देवेंद्र फडणवीस : ब्राह्मण महासंघाचा आरोप ‘भाजपामध्ये ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं सुनियोजित कारस्थान’

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

ब्राह्मण महासंघाने सुद्धा या निर्णयावर रोष व्यक्त केला आहे. त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविन्द कुलकर्णी यांनी एक निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय,

"पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतू हटवण्यासाठी नितीन गडकरीच्या चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्या नंतर गेलं तीन वर्षापासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडवण्याकरिता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.

"आत्ता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहोचवलं नंतर मा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रिपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं ठरवल्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आलं आहे. भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं एक सुनियोजित कारस्थान चाललेलं निदर्शनास येत आहे. याघटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे," कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

भाजपची नवी खेळी?

एकनाथ शिंदेंना बळ देण्यासाठी भाजपनं देवेंद्र फडणवीसांचा बळी दिलाय. भाजपची ही नवी रणनीती आहे. त्यातून येणाऱ्या निवडणुकांत विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व्यक्त करतात.

त्या सांगतात, "निवडणुकीच्या राजकारणात जात महत्त्वाची असते. एकनाथ शिंदे मराठा आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि शिवसेनेत त्यांनी स्वत:चं बहुमत सिद्ध केलंय. या गोष्टी भाजपला येणाऱ्या निवडणुकीसाठी फायदेशीर वाटत आहेत. एकनाथ शिंदेंचा वापर करून मुंबई आणि ठाणे महापालिका काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतोय. यासाठी मग भाजपनं एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षा वाढवल्या आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं."

"दुसरं म्हणजे भाजपला शिवसेनेला नेस्तनाबूत करायचं आहे. जोवर सेना संपत नाही, तोवर भाजप राज्यात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मग एकनाथ शिंदेंना भाजपनं बळ दिल्याचं दिसून येत आहे."

भाजपचे नेते काय म्हणतात? 

देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीबाबत आम्ही भाजपचे नेते आणि प्रवक्ते यांना थेट प्रश्न विचारला. पण फडणवीस यांच्या नाराजीबाबत कोणीच बोलण्यास तयार नाही. बीबीसीशी बोलताना नाव न घेण्याच्या अटीवर एक भाजप नेता म्हणाला, "या प्रश्नांबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील फडणवीस यांच्याशी चर्चा करून उत्तर देतील." 

राजभवनातील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

त्यातील एक नेता नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाला, "उपमुख्यमंत्री बना असा पक्षाचा आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हालाही धक्का बसला. देवेंद्र यांना पक्षाच्या या निर्णयाबाबत बहुधा काहीच माहिती नव्हती. ते पूर्णत: धक्का बसल्यासारखे होते. त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर निघून गेले."

भाजप नेते पुढे सांगतात, "फडणवीस मंत्रीमंडळाच्या बाहेर असतील हे मान्य, कारण ते मुख्यमंत्री राहिले आहेत. पण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हे त्यांनाही अनपेक्षित होतं." जो व्यक्ती मुख्यमंत्री राहिलाय त्याला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, नक्की काय झालं काहीच कळायला मार्ग नाही, असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं.  

राजभवनात शपथविधीनंतर बीबीसीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सूचना केली. फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश सर्वतोपरी मानून शपथ घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यासाठी देश प्रथम आहे." राज्याच्या विकासासाठी आपला अनुभव शिंदे यांच्या पाठीशी उभा करा अशी सूचना दिल्याचंही ते पुढे म्हणाले.

तर भाजपचे नेते खासगीत सांगतात, देवेंद्र उपमुख्यमंत्री बनणार हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. पण, पक्ष श्रेष्ठींच्या दबापापुढे आणि आदेशापुढे त्यांचं फारसं काही चाललं नसावं. त्यामुळे त्यांना पद स्विकारावं लागत आहे.

राज्यसभा आणि विधानरिषदेच्या यशानंतर भाजपने मोठं सेलिब्रेशन केलं होतं. पण देवेंद्र उपमुख्यमंत्री होऊनही भाजपने जल्लोष केलेला नाही.

उपमुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण आहे, असं विश्लेषण नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने करतात.

ते सांगतात, "हा फडणवीसांचा पंख छाटण्याचा प्रयत्नच आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याचं जाहीर केल्यावर त्यांची प्रतिमा उचांवणारी होती. ते कदाचित केंद्रीय नेतृत्वाला आवडलं नसेल. हे एक प्रकारे फडणवीसांचं खच्चीकरण आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या माणसाला मुख्यमंत्रिपद नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं म्हणजे त्यांच्या क्षमतांचं अवमूल्यन आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)