सागरी जीवसृष्टीच्या रक्षणासाठी मेक्सिकोत 'मरीन पार्क'

रे मासे, देवमासे आणि आणि समुद्री कासवांचं घर असणाऱ्या एका बेटांच्या समूहाभोवती मेक्सिको सरकारने एक सागरी संरक्षित क्षेत्र तयार केलं आहे.

रेव्यीहेडो नावाचा द्वीपसमूह मेक्सिकोच्या दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला आहे. ही बेटं ज्वालामुखीच्या लाव्हा खडकापासून बनली आहेत.

दीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा परिसर उत्तर अमेरिकेतलं सगळ्यात मोठं सागरी संरक्षित क्षेत्र आहे.

या परिसरात सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी घालण्यात आलेली असून, मेक्सिकोचं नौदल इथे गस्त घालेल.

व्यावसायिक मासेमारीची झळ बसलेल्या स्थानिक जनतेला याचा फायदा होईल अशी आशा आहे.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिके पेन्या निएतो यांनी हे संरक्षित क्षेत्र बनवण्याचं फर्मान काढलं. इथे असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननावर तसंच नवीन हॉटेल्सच्या बांधकामावरही याद्वारे बंदी आणण्यात येईल.

बाहा कॅलिफोर्निया या द्वीपकल्पापासून 400 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या द्वीपसमूहाचं वर्णन उत्तर अमेरिकेचा गॅलापागोस असं केलं जातं. या बेटांचं ज्वालामुखीय स्वरूप आणि अद्वितीय परिसंस्था याला कारणीभूत आहे.

या बेटांजवळ दोन सागरी प्रवाह एकत्र येतात, त्यामुळे इथे अनेक स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

असंख्य सागरी जीवही इथे सापडतात. हंपबॅक व्हेल मासे इथल्या उथळ पाण्यामध्ये मुद्दाम प्रजननासाठी येतात.

गेल्या वर्षी या बेटांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिलं.

मेक्सिकोतल्या वर्ल्ड वाईल्डलाइफ फेडरेशनच्या संवर्धन संचालक मारिया होसे विलानुएवा यांनी युनेस्कोचा या निर्णयामुळे 'महत्त्वाचा पायंडा' पडेल असं म्हटल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे.

2015 साली चिलीनं यापेक्षाही मोठं संरक्षित क्षेत्रं जाहीर केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)