You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समुद्रात रात्री चमकणाऱ्या निळ्या दिव्यांचं रहस्य काय?
- Author, मिशेल डग्लस
- Role, बीबीसी अर्थ
समुद्र जितका दिवसा सुंदर दिसतो, त्याहीपेक्षा तो रात्री जास्त मनमोहक असतो. समुद्राच्या पाण्यावर जेव्हा चंद्राची किरणं पडतात, तेव्हा तो समुद्र एखाद्या रुपगर्वितेसारखा भासतो.
समुद्रात असे अनेक सजीव आहेत, जे दिवसा बाहेर न येता फक्त रात्रीच बाहेर येतात.
रात्री जेव्हा समुद्राच्या लाटा रोरावत किनाऱ्यावर धडकतात, तेव्हा त्यांसोबत निळ्या रंगाचे अगणित दिवे किनाऱ्यावर येतात.
प्रश्न असा पडतो की समुद्रात हा चमचमणारी निळी प्रकाशकिरणे येतात तरी कुठून?
किरणं सोडणारे बॅक्टेरिया
खरंतर समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो.
समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकत असतात.
हे जीव कॅरेबियन देशांतील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दिसतात. रात्रीच्या वेळी यांची चमक दिसते.
विशेष करून रात्री समुद्रातून जहाज किंवा मोठा प्राणी जातो तेव्हा यांची चमक दिसते. काही वेळा डाईनोफ्लॅगेटसची संख्या वाढते.
त्यावेळी ते लालसर रंगाचे होतात. त्यावेळी त्यांना लाल ज्वर ही म्हणतात. यातील काही विषारीही असतात.
रात्रीच्यावेळी समुद्र काहीवेळा दुधी रंगाचा दिसतो. त्याला 'मिल्की सी' म्हटले जाते. 1915 ला मिल्की सी दिसला होता.
हिंदी महासागरात जावा आणि इंडोनेशियाच्या समुद्रकाठी हे दृश्य पाहता आलं होतं.
'मिल्की सी'चं रहस्य
याला मात्र डाईनोफ्लॅगेट्स जबाबदार नसतात. किरणं सोडणारे बॅक्टेरिया समुद्राच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यामुळे समुद्र सफेद रंगाचा दिसतो.
जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर हे बॅक्टेरिया जमा होतात, तेव्हा समुद्राने जणू काही बर्फाची दुलई घेतली आहे, असा भास होतो.
निर्सगाचा हा खेळ अभ्यासण्याची संधी संशोधकांना फार कमी वेळा मिळाली आहे.
2005 ला संशोधकांना 'मिल्की सी'च्या काही सॅटेलाईट इमेज मिळल्या होत्या. हे दृश्य तीन दिवस टिपता आलं होते.
चमचमणारे मासे
खोल समुद्रात राहणाऱ्या अनेक जीवांत निळा प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. काही जीवांची फक्त शेपूट चमकते, तर काही जीवांचं सारं शरीरच चमकत असते.
काही माशांचं पूर्ण शरीरच चकचकत असतं, तर काही माशांचे फक्त डोळे चमकतात. रात्रीच्या अंधारात समुद्राच्या खोलीत हा एकच प्रकाशाचा स्त्रोत असतो.
संशोधनानुसार ज्या जीवांत प्रकाश निर्माण करण्याची क्षमता नसते ते प्रकाश निर्माण करणाऱ्या जीवांशी जमवून घेतात.
चंद्राप्रकाशाचा परिणाम
चंद्रप्रकाशाचं रोमँटिक वर्णन कवितांतून येत असतं. पण चंद्रप्रकाशाचा परिणाम फक्त कवींवरच होतो असं नाही तर समुद्रातील जीवांवरही होतो.
ऑस्ट्रेलियातील 'ग्रेट बॅरीयर रीफ'वर चंद्रप्रकाशाचा होणारा परिणाम फारच रोमँटिक असतो.
प्रवाळांच्या 130 प्रजातींचा मीलन काळ वसंत ऋतूमध्ये एका रात्री याच चंद्रप्रकाशात असतो. प्रवाळांच्या या जाती एका वेळी अनेक अंडी देतात आणि शुक्राणू सोडतात.
जवळपास एक तासाच्या आत ही क्रिया घडते. शास्त्रज्ञांच्या मते हे दृश्य पाहण्यासारखं असतं.
चंद्रप्रकाशात प्रवाळांना एकत्र येण्याचा सिग्नल मिळतो. असं मानलं जातं की प्रवाळांत फोटोरिसेप्टर असतात.
प्रकाशाची वेगवेगळी रुपं ती पकडू शकतात. त्यामुळं त्यांना अंडी आणि शुक्राणू सोडण्यात मदत होते.
चांदणं सीलसाठी घातक का?
चंद्रप्रकाश जितका प्रवाळांना उपयुक्त आहे, तितकाच तो सीलसाठी घातक ठरतो. कारण शार्कसारखे खतरनाक मासे त्यांच्यावर हल्ले करतात.
2016 ला झालेल्या अभ्यासानुसार पौर्णिमेच्या रात्री बाहेर पडणाऱ्या सीलवर शार्कवर हल्ले होण्याची शक्यता जास्त असते.
चंद्रप्रकाशात पृष्ठभागाकडे ओढले जाणाऱ्या सीलवर खाली वाट पाहत असलेले सील हल्ला करतात.
सीलवर शार्कचे सर्वात जास्त हल्ले सूर्योदयानंतरच्या काहीवेळात होतात. पण हीच पहाट जर पौर्णिमेची असेल तर मात्र हे हल्ले कमी होतात.
दिवसा समुद्राच्या तळाशी राहणारा जंबो स्क्विड रात्रीच्या अंधारात अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतो. सूर्यास्त होताच ते समुद्राच्या पृष्ठभागावर येतात.
सूर्योदय होताच ते परत तळाशी जातात. हे प्राणी 5 ते 13 मीटर लांब असताता आणि त्यांचा रंग चमकदार लाल असतो. म्हणून त्यांना रेड डेव्हिल म्हणतात.
स्क्विड त्याच्या भूजांनी भक्ष्याला पकडतो आणि फाडून खातो. स्क्विड माणसांवर सहसा हल्ला करत नाही.
समुद्राच्या आतील जग खरंच अधिक सुंदर, रंगतदार आहे. चंद्रप्रकाशात तर समुद्राच्या देखणेपणाला 'चार चाँद' लागतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)