मुंबई आरे जंगलात आधी वृक्षतोड, मग आग - कोरोना लॉकडाऊनमध्येही संघर्षाची गोष्ट

फोटो स्रोत, ANI
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात एकीकडे मुंबईतले रस्ते ओस पडले आहेत, कुठे त्यावर फुलांचा सडा किंवा मोर अवतरल्याचे फोटोजही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.
बहरलेल्या निसर्गाचा असा सोहळा सुरू असताना मुंबईच्या आरे कॉलनीत वृक्षतोड आणि अतिक्रमणाच्या घटनाही समोर आल्या आहेत. नेमकं आरे कॉलनीत काय सुरू आहे? तिथे राहणारे आदिवासी लॉकडाऊनमध्ये कसे जगत आहेत?
"आरेमध्ये राहतो आहोत ही खूप समाधानाची गोष्ट आहे. वातावरण एवढं चांगलं आहे इथे उन्हाळा असूनही," आरे कॉलनीतल्या प्रजापूर पाड्यात राहणाऱ्या आशा भोये लॉकडाऊनमधल्या दिवसांविषयी सांगतात.
आशा भोये घराबाहेर फिरू शकतायत, मोकळ्या हवेत श्वास घेतायत. "शहरात बिल्डिंगमध्ये राहणारे माझे मित्र मैत्रिणी म्हणतात, की तुम्ही खूप सुखी आहात. त्यांना घरातल्या घरात कोंडल्यासारखं झालंय. आमचं त्यापेक्षा बरं आहे," त्या सांगतात.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

शहराच्या मध्ये असूनही हा परिसर एरवीही बऱ्यापैकी शांत असतो. मुंबईच्या मेट्रो तीन प्रकल्पासाठी इथे कारशेड प्रस्तावित आहे आणि ती उभारण्यासाठी गेल्या वर्षी इथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यावरून आरेमध्ये आंदोलनही झालं. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे.
पण आता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आरेमध्ये लोकांची, गाड्यांची वर्दळ जवळपास थांबली आहे आणि हवेतलं प्रदूषणही घटलंय. फक्त पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो आहे. माणसांवर संकट आलं असलं तरी जंगलासाठी हे थोडंस वरदान ठरलं आहे का? असाच प्रश्न पडावा.
केलटीपाड्यावर राहणारे प्रकाश भोईरही ही शांतता मनात साठवून ठेवत आहेत. ते म्हणतात, "बरेचसे प्राणी स्वैर वावरताना दिसतायत. पक्षी तर इतके येतायत, की विचारायला नको."

फोटो स्रोत, Prkash Bhoir
लॉकडाऊन असलं, तरी प्रकाश यांच्यासारखे अनेकजण शेतीच्या कामात गुंतले आहेत. भाजी लावणं, नवी झाडं लावणं, बाकीची उन्हाळी काम सुरू आहेत. जुने दिवस परत आल्यासारखं वाटतंय, पण त्याचवेळी कोरोना विषाणूचं संकट दरवाज्यापर्यंत आल्यानं त्यांना चिंताही वाटते.


ते सांगतात, "खरं तर आतल्या आता आम्ही क्वारंटाईनसारखेच आहोत, पाड्यावर लोक लॉकडाऊन पाळताना किंवा फारसं मास्क वापरताना दिसत नाही. पण आम्ही सगळेच एका कुटुंबासारखे मिळून राहतो. बाहेरचं कुणी येणार नाही आणि आतलंही कुणी कामाशिवाय बाहेर जाणार नाही, याकडे लक्ष देतो. बाहेर जाताना, कामाला जाताना, शेतावर जाताना मात्र लोक मास्क वापरताना दिसत आहेत."
अन्नाचा, आरोग्याचा प्रश्न
लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीच्या दिवसांत लोकांची बरीच अडचण झाली. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही होता. शेतावर जाताना, भाजीपाला घेण्यासाठी जातानाही पोलीस अडवायचे.

"काही काळ धान्य मिळत नव्हतं. दुकानं एकदोन तास सुरू असतात. खायच्या बऱ्याच गोष्टी आता मिळत नाहीयेत. पण रेशनवर गहू तांदूळ मिळतात," असं आशा भोये सांगतात. "गावदेवी पाड्याजवळ माझ्या भावाचं शेत आहे, तिथं त्यानं भाजी लावली आहे. मार्केट बंद असलं तर तिकडेच आम्ही शेतात भाजी आणायला जातो."
पण सगळेच एवढे नशीबवान नाहीत. काही जणांना अन्नाची टंचाई जाणवत होती. त्याविषयी प्रकाश भोईर सांगतात, "आम्ही मुंबईतले आदिवासी आहोत. इथे बऱ्याचशा सेवाभावी संस्था-संघटना आहेत आणि पाड्यावरचेच गट आहेत. ते कुठलेही लोक उपाशी राहणार नाही याची काळजी घेत आहेत."

फोटो स्रोत, Radhika javheri
'सेव्ह आरे' चळवळीच्या अमृता भट्टाचारजी सांगतात, की या कामात मुंबईचे नागरीकही मदत करत आहेत. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांना गहू आणि तांदूळ अत्यल्प किंवा मोफत दरात मिळत आहे. पण बाकीच्या गोष्टींची कमतरता जाणवत होती. तेव्हा महापालिकेच्या पी साऊथ प्रभागातल्या तहसीलदार स्मिता मोहिते यांनी देणगीद्वारे पैसा उभा केला आणि आठशे कुटुंबांना डाळ, तेल, मसाले पुरवण्यात आले आहेत.
पण जंगलात दुर्गम भागात उलटन पाड्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आजही दुकानांपर्यंत येणंही शक्य होत नाहीये. अशात कुणी आजारी पडलं तर काय करायचं, हा प्रश्न आहेच.
आरेमध्ये पुन्हा वृक्षतोड आणि अतिक्रमणाच्या घटना
लॉकडाऊनच्या काळातही आरे कॉलनीत काही ठिकाणी वृक्षतोड, अतिक्रमणं आणि आग लागण्याच्या घटना घडत असल्याचं गेल्या दीड महिनाभरात समोर आलं आहे. सेव्ह आरे आंदोलनात सहभागी झालेल्या 'वनशक्ती' संघटनेनं ही गोष्ट लक्षात आणून दिली असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही आवेदन दिलं आहे.

वनशक्तीचे स्टालीन दयानंद त्याविषयी माहिती देतात. खरं तर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं आरे कॉलनीत कुठेही वृक्षतोड करण्यावर बंदी घातली आहे.
"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं सरकारचं, सगळ्यांचंच कर्तव्य आहे. पण युनिट तीनजवळ झोपडपट्टीचं अतिक्रमण वाढत असून जागा हडपण्याचे प्रयत्न होत आहेत. आरेमध्ये एकूण पाच ठिकाणी अतिक्रमण, वृक्षतोड अशा घटना होत असल्याचं दिसून आलं आहे. आम्ही मुख्यमंत्री, पर्यावरण खात्याचे सचिव, वनविभाग या सगळ्यांकडे तक्रार केली असून सर्वोच्च न्यायालयात interlocutory application केलं आहे."
वनशक्तीच्या या आवेदनावर अजून सुनावणी व्हायची आहे. आरेमध्ये लागलेल्या आगीची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरवर दखल घेतली होती.

फोटो स्रोत, Twitter
दरम्यान, प्रत्येक झोपडपट्टीचं GPSनं मार्किंग करून व्हीडियो द्वारा निगराणी ठेवली तर अशा घटना टाळता येतील आणि जंगल सुरक्षित ठेवता येईल, असं स्टालिन यांना वाटतं.
लॉकडाऊनमुळे सध्या आरेमध्ये फारशी वर्दळ नसून, कार्यकर्तेही तिथे जाऊ शकत नाहीत. पण अतिक्रमण करणाऱ्यांना पूर्ण सूट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वृक्षतोडीवर आक्षेप घेणाऱ्या एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरावर काही दिवसांपूर्वी हल्लाही झाला होता.
आरे प्राधिकरणाशी आमचा संपर्क होऊ शकला नाही, पण पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी समोर आणलेल्या घटनांची दखल घेत असल्याचं 'आरे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
"आम्ही स्थानिक पोलिस स्टेशनला पत्र लिहून अनोळखी व्यक्तींविरोधात झाडं तोडल्याबद्दल FIR दाखल करण्यास सांगितले आहे. ही प्रक्रिया सुरू आहे," असं ते म्हणाले होते. "वणव्याच्या घटना आमच्या आखत्यारीत येत नाहीत. अतिक्रमण झालेलं नसून, स्थानिकांनी युनिट तेरा आणि युनिट सोळामधला रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तो अडथळा हटवला असून आमच्या सुरक्षारक्षकांना कडक निगराणी ठेवण्यास सांगितलं आहे."
'आता तरी जंगलात अतिक्रमण वाढवू नका'
लॉकडाऊनमध्येही वणवा आणि वृक्षतोडीच्या घटना समोर आल्यानं प्रकाश भोईर यांच्यासारखे आरेमधले रहिवासी व्यथित झाले आहेत. "सध्याच्या परिस्थितीत सगळेच कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळं काही प्रमाणात दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. आम्हीही लक्ष ठेवून असतो, पण अशा घटना घडतच आहेत."
तर कधी वाडी, शेत साफ करताना लोक गवत जाळतात, त्यातून आग लागू शकते. असा पाचोळा न जाळता खत म्हणून वापरला जावा, अशी सूचना प्रकाश करतात. इथलं जंगल राखायलाच हवं असं त्यांना वाटतं.
"कोरोनाविषाणूचा उगम प्राण्यांपासून झाला, असं शास्त्रज्ञ सांगतात, प्राण्यांच्या अधिवासात होणाऱ्या अतिक्रमणांमुळे काय होऊ शकते, त्याचे परिणाम आपण सध्या भोगतो आहोत. तरीही लोक झाडं तोडत असतील, तर काय म्हणायचं? आपल्या गरजा किती कमी असू शकतात, हे लॉकडाऊननं लोकांना दाखवलं आहे. या काळात आता लोकांमध्ये थोडा निसर्गाकडे बघण्याचा कल वाढला आणि त्यातून जागृती होत असेल तर उत्तम ठरावं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त









