प्रकाश प्रदूषण : कृत्रिम प्रकाशाची सद्दी मानवजातीला घातक

    • Author, व्हिक्टोरिया गिल
    • Role, विज्ञान पत्रकार, बीबीसी न्यूज

अवकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या नवीन छायाचित्रांनुसार, प्रकाश प्रदूषणाचा अतिरेक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे रात्रीचा नैसर्गिक प्रकाश हरवत चालल्याचं सिद्ध झालं आहे. रात्रीचं पीठूर चांदणं झगमगत्या कृत्रिम प्रकाशासमोर फिकं ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

2012 ते 2016 या कालावधीत पृथ्वीचा बाह्य भाग कृत्रिम प्रकाशाने बाधित होण्याचं प्रमाण दोन टक्क्यांनी वाढलं असल्याचं अभ्यासाद्वारे स्पष्ट झालं आहे.

प्रकाश प्रदूषणामुळे बहुतांशी देशांमध्ये झाडं, वनस्पती, वेली, प्राणी, पक्षी, वन्यजीव ही परिसंस्था आणि मानवजातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

'सायन्स अॅडव्हेंचर्स' या शोधपत्रिकेत संशोधकांच्या एका गटाचं प्रकाश प्रदूषणासंदर्भातलं लिखाण प्रसिद्ध झालं आहे.

या चमूने नासाचा उपग्रह - रेडिओमीटरने पाठवलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. कृत्रिम प्रकाशाचा रात्रीच्या नैसर्गिक प्रकाशावर होणारा परिणामाचा अभ्यास करण्याकरताच हा उपग्रह पाठवण्यात आला आहे.

प्रत्येक देशातलं प्रकाश प्रदूषणाचं प्रमाण वेगवेगळं आहे. अमेरिका आणि स्पेन या देशांमधलं प्रकाश प्रदूषणाचं प्रमाण स्थिर आहे. मात्र दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशांमध्ये प्रकाश प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढते आहे.

युद्धग्रस्त सीरिया आणि येमेन या देशांमध्ये कृत्रिम प्रकाशाचं आक्रमण कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

चमचमते समुद्रकिनारे आणि विविध अत्याधुनिक प्रकाशाने झळाळून निघणाऱ्या शहरांची छायाचित्रं प्रेक्षणीय असतात. मात्र हा प्रकाश माणसाच्या आरोग्याला घातक आहे.

माझं आभाळ तुला दे

  • अमेरिकन मेडिकल असोसिएशनने अतिप्रकाशमान, मात्र चुकीची संरचना असणारं एलईडी लायटिंग पर्यावरणासाठी घातक असल्याचं जाहीर केलं. कमी प्रकाशाची उपकरणं वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहन दिल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं. झोप येण्यासाठी मेंदूत स्रवणाऱ्या मेलाटोनिन या संप्रेरकावर निळ्या प्रकाशाचा परिणाम होत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
  • नेचर या विज्ञानविषयक शोधपत्रिकेत काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार कृत्रिम प्रकाश परागीभवनाच्या प्रक्रियेकरता प्रतिकूल ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे. निशाचर कीटक परागीकरण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, पण या कीटकांना कृत्रिम प्रकाश अडथळा ठरतो.
  • कृत्रिम प्रकाश असणाऱ्या परिसरातील झाडांची फळ आणि बीजधारण प्रक्रिया नैसर्गिक प्रकाशात वाढणाऱ्या झाडांच्या तुलनेत एक आठवडा लवकर होते, असं इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे.
  • कृत्रिम प्रकाशामुळे रात्री स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याचं यंदा प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे.

कृत्रिम प्रकाश अर्थात प्रकाश प्रदूषणाचा सभोवतालच्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम होतो, असं पोस्टडॅमस्थित 'जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्स'चे शास्त्रज्ञ ख्रिस्तोफर क्याबा यांनी सांगितलं.

सधन देशांमधली शहरं तसंच औद्योगिक परिसरामध्ये प्रकाश प्रदूषणात घट होईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो. विकसित देशांनी नारिंगी रंग परावर्तित करणाऱ्या सोडियम प्रकाशाऐवजी ऊर्जासंवर्धक आणि पर्यावरणस्नेही एलईडीचा प्रस्ताव अंगीकारला आहे.

अमेरिकेत प्रकाश प्रदूषणाची पातळी स्थिर राहिली आहे मात्र इंग्लंड आणि जर्मनीत मात्र हे प्रमाण वाढलं आहे.

माणसं पाहू शकतात असा निळाशार प्रकाश सॅटेलाइट पूर्णत: टिपू शकत नाही. हाच निळा प्रकाश प्रदूषणात भर घालतो आणि वातावरण प्रकाशमान करतो. धोकादायक निळा प्रकाश दिसण्याची मानवाची क्षमता प्रत्यक्षात धोकादायक ठरत आहे.

माणसं कृत्रिम प्रकाशाचा थररुपी पट्टा स्वत:वर ओढवून घेत आहेत, असं एक्सटेर विद्यापीठाचे प्राध्यापक केव्हिन गॅस्टॉन यांनी सांगितलं.

कमी प्रकाश, निकोप दृष्टी

आकाशातले ताऱ्यांचं विश्व दिसू शकेल असं रात्रीचं निरभ्र आकाश युरोपात सापडणं दुरापास्त झालं आहे. पर्यावरणावर पर्यायाने मानव जातीवर याचा घातक परिणाम होईल, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हे नुकसान भरून काढणं अतिशय अवघड असल्याचं गॅस्टन यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, "आवश्यक ठिकाणी प्रकाशाची व्याप्ती पोहोचवणं आणि अतिरिक्त ठिकाणाहून प्रकाशाची पातळी कमी करणं अशी दुहेरी जबाबदारी मनुष्य प्रजातीवर आहे."

अनेक शहरांमधला झगमगाट आपण कमी करू शकतो आणि यामुळे दृश्यमानतेची पातळी कमी होण्याची काहीही शक्यता नाही. कारण माणसाच्या डोळ्याचं काम विरोधाभासी प्रतिमांच्या माध्यमातून चालतं. त्याला अतिरिक्त प्रकाशाची गरज नसते, असंही गॅस्टन यांनी स्पष्ट केलं.

"दिखाऊपणासाठी वापरण्यात येणारा झगमगाट कमी केल्यास मानवजातीचं भलं होऊ शकतं. तसं झालं तर ऊर्जासंवर्धनही होऊ शकेल. मात्र आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील माहितीचा आढावा घेतल्यास चित्र विरोधाभासी आहे", असं ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)