You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऐका हो ऐका : आपलं अर्ध शरीर माणसाचं नाही म्हणे!
- Author, जेम्स गॅलाहर
- Role, प्रेझेंटर, द सेकंड जीनोम, बीबीसी रेडिओ 4
हे नीट ऐका. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 'आपलं अर्ध शरीर माणसाचं नाही' असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती काढला आहे.
शरीरात असलेल्या एकूण पेशींपैकी फक्त ४३% पेशी या मानवी पेशी असतात. तर बाकीच्या असतात त्या मायक्रोस्कोपिक कॉलनिस्ट अर्थात सूक्ष्मदर्शी निवासी.
आपल्यात दडलेल्या या अर्ध्या भागाच्या-आपल्या मायक्रोबाइमच्या-आकलनामुळे, आता ऍलर्जीपासून ते पार्किन्सनपर्यंत कितीतरी रोगांबाबतचे आपले समज वेगानं बदलत आहेत. (शरीर किंवा त्यातल्या विशिष्ट भागातील सूक्ष्मजीव किंवा त्या विशिष्ट पर्यावरणातील सूक्ष्मजीवांची एकत्रित जेनेटीक अर्थात अनुवांशिक सामग्री म्हणजेच मायक्रोबाइम)
आता तर या क्षेत्राकडून अगदी "मानवी" असणं म्हणजे नेमकं काय, यासारखे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत आणि परिणामी नाविन्यपूर्ण उपचारांच्या दिशेनं ही वाटचाल सुरू आहे.
"ते तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत," मॅक्स प्लॅंक इन्स्टीट्यूटमधील मायक्रोबाइम विज्ञान विभागाचे संचालक प्राध्यापक रुथ ले सांगतात. "तुमचं शरीर म्हणजे फक्त तुम्ही नसता," ते सांगतात.
तुम्ही कितीही स्वच्छ शरीर धुवा, पण तुमच्या शरीरातला जवळपास प्रत्येक कानाकोपरा हा सूक्ष्मजीवांनी माखलेला असतो.
यामध्ये जीवाणू, विषाणू, बुरशी आणि आर्कीआ (सुरुवातीला त्यांचे जीवाणू म्हणून चुकीचे वर्गीकरण करण्यात येत असे) यांचा समावेश असतो. ऑक्सिजनपासून वंचित असलेल्या अंधकारमय आतड्यांमध्ये या सूक्ष्म जीवनाचे सर्वांत मोठे केंद्रीकरण झालेले असते
"तुम्ही माणसापेक्षाही जास्त सूक्ष्मजंतूच आहात," कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो विद्यापीठातले प्राध्यापक रॉब नाइट यांनी बीबीसीला सांगितलं.
सुरुवातीच्या काळात असा विचार केला जात होता की, मानवी पेशींच्या तुलनेत ही संख्या (सूक्ष्मजीवांची संख्या) दहा पटींनी जास्त होती.
"त्यामध्ये सुधारण करून हे प्रमाण १:१ इतक्या जवळ आलं आहे, त्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार, जर तुम्ही सर्व पेशींची गणना केलीत, तर तुम्ही सुमारे ४३% मानवी आहात," ते सांगतात.
पण अनुवांशिकपणे आपण अजून कितीतरी कमी आहोत.
मानवी जीनोम - मानवासाठी अनुवांशिक सूचनांचा संपूर्ण संच - हा जीन्स अर्थात जनुकं या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वीस हजार सूचनांनी बनलेला असतो. पण आपल्या मायक्रोबाइममधल्या सगळ्या जनुकांना एकत्र करा आणि ही संख्या दोन ते वीस दशलक्ष सूक्ष्मजीव जनुकांएवढी होते.
कालटेकचे प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सर्कीस माझमानियन यांचा युक्तिवाद असा आहे की, "आपल्याकडे फक्त एक जीनोम नसतो, आपल्या मायक्रोबायॉमची जनुके ही प्रामुख्यानं दुसरे जीनोम असतात, जी आपली स्वतःची क्रियाशीलता वाढवतात."
ते पुढे असंही म्हणतात की, "माझ्या मते, आपला स्वतःचा डीएनए अधिक आपल्या पोटामधील सूक्ष्मजीवांचा डीएनए यांचे मिश्रण आपल्याला मानवी बनवते."
आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवत असलेल्या सूक्ष्मजीव सामग्रीचा शरीराशी कसलाच परस्परसंबंध नसेल किंवा तिचा शरीरावर कसलाच परिणाम होणार नाही, असा विचार करणं भाबडेपणाचं ठरेल.
पचनक्रिया, रोगप्रतिकारक यंत्रणेचं नियंत्रण, रोगांपासून संरक्षण आणि महत्त्वाच्या जीवनसत्वांची निर्मिती करणे या कामांमध्ये मायक्रोबाइम निभावत असलेल्या भूमिकेचा विज्ञानाकडून वेगानं उलगडा होत आहे.
प्राध्यापक नाइट म्हणतात, "अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपण या गोष्टीचा विचारही केला नसेल, पण हे लहानसे जीव किती प्रकारे आपले आरोग्य पूर्णपणे बदलून टाकत आहेत, याचे मार्ग आता आपल्याला सापडत आहेत."
सूक्ष्मजीवांच्या जगाबाबत विचार करण्याचा हा नवा मार्ग आहे. आजपर्यंत सूक्ष्मजीवांबरोबरचे आपले नाते हे प्रामुख्याने एकप्रकारच्या युद्धासारखंच होतं.
सूक्ष्मजीवांची रणभूमी
देवी, मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस किंवा एमआरएसए यांसारख्या आजारांविरोधात लढताना प्रतिजैविकं आणि रोगप्रतिबंधक लसी या दोन्ही गोष्टी आक्रमक शस्त्राप्रमाणे वापरल्या गेल्या आहेत.
ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव वाचलेसुद्धा आहेत.
पण, काही संशोधकांना मात्र या गोष्टीची चिंता आहे की, वाईट गोष्टींवर केलेला हल्ला आपल्या "चांगल्या जीवाणूंचेही" अगणित नुकसान करून गेला आहे.
माझ्याशी बोलताना प्राध्यापक ले म्हणाले, "गेल्या पन्नास वर्षांमध्ये संसर्गजन्य रोग दूर करण्याच्या दृष्टीनं आपण जबरदस्त कामगिरी केली आहे. पण, ऑटोइम्युन रोग आणि ऍलर्जी यामध्ये प्रचंड आणि भयानक वाढ झालेली आपल्याला दिसून आली आहे."
"मायक्रोबाइमवर काम करताना आपण हे पाहत आहोत की, रोगकारक जंतूंशी लढताना मिळालेल्या यशाचा परिणाम म्हणून मायक्रोबाइममध्ये झालेले बदल, हे नव्या रोगांच्या संचासाठी कारणीभूत ठरले आहेत."
आतड्यांना सूज, पार्किन्सन्स यासारखे आजार, कर्करोगावर औषधं काम करतात की नाही आणि अगदी डिप्रेशन आणि ऑटिझम यांच्याशीही मायक्रोबाइम जोडले गेले आहेत.
लठ्ठपणा हे आणखी एक उदाहरण. यामध्ये कुटुंबाचा इतिहास आणि आपली जीवनशैली यांची भूमिका निश्चितपणे महत्त्वाची असतेच, पण मग पोटातील सूक्ष्मजीवांचे काय?
इथे कदाचित संभ्रम निर्माण होऊ शकतो.
बर्गर्स आणि चॉकलेटचा आहार हा लठ्ठपणाचा धोका आणि तुमच्या पचनमार्गात वाढणारे ठराविक प्रकारचे सूक्ष्मजीव या दोघांवरही परिणाम करेल.
तर मग, जीवाणूंचे वाईट मिश्रण तुमच्या अन्नाचे ज्याप्रकारे मेटॅबोलायझिंग करत आहे, त्यामुळे लठ्ठपणा वाढतोय का, हे तुम्हाला कसं समजतं?
केवळ कल्पना करु शकतो अशा अतिशय स्वच्छ वातावरणात जन्मलेल्या उंदरांवर प्राध्यापक नाइट यांनी काही प्रयोग केले.
त्यांचं संपूर्ण अस्तित्व हे सूक्ष्मजीवांपासून पूर्णपणे मुक्त होतं.
"आम्ही हे दाखवून देऊ शकलो की, जर तुम्ही सडपातळ आणि लठ्ठ व्यक्ती घेतल्यात आणि त्यांची विष्ठा घेतलीत आणि त्यातील जीवाणूंचे उंदरांमध्ये रोपण केलेत तर त्या मायक्रोबाइमनुसार तुम्ही त्या उंदराला बारीक किंवा लठ्ठ करु शकता," ते सांगतात.
लठ्ठवर बारीक जीवाणूंचं रोपण केले तर त्यानंसुद्धा उंदरांचे वजन कमी करण्यास मदत झाली,"हे खूपच आश्चर्यकारक आहे, पण माणसांमध्ये हे प्रत्यक्षात आणता येईल का, हा आता प्रश्न आहे?"
सूक्ष्मजीव हे नवीन प्रकारचे औषध ठरु शकते, ही या क्षेत्रासाठी मोठी आशेची गोष्ट आहे. याला म्हणतात "ड्रग्ज म्हणून बग्जचा" उपयोग.
माहितीची सोन्याची खाण
मी वेलकम ट्रस्ट सॅंगर इन्स्टीट्यूट येथे डॉ. ट्रेव्होर लॉली यांना भेटलो. या ठिकाणी ते निरोगी रुग्णांमधील संपूर्ण मायक्रोबाइम आजारी लोकांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
"उदाहरण द्यायचे झाले तर आजारी अवस्थेत काही जंतू गहाळ असतात, अशा वेळी ते पुन्हा शरीरात आणण्याची ही संकल्पना आहे," ते सांगतात.
डॉ. लॉली सांगतात की एखाद्याचे मायक्रोबाइम दुरुस्त केल्यानं अल्सरेटीव्ह कोलायटीससारखे, जो एक प्रकारचा आतड्यांचा आजार आहे, जो खरोखरच बरा करता येऊ शकतो.
आणि ते पुढे सांगतात, "मला वाटतं की आम्ही अभ्यास करत असलेल्या बऱ्याच आजारांसाठी रोगजंतूंचे मिश्रण ठराविक असणार आहे, कदाचित १० ते १५ असतील जे रुग्णाच्या शरीरात जात आहेत."
सूक्ष्मजीव औषध हे अजून प्राथमिक अवस्थेत आहे, पण काही संशोधकांच्या मते मायक्रोबाइमची तपासणी ही लवकरच दैनंदिन कार्यक्रम बनेल, ज्याद्वारे आपल्या आरोग्याबाबतच्या माहितीची सोन्याची खाण खुली होईल.
प्रा. नाइट सांगतात, "हा विचार करणेच अविश्वसनीय आहे की, तुमच्या एक चमचा विष्ठेमध्ये त्या सूक्ष्मजीवांच्या डीएनएबाबत एवढी माहिती असेल, जेवढी साठवण्यासाठी एक टन डीव्हीडीसुद्धा कमी पडू शकतील."
"तुम्ही ज्या ज्या वेळी ही विष्ठा नष्ट करता, त्या त्या वेळी हा माहितीसाठाही नष्ट करत असता,"ते म्हणतात.
"आमच्या स्वप्नाचा हा पण एक भाग आहे की, नजीकच्या भविष्यात, ज्या क्षणी तुम्ही फ्लश कराल, त्याक्षणी एक प्रकारची त्वरित तपासणी केली जाईल आणि तुम्ही चांगल्या दिशेने जाताय की वाईट, ते तुम्हाला सांगितलं जाईल."
"हे माझ्या मते खऱ्या अर्थानं परिवर्तनीय असणार आहे."