कर्नाटक : जिथे आजही पाहुण्यांना चांदीचा आणि दलितांना प्लॅस्टिकचा कप दिला जातो

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

त्यांना काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं. गावात मी आल्याची उडती खबर त्यांना लागली होती. म्हणूनच गावातल्या अय्यंगारांच्या घरी येण्याचं धाडस त्यांनी केलं होतं.

आता आपल्यालासुद्धा व्यक्त होता येईल अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. पडवीत बसून ते आम्हा सर्वांची चर्चा अगदी मन लावून ऐकत होते.

पण खरंच त्यांना माझ्याकडे व्यक्त होता आलं? मी त्यांना समजून घेण्यात कमी पडलो? आमच्यात भाषेचा अडसर होता? कर्नाटकात सर्वत्र हे असंच चालतं?

गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि सगळ्यांच्या नजरा कर्नाटककडे लागल्या. कर्नाटकात नेमकं काय होणार याची उत्सुकता मला सुद्धा लागली आहे. मग एक आठवड्यासाठी का होईना कर्नाटकात जाऊन यायचं मी ठरवलं. कर्नाटकातल्या इतर शहरांसोबतच मी हसनला भेट देण्याचा निर्णय घेतला.

हसन हा जिल्हा आणि आसपासचा परिसर जेडीएस म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचा बालेकिल्ला. या पक्षाची मुहूर्तमेढच इथं रोवली गेली होती.

बसच्या 3 तासांच्या प्रवासातच माझ्या लक्षात आलं की इथं जेडीएसचा किती आणि कसा प्रभाव आहे ते. वोक्कलिगा समाजातली मंडळी इथं मोठ्या प्रमाणात जेडीएसला मतदान करतात. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा त्यांचे सर्वोच्च नेते.

वाटेत बस ज्या ठिकाणी थांबली तिथं पानसुपारीवाल्यापासून ते नारळपाणीवाल्यापर्यंत सर्वंचजण जेडीएसबद्दल चांगलं बोलत होते.

हसनमध्ये गेल्यानंतर तिथल्याच एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सुधन्वा नावाच्या विशीतल्या तरुणानं मला त्याच्या गावात नेण्याचं कबूल केलं. उगाने असं त्याच्या गावाचं नाव. हसन शहरापासून ते साधारण २५ किलोमीटर अंतरावर आहे.

हसन शहर सोडलं तर आजूबाजूच्या सर्व गावांना निसर्गानं भरभरून दिलं आहे.

संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं अंधार जरा उशिराच पडायला सुरुवात होणार होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडं आणि मावळतीचा सूर्य यामुळे उगाने गावातलं ते वातावरण अगदीच निसर्गरम्य वाटत होतं.

मी येणार असल्याची माहिती त्यानं गावात आधीच दिली होती. त्यामुळे त्यांच्या गावातली काही मंडळी मला भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी जमलेली होती.

आपुलकीनं स्वागत

गावातल्या कच्च्या रस्त्यांवरून प्रवास करून आम्ही एका सरकारी शाळेपाशी जाऊन पोहोचलो. 3 खोल्यांची ती शाळा तशी जीर्ण झाली होती. पण गावातल्या गरिबांसाठी तोच एक आधार होता.

शाळेपासून काहीच अंतरावर सुधन्वाचं घर होतं. त्याच्या दारी पोहोचताच लुंगीतल्या एका वयस्कर माणसानं आम्हाला हटकलं. नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर सुधन्वानं त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. मी पत्रकार आहे हे कळल्यावर तर ते माझ्या मागेच लागले. आमच्या शेतात लगचेच चला, आम्ही कशी आधुनिक शेती करतो याची बातमी करा वगैरेवगैरे.

तेवढ्यात सुधन्वाचे वडील त्यांची बैलजोडी घेऊन आमच्या मागून येत होते, त्यांनी आम्हाला आवाज दिला आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेले.

मी सुधन्वाच्या घरात गेलो तेव्हा त्याच्या वडिलांनी माझं स्वागत केलं. गावातली काही प्रतिष्ठित मंडळी आधीच इथं आलेली होती. काही वयस्कर तर काही तरुण. वयस्कर मंडळीनी धोतर नेसलं होतं तर तरुणांनी मात्र जीन्स किंवा पँट घातल्या होत्या. स्मार्ट फोन सर्वांकडे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे वयस्कर मंडळींच्या कपाळावर गंध लावलेलं होतं. तरुणांच्या कपाळावर मात्र ते नव्हतं.

औपचारिक चर्चा झाली, पाणी वगैरे पिऊन झालं पण सुधन्वाची आई कुठेच दिसली नाही. जमलेल्या मंडळींमध्ये सर्व पुरुषच. एकही महिला नव्हती. चौकशी केली तेव्हा कळलं गावातली 70 टक्के जनता ही शहरात राहते. पुरुष दिवसा गावात येऊन शेतीची आणि इतर कामं आटोपून पुन्हा शहरात निघून जातात.

काही गरीब आणि दलित कुटुंब सोडली तर गावात रात्री कुणीच नसतं, असं कळलं.

गावात शाळा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, वीज-पाणी-रस्ते असं सगळं आहे. पण तरी मंडळी गावाबाहेर का राहतात हे विचारल्यावर मुलांना शहरी संस्कार आणि चांगलं शिक्षण मिळावं अशी उत्तरं आली.

पुढे असं सुद्धा कळलं की गावातल्या प्रत्येक घरातली एकतरी व्यक्ती परगावी नोकरीधंद्यानिमित्त गेलेली आहे.

गावातल्या प्रत्येक अय्यंगार कुटुंबातल्या एकाची कुणाची तरी देशातल्या कुठल्या न कुठल्या शहरात बेकरी आहे.

शेती, जेडीएस, मोदी, काँग्रेस, महागाई अशी आमची चर्चा सुरू होती. गावात मी आल्याची खबर एव्हाना गरिबांच्या वस्तीत सुद्धा पोहोचली होती, त्यामुळे इतरही काही लोक मला भेटण्यासाठी दाखल झाले.

दलिताला घरात प्रवेश नाही!

सुधन्वाच्या घराबाहेर चारपाच लोकांची गर्दी झाली. कामगारसदृश दिसणारी ही मंडळी आधी मला भेटण्यासाठी आली आहेत, हे मला काही कळलंच नाही.

माजघरात बसलेल्या लोकांचा आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांचा कानडी भाषेत काहीतरी संवाद झाला. इतर सर्व निघून गेले एक इसम मात्र थांबला.

बाहेर अंधार पसरू लागला होता. रंग सावळा, दाढी वाढलेली, साधं शर्ट आणि पॅंट घातलेला, गळ्यात उपरणं आणि हातात साधा मोबाईल फोन असलेला तो इसम दारात उभं राहून माझ्याकडे पाहू लागला.

माझ्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं होतं.

त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्यांची देहबोली सतत हे सांगत होती. हे लक्षात येताच मी त्यांना आत येण्याचा इशारा केला.

पण माजघरात बसलेल्या लोकांनी मला तो आत येणार नाही असं सांगितलं. त्यांना इशारा केला आणि पडवीत बसण्यासाठी सांगण्यात आलं.

हा प्रकार पाहताच माझ्या लक्षात आलं की आतापर्यंत फक्त जी गोष्ट मी वाचली किंवा ऐकली होती, ती प्रत्यक्षात मला दिसत होती ती म्हणजे अस्पृश्यता....

सुधन्वाकडे तोंड करून त्याला मी काही विचारणार त्याआधीच त्यानं त्याच्या चेहऱ्यावर हतबलतेचे भाव आणले होते.

तोपर्यंत तो इसम पडवीत बसला होता. मी चर्चा पुढे सुरू केली. कुठलंही सरकार आलं तरी कसं ते शेतकऱ्यांच्या विरोधातच वागतं असा चर्चेचा सूर होता.

एव्हाना काळोख पडला होता त्यामुळे काहीनी चर्चेतून काढता पाय घेतला. तेवढ्यात सुधन्वाच्या वडिलांनी सर्वांना कॉफी पिऊन जाण्याचा आग्रह केला.

मी कॉफीला नकार दिल्यानं त्यांनी दूध तरी घ्या असा आग्रह केला आणि ते स्वयंपाक घरात गेले.

थोड्याच वेळात ते एका ताटात ताज्या दुधानं बनवलेल्या कॉफीचे पेले घेऊन आले. ज्यात 2-3 पेले चांदीचे होते, इतर स्टीलचे आणि एक प्लॅस्टिकचा यूज-अँड-थ्रो कप होता.

सर्वांना कॉफी देऊन झाल्यानंतर तो प्लॅस्टिकचा कप पडवीत बसलेल्या त्या इसमास देण्यात आला.

आता मात्र मला राहावलं गेलं नाही, मी थेट पडवी गाठली आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.

सोमशेखर असं त्यांचं नाव असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

ते शेतमजूर असल्याचं त्यांच्या बोलण्यातून मला समजलं. इतर शेतकऱ्यांना मी जे प्रश्न विचारले होते तेच त्यांना विचारायला सुरुवात केली.

दबल्या आवाजात त्यांनी माझ्याशी बोलायाला सुरुवात केली. सुधन्वा सगळं काही अनुवाद करून मला सांगत होता.

रोज रोजगार मिळतो, रेशन दुकानात धान्य मिळतं असं सगळं सांगून झालं.

मुलं कुठे शिकतात असं विचारल्यावर मागच्या बाजूला इशारा करून गावातल्याच शाळेत शिकतात असं उत्तर दिलं.

तुम्हाला शहरात जावंसं वाटत नाही का असं विचारल्यावर, गावात स्वतःचं घर आहे, रोजगार आहे. शहरात ते मिळेलच याची शाश्वती नाही, असं त्यांनी सांगितलं.

आजही अस्पृश्यता

ही चर्चा सुरू असतानाच सुधन्वानं मला सांगितलं, गावातल्या दलितांना दलितांबाबतचे कायदे आणि हक्कांची फारशी माहिती नसते.

अस्पृश्यतेच्या विषयावर इतर लोकांना विचार असं मी सुधन्वाला सांगितलं. पण लहान असल्यानं हे कुणी आपलं याबाबत फार ऐकून घेणार नाही असं तो म्हणाला.

नाराजीच्या सुरात गावातली हीच गोष्ट आपल्याला अजिबात आवडत नाही, असं सुधन्वा पुटपुटला. लगेचच माझ्याकडे तोंड करून, लोकांच्या जातीच्या भावना गावांमध्ये टोकदार असतात. त्यांना त्यावरून दुखावून चालत नाही, असं मला म्हणाला.

आमच्या दोघांची इंग्रजीमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे हे सोमशेखर बघत होता, माजघरात बसलेल्या मंडळींकडेसुद्धा त्याचं लक्ष होतं.

आमच्या चर्चेदरम्यान माजघरातली मंडळी आतूनच कानडीमध्ये काहीबाही सूचना त्यांना करत होती. मला कानडी येत नसल्यानं त्यांचं बोलणं काही कळत नव्हतं. पण त्यांचा एकंदर सूर मात्र गावाबद्दल सर्वकाही चांगलं सांग असाच होता हे माझ्या लक्षात आलं.

सोमशेखर सर्वकाही चांगलंच सांगत होता. गावात काही त्रास आहे का याचं उत्तरही त्यानं चटकन 'नाही' असंच दिलं होतं.

पण त्याच्या डोळ्यांमध्ये मात्र काही वेगळेच भाव होते. त्याला कदाचित व्यक्त व्हायचं होतं, पण भाषेनं अडसर आणला होता का? मला स्वतःला काही क्षणासाठी हतबल असल्यासारखं वाटलं.

तुमचा फोटो काढू का असा प्रश्न विचारल्यावर मात्र तो खूश झाला. आमची ही चर्चा आणि फोटोग्राफी सुरू असताना तिथं जमलेल्या तरुणांची काहीतरी टिंगलटवाळी सुरू आहे हे माझ्या लक्षात येत होतं. पण मी आणि सोमशेखर दोघांनी त्याकडे दुर्लक्ष करत वेगवेगळे फोटो काढले.

जातीच्या विषयावर मौन

या घटनेनंतर मात्र मला याच गावातल्या दलिताच्या घरी जायचं होतं. पण आपण असं स्वतःच्या गावात करू शकत नाही, माझ्या घरच्यांना समजलं तर ते नाराज होतील, अशी भीती सुधन्वानं व्यक्त केली. पण दुसऱ्या गावात आपण जाऊ शकतो, तिकडं कुणी मला ओळखणार नाही असं त्यानं मला सांगितलं.

मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही इतर आणखी गावांमध्ये आणि खासकरून तिथल्या दलित वस्त्यांमध्ये जायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी आम्ही अडगूर गावात गेलो. हसनपासून ते साधारण 45 किमीच्या अंतरावर आहे. या गावातल्या दलित वस्तीत प्रवेश केला तोच तरुणांचा एक घोळका एका कट्ट्यावर बसलेला दिसला.

तो एका बंद दुकानाचा कठडा होता. कोवळं ऊन घेण्यासाठी बहुदा ते सर्वजण तिथं बसलेले असावेत.

सर्वांनी टीशर्ट घातले होते. एकदोघं लुंगीत होते, इतरांनी फुलपँट किंवा ट्रॅकपँट घातली होती. एकादोघांनी चांगली नवी स्टायलिश हेअरस्टाईलसुद्धा केली होती.

त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरू केली. त्यांच्यातले दोघे सोडले तर सर्वजण शेती करत होते. दोघांनी उच्च शिक्षण घेतलं होतं. पण त्यांना नोकरी नव्हती.

सिद्धरामय्या सरकार माणशी 7 किलो धान्या मोफत देत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सोसायटीतून शून्य टक्के व्याजानं पीककर्ज मिळत असल्यानं फायदा होत असल्याचंही ते सांगत होते.

आमची चर्चा सुरू असताना काही चाळिशीतली मंडळीसुद्धा येऊन चर्चेत भाग घेऊ लागली. जातीयतेच्या मुद्द्यावर मी गाडी वळवल्यानंतर मात्र त्यातल्या अनेकांनी न बोलणंच पसंत केलं.

लिंगायत समाजाच्या वेगळ्या धर्माच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यावर, आम्ही यावर काय बोलणार, अशी उत्तरं आली.

या वस्तीत स्वच्छ भारत अभियानाचा एक फलक दिसला, त्याच्या खालीच कचरा पडला होता. त्यावर विचारल्यावर, लोक स्वतःचं घर आणि अंगण स्वच्छ ठेवतात, ही सार्वजनिक जागा आहे इथं कुणी साफसफाई करत नाही, असं सांगण्यात आलं.

ग्रामपंचायतीचे लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या भागात स्वच्छता करतात अशी तक्रार एकानं केली.

एकदोन जण सोडता सर्वांकडे स्मार्ट फोन होते. सर्वजण दररोज सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात असं त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर कायकाय पाहतात हे विचारल्यावर सर्वकाही पाहतो, अशी उत्तरं आली. एकानं मात्र कन्नड चित्रपटाचे ट्रेलर किंवा गाणी यूट्यूबवर पाहत असल्याचं सांगितलं.

हलकीफुलकी चर्चा करताकरता मी दोनदा गाडी जातीयता आणि अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर वळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या तरुणांनी मला काही दाद दिली नाही.

देशातल्या सर्वांत प्रगत राज्यांपैकी कर्नाटक एक आहे. इथे अस्पृश्यता पाहून मला जेवढा धक्का बसला, त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य मला या गोष्टीचं वाटलं की या विषयावर पुढे येऊन बोलण्याची शक्तीही इथल्या दलितांमध्ये दिसली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)