देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरून नाराज आहेत का?

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Eknath Shinde Offfice

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनला राजभवनात एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी कॅबिनेटची बैठकही घेतली. 

फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेत. पण, त्यांच्या ट्विटरवर बायोवर अजूनही उपमुख्यमंत्री असं लिहिण्यात आलेलं नाही. याउलट 'महाराष्ट्र सेवक' लिहिलेलं दिसून येतंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून ट्विटरवर 'महाराष्ट्र सेवक' असंच लिहिलेलं आहे. 

उपमुख्यमंत्रीपदाबाबत नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. "मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचं पालन करतो," असं त्यांनी ट्विटवर म्हटलंय. पण भाजपचे नेते खासगीत सांगतात, उपमुख्यमंत्रीपद हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांसाठी मोठा धक्का होता.

भाजपने असा निर्णय अचानक का बदलला याबाबत बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "भाजपचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत असतो." 

तर आशिष शेलार यांनी कोणतीही नाराजी नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र नेहमीच्या शैलीत चिमटा काढत, "उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र यांनी फार आनंदाने स्विकारली नाही. त्यांचा चेहरा सांगत होता," असं वक्तव्य केलंय. 

राजकीय वर्तुळात आणि भाजपत चर्चा सुरू झालीये की देवेंद्र नाराज आहेत. भाजपचे नेते फडणवीस यांच्या नाराजीबद्दल कोण बोलणार याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देतायत. 

देवेंद्र फडणवीस यांचा ट्विटरवर बायो काय सांगतो? 

देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

त्यानंतर आम्ही त्यांचा ट्विटरवर बायोडेटा तपासून पाहिला. देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर बायोवर अजूनही 'महाराष्ट्र सेवक' असंच दिसून येतंय. तर ऑफिस ऑफ देवेंद्र या ट्विटरवर उपमुख्यमंत्री असं लिहीण्यात आलंय. त्यांनी स्वत:च्या ट्विटरवर उपमुख्यमंत्री असं लिहीलं नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. 

फडणवीस नाराज आहेत या चर्चेला दुसरा आधार म्हणजे त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून उपमुख्यमंत्री बनण्याचे देण्यात आलेले निर्देश. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देताना "मी या सरकारच्या बाहेर असेन. बाहेरून या सरकारचं कामकाज पाहिन आणि मदत करेन," असं देवेंद्र म्हणाले होते. 

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होत होतं की ते शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्यास उत्सूक नाहीत. त्यापेक्षा पक्षाच्या बाहेर राहून सरकारवर पकड त्यांना ठेवायची आहे. पण, तरी देखील पक्ष नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आदेश दिले. 

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत प्रसारमाध्यमांना काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरूवारी शपथ घेतल्यानंतर "एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे."

राजकीय जाणकार सांगतात, "देवेंद्र पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. याउलट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नाही. ठाण्याबाहेर त्यांना फारसं कोणी ओळखत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची नाराजी असावी." 

भाजपचे नेते काय म्हणतात? 

देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीबाबत आम्ही भाजपचे नेते आणि प्रवक्ते यांना थेट प्रश्न विचारला. पण फडणवीस यांच्या नाराजीबाबत कोणीच बोलण्यास तयार नाही. बीबीसीशी बोलताना नाव न घेण्याच्या अटीवर एक भाजप नेता म्हणाला, "या प्रश्नांबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील फडणवीस यांच्याशी चर्चा करून उत्तर देतील." 

राजभवनातील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

त्यातील एक नेता नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाला, "उपमुख्यमंत्री बना असा पक्षाचा आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हालाही धक्का बसला. देवेंद्र यांना पक्षाच्या या निर्णयाबाबत बहुधा काहीच माहिती नव्हती. ते पूर्णत: धक्का बसल्यासारखे होते. त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर निघून गेले."

भाजप नेते पुढे सांगतात, "फडणवीस मंत्रीमंडळाच्या बाहेर असतील हे मान्य, कारण ते मुख्यमंत्री राहिले आहेत. पण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हे त्यांनाही अनपेक्षित होतं." जो व्यक्ती मुख्यमंत्री राहिलाय त्याला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, नक्की काय झालं काहीच कळायला मार्ग नाही, असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं.  

राजभवनात शपथविधीनंतर बीबीसीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सूचना केली. फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश सर्वतोपरी मानून शपथ घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यासाठी देश प्रथम आहे." राज्याच्या विकासासाठी आपला अनुभव शिंदे यांच्या पाठीशी उभा करा अशी सूचना दिल्याचंही ते पुढे म्हणाले.

तर भाजपचे नेते खासगीत सांगतात, देवेंद्र उपमुख्यमंत्री बनणार हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. पण, पक्ष श्रेष्ठींच्या दबापापुढे आणि आदेशापुढे त्यांचं फारसं काही चाललं नसावं. त्यामुळे त्यांना पद स्विकारावं लागत आहे.

राज्यसभा आणि विधानरिषदेच्या यशानंतर भाजपने मोठं सेलिब्रेशन केलं होतं. पण देवेंद्र उपमुख्यमंत्री होऊनही भाजपने जल्लोष केलेला नाही.

राजभवनात काय झालं? 

गुरूवारी दुपारी राजभवनात मी मुख्यमंत्री बनणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील असं म्हणत फडणवीस यांनी सर्वानाच धक्का दिला. सर्वात मोठा धक्का भाजपच्या नेत्यांना बसला. कारण, देवेंद्र मुख्यमंत्री बनतील अशी सर्वांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेक नेत्यांनी खासगीत आश्चर्य व्यक्त केलं. 

फडणवीस यांच्या नाराजीबाबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, "देवेंद्र फडणवीस नाराज आहेत हे स्पष्ट आहे. गेली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रयत्न करत होते. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत." 

पण, भाजप नेत्यांना दुसरा धक्का बसला जेव्हा पक्ष नेतृत्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी "आम्ही फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या असे निर्देश दिले आहेत," असं वक्तव्य केलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी देखील फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिलीये. 

अभय देशपांडे पुढे म्हणाले, "उपमुख्यमंत्री पदापेक्षा एकवेळ सरकारच्या बाहेर राहणं देवेंद्र फडणवीस यांना जास्त आवडलं असतं."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणताना आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाही देवेंद्र फारसे सकारात्मक दिसत नव्हते. त्यांची देहबोली बदललेली दिसत होती. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणतात, "देवेंद्र यांची बॉडी लॅंगवेज पॉझिटिव्ह नव्हती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतानाही त्यांना धक्का बसलाय हे दिसत होतं."

ते पुढे सांगतात, "देवेंद्र यांची राजकीय उंची वाढतेय. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला हे मान्य नसावं. त्यामुळे बाहेरून सरकारला मदत यालाही अमित शाह यांनी खो घातला आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनण्याचे निर्देश दिले. भाजपने फडणवीस पक्षाच्या हायराकीमध्ये वर गेले होते त्यांना खेचून खाली आणलंय."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)