाटी कोरी झाली आहे.
बुक्कनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा. कर्नाटकच्या राजकारणातला मातब्बर नेता. पण अडीच दिवसांचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर राजीनामा देताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
त्यावेळी ते म्हणाले होते "मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं होतं. त्यांना कर्जमाफी द्यायची होती. पण आता मी राज्य पिंजून काढणार आहे," असं म्हणत ते राजीनामा देण्यासाठी निघून गेले. त्यांच्यानंतर कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. पण काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार टिकलं नाही. त्यानंतर येडीयुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेली एक नजर.
1996 साली अटल बिहारी वाजपेयींनी बहुमत नसल्यामुळे संसदेतल्या मतदानाआधीच राजीनाम्याची घोषणा केली होती. त्याच पद्धतीने येडियुरप्पांनी भावनिक भाषण केलं होतं.
त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचा उल्लेख वारंवार होत होता. अडीच दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाही म्हटलं होतं.. 'मी ईश्वर आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने शपथ घेतो....'
शेतकरी त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणूनच ते गेल्या दशकापासून नेहमी हिरवी शाल परिधान करतात.
2008 साली विधानसभा निवडणुकांआधी जेव्हा ते कर्नाटकाच्या राजकारणात महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले, तेव्हा त्यांनी राज्य पिंजून काढलं होतं. आपण एका जातीचे अथवा विभागाचे नेते नसून संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचे नेते आहोत, अशी ओळख निर्माण करण्याचा तेव्हा ते प्रयत्न करत होते. तेव्हापासूनच डाव्या खांद्यावरची ही हिरवी सुती शाल त्यांच्या वेशाचा अविभाज्य घटक बनली.
"खांद्यावरचा हिरवा टॉवेल हा कर्नाटकमधल्या शेतकरी आंदोलनाचं प्रतीक आहे. त्यामुळं येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना हिरवा टॉवेल खांद्यावर घेतात," असं बंगळुरूतल्या अझीम प्रेमजी विद्यापीठातले समाजशास्त्राचे प्राध्यापक चंदन गौडा बीबीसी मराठीला सांगतात.
अडीच वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पांची सुरुवात अत्यंत साध्या घरात झाली. एका कारकुनापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात अनेक चढउतार आले.
बालपणी आई वारली
बुक्कनाकेरे या मंड्या जिल्ह्यातल्या गावात सिद्धलिंगप्पा आणि पुट्टाथय्यम्मा यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाचं काय ठेवणार हे ओळखणं सोपं होतं. कारण त्यावेळी मुलांची नावं इष्ट देवाच्या आणि मंदिरांच्या नावावरूनच ठेवली जायची.
त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव टुमकुरू जिल्ह्यातल्या येडियुर मंदिरावरून ठेवलं - येडियुरप्पा! वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांच्या आईचं निधन झालं. पुढे मंड्या जिल्ह्यातच कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. पण पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करायला अजून थोडा अवकाश होता.
बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांना समाजकल्याण खात्यात प्रथम श्रेणी लिपिक म्हणून नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी त्यांना मानवली नाही. त्यांनी शिकारीपुरा इथे वीरभद्र शास्त्री यांच्या भाताच्या गिरणीत कारकून म्हणून नोकरी पत्करली.
याच गिरणीच्या मालकाच्या मुलीशी, मित्रादेवी यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्याच सुमारास त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्दही सुरू झाली.
संघाचे कार्यवाह ते विरोधी पक्षनेते
आपल्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच येडियुरप्पा संघाचं काम करत होते. 1970मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिकारीपुरा प्रभागाचे कार्यवाह म्हणून त्यांची नेमणूक केली.
दोनच वर्षांत ते शिकारीपुरा पालिकेवर निवडून आले आणि त्याच वर्षी ते जनसंघाचे शिकारीपुरा तालुक्याचे अध्यक्षही बनले. (जनसंघ हे भाजपं आधीचं नाव होतं.) येडियुरप्पा यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख झपाट्याने चढत होता. 1975मध्ये म्हणजे पुढच्या तीन वर्षांत ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले.
याच वर्षी आणीबाणी लागू झाली आणि येडियुरप्पा यांनी त्याविरोधी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं. याच काळात ते तुरुंगातही गेले. बेल्लारी आणि शिमोगा अशा दोन कारागृहांमध्ये त्यांनी शिक्षा भोगली.
1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. कर्नाटक भाजपमध्ये येडियुरप्पा यांचा वाढता प्रभाव पाहता 1988मध्ये त्यांची नेमणूक पक्षाने कर्नाटक भाजपचे अध्यक्ष म्हणून केली.
याच काळात 1983मध्ये ते शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांची विधिमंडळातील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर ते सहा वेळा विधानसभेवर निवडून आले.
1994 आणि 2004 या दोन्ही विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने विरोधी पक्षनेतेपदाची माळ येडियुरप्पा यांच्या गळ्यात टाकली होती. त्यांनीही सातत्यानं सत्ताधारी पक्षावर कडाडून हल्ला चढवला.
... आणि सत्तेची चव चाखायला मिळाली!
येडियुरप्पा यांच्या विधिमंडळाच्या कारकिर्दीत त्यांना सत्तेची चव चाखायला मिळण्यासाठी खूप थांबावं लागलं.
2006मध्ये JDSने भाजपला ऑफर दिली. पहिले 20 महिने HD कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील आणि मग 20 महिने येडियुरप्पा. पण हे सगळं घडत असताना त्यांनी दिल्लीतल्या महत्त्वाच्या भाजप नेत्यांना अंधारात ठेवलं होतं.
"येडियुरप्पा कर्नाटकात नेमकं काय करत आहेत याचा थांगपत्ता भाजप श्रेष्ठींना लागत नव्हता. त्यावेळी भाजपनं वेदप्रकाश गोयल यांना कर्नाटकातली स्थिती सांभाळण्यासाठी पाठवलं. पण गोयल पोहोचण्याआधीच येडियुरप्पा आणि कुमारस्वामी यांनी 20-20 महिन्यांच्या सत्तेच्या भागिदारीची घोषणा करून टाकली. ही त्यांची खेळी राजकीयदृष्ट्या यशस्वी झाली," असं बीबीसीसाठी बंगळुरूमध्ये रिपोर्टिंग करणारे इम्रान कुरेशी सांगतात.
येडियुरप्पा या नव्या सरकारात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बनले. पण ऑक्टोबर 2007मध्ये जेव्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा कुमारस्वामी यांनी टाळाटाळ करायला सुरुवात केली.
7 दिवसांचे मुख्यमंत्री
"त्या काळात होणाऱ्या प्रत्येक सभेत येडियुरप्पा त्यांच्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचायचे. जाहीरपणे नाराजी व्यक्त करायचे," इम्रान कुरेशी सांगतात. पुढे JDS आणि भाजप यांच्यात सलोखा झाला आणि येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.
येडियुरप्पा 12 नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे पंचविसावे मुख्यमंत्री बनले खरे, पण खातेवाटपावरून JDS आणि भाजपचं बिनसलं आणि JDSने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला.
अखेर येडियुरप्पा यांनी 19 नोव्हेंबर 2007मध्ये म्हणजेच शपथ घेतल्यानंतर सातच दिवसांमध्ये राजीनामा दिला.
माझ्यावर अन्याय झाला, असं येडियुरप्पांनी राज्यभर हिंडून सांगितलं. त्यांना सहानुभूती मिळाली. 2008 साली त्यांना एकहाती सत्ता मिळाली. दक्षिणेकडच्या राज्यात भाजपला मिळालेला हा पहिला विजय ऐतिहासिक होता. त्यांनी 30 मे 2008 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
"यापूर्वी मुख्यमंत्री असताना येडियुरप्पा यांची प्रतिमा ही विकासकेंद्री मुख्यमंत्री अशी होती. संपूर्ण कर्नाटकमध्ये त्यांचे पाठिराखे आहेत," असं सुवर्णा न्यूज या कानडी न्यूज चॅनेलचे दिल्ली ब्यूरो चिफ प्रशांत नातू सांगतात.
पत्नीचा संशयास्पद मृत्यू
या राजकीय प्रवासात येडियुरप्पा यांना काही वादविवादांनाही सामोरं जावं लागलं. त्यातच त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण 2004मध्ये समोर आलं.
विहिरीतून पाणी भरताना विहिरीत पडून येडियुरप्पा यांच्या पत्नी मित्रादेवी यांचं निधन झालं. विनोबानगर येथील येडियुरप्पा यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
HV मंजुनाथ या व्यक्तीने येडियुरप्पा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. येडियुरप्पा यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. समाजवादी पार्टीचे तत्कालीन खासदार S बंगारप्पा यांनी तर या प्रकरणाची CBI चौकशी करावी, अशी मागणीही केली होती.
खाण आणि जमीन घोटाळा
2010-11 च्या काळात केंद्रातल्या UPA सरकारच्या अनेक घोटाळ्यांची प्रकरणं उघडकीस येत होती आणि लोकांमध्ये एकंदरीत भ्रष्टाचाराविरोधात असंतोष होता.
कर्नाटकात 2008 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तीनच वर्षांत राज्यातील खाण आणि जमीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात एका प्रकरणात येडियुरप्पा यांचं नाव देखील आलं.
बंगळुरू आणि आसपासच्या भागातील सरकारी मालकीची जमीन बिगर-सरकारी करण्यात आली होती. आणि ही जमीन येडियुरप्पा यांची मुलं राघवेंद्र आणि विजयेंद्र यांच्या कंपन्यांनी अत्यंत कमी दरात विकण्यात आली होती. येडियुरप्पा सत्तेत असताना हे घडलं होतं.
याबाबत स्वत:चा बचाव करताना येडियुरप्पा यांनी सांगितलं होतं की, जमिनींवरची सरकारी मालकी सोडून त्या जमिनी आपल्या कुटुंबीयांना विकणं हा राज्यातला जुनाच शिरस्ता असून आपण तोच गिरवत आहोत.
त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनीही येडियुरप्पा यांची पाठराखण करत त्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
पण त्यानंतर कर्नाटकच्या लोकायुक्तांनी समोर आणलेला खाणघोटाळा येडियुरप्पा यांच्यासाठी धोकादायक ठरला.
न्यायमूर्ती संतोष हेगडे कर्नाटकच्या लोकायुक्तपदी असताना त्यांनी या खाण घोटाळ्याबद्दलचा एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार कर्नाटकमधल्या बेल्लारी येथील लोह खाणींच्या जमिनी सरकारने कवडीमोलाने विकल्याचा ठपका ठेवला होता.
या खाणींच्या कंत्राटदारांपैकी प्रवीण चंद्र यांनी येडियुरप्पा यांच्या जावयाच्या कंपनीला अडीच कोटी रुपये आणि येडियुरप्पा यांच्या मुलांच्या नावे असलेल्या कंपनीला साडेतीन कोटी रुपये दिले.
राजीनामा आणि नवीन पक्ष!
येडियुरप्पा यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याची क्षमता असलेल्या या दोन प्रकरणांपुढे येडियुरप्पा यांचा हट्ट चालला नाही. पक्षातल्या वरिष्ठांनी येडियुरप्पा यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्यांनी 31 जुलै 2011 रोजी राजीनामा दिला.
"लोकायुक्तांच्या अहवालानंतरही येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास तयार नव्हते. त्यांना मुख्यमंत्रिपद किती जिव्हाळ्याचे आहे. हे त्यावेळी स्पष्ट दिसून येत होतं," असं निरिक्षण इम्रान कुरेशी यांनी नोंदवलं.
त्यानंतर येडियुरप्पा यांनी आपल्या आमदारकीचा आणि भाजपच्या पक्ष सदस्यत्त्वाचाही त्याग केला. नाराज झालेल्या येडियुरप्पा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कर्नाटक जनता पक्ष हा स्वत:चा पक्ष काढला.
येडियुरप्पा यांच्या या नव्या पक्षाचा सर्वात मोठा फटका भाजपला 2013च्या विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत येडियुरप्पा यांच्या पक्षाच्या फक्त सहा जागा निवडून आल्या, तरी इतर 40 जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.
भाजपने या निवडणुकांमध्ये 50 पेक्षा जास्त जागा गमावल्या आणि काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.
अमित शाहांमुळे 'घरवापसी'
दरम्यान, 2014मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सत्तेवर आला. याच कालावधीत पक्षाध्यक्षपदाची धुरा अमित शाह यांच्या खांद्यावर आली.अमित शाह यांनी कर्नाटकमधल्या या प्रभावशील नेत्याला पुन्हा एकदा भाजपमध्ये आणण्यासाठी कंबर कसली. त्यांनी सुरुवातीला त्यांना भाजपच्या केंद्रीय समितीमधील एक पद दिलं आणि नंतर कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
येडियुरप्पा यांच्या प्रभावामुळे 2018च्या विधानसभा निवडणुकीत तेच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, हे निश्चित झालं होतं. त्यावर भाजपच्या केंद्रीय समितीनेही शिक्कामोर्तब केलं.
"भाजप आणि इतर पक्षांना काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती. पण येडियुरप्पा पक्षापासून वेगळे झाल्यानं पक्षाला चांगलाच फटका बसला होता," असं कर्नाटकमधले ज्येष्ठ नेते एस. प्रकाश यांनी स्पष्ट केलं.
पक्ष प्रवक्ते वामन आचार्य इतिहासात जायला तयार नाहीत. ते म्हणतात, "जे घडून गेलं ते झालं आता. येडियुरप्पा हे पक्षसंघटनेसाठी हनुमानाप्रमाणे मदत करतील. पूर्ण दक्षिण भारतात भाजपमध्ये स्वत:च्या ताकदीवर संघटना उभी करण्याची क्षमता केवळ येडियुरप्पा यांच्यातच आहे."
यशाचे शिल्पकार
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या प्रचाराची धुरा त्यांनी हाती घेतली. तिकीटवाटपावरुन काही प्रमाणात विरोधही झाला. पण येडियुरप्पांना पक्षश्रेष्ठींचं पूर्ण पाठबळ असल्यानं त्या विरोधाचा काही परिणाम झाला नाही.
"भाजपनं येडियुरप्पा यांचा चेहरा वापरला. त्यांच्यासारखा नेता कर्नाटकमध्ये भाजपकडे नाही. त्यामुळेच त्यांना पुढे करून निवडणुका लढण्यात आल्या," असं ज्येष्ठ पत्रकार विजय गोयल यांचं मत आहे.
एरव्ही 75 ओलांडलेल्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात बसवण्याचा भाजपमधला सध्याचा शिरस्ता आहे. पण, प्रत्यक्ष कर्नाटकात काय वास्तव आहे, याची बरोबर माहिती घेत मोदी-शाह यांनी येडियुरप्पा यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)