कोरोना लॉकडाऊनमध्ये ऐनवेळी तुरुंगातून सुटलेल्या माणसाची गोष्ट

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गौतम बुद्धनगर येथील कैद्यांना 8 आठवड्यांच्या पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लॉकडाऊननं सर्व स्तरातील माणसांवर सर्व बाजूंना आघात केलाय. अनेकांचं जगणं विस्कटून गेलंय. मूळचा रायगड जिल्ह्यातील असलेल्या आरिफची (नाव बदलेलं आहे) कहाणीही अशीच आहे.

31 मार्च रोजी आरिफची नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहातून सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी आरिफ आतूर झाला होता. पण लॉकडाऊननं त्याच्या वाटेत असंख्य अडचणी निर्माण केल्या.

तुरुंगातून सुटल्यानंतर पुढच्या पंधरवाड्यात त्याला दोन शहरातून तीन वेळा हाकलण्यात आलं. अखेर आरिफ बेघरांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवाऱ्यात गेला. तिथूनही काही दिवसांत तो निघला आणि आता एका मित्राच्या घरात क्वारंटाईन झालाय. स्वत:च्या घरी मात्र तो अद्यापही परतला नाहीय.

आरिफची जशी कहाणी हृदयद्रावक आहे, तशीच कहाणी ऐन लॉकडाऊनमध्ये तुरुंगातून सुटलेल्या अनेकांची आहे.

कोरोना
लाईन

आरिफ 32 वर्षांचा आहे. टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करायचा. गेल्या सहा महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. मोबाईल चोरीप्रकरणी त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खरंतर 15 हजार रुपयांचा दंड भरून आरिफला सहा महिन्यांची शिक्षा टाळता आली असती, मात्र तेवढे पैसे भरण्याएवढे पैसेही आरिफच्या कुटुंबाकडे नव्हते. त्यामुळं त्याला सहा महिने तुरुंगातच खितपत पडावं लागलं.

पॅरोलवरील कैदी

फोटो स्रोत, Getty Images

आता सहा महिन्यांनी सुटला, तर लॉकडाऊनमध्ये अडकला. घरीही पोहोचता येत नाहीय.

लॉकडाऊनचा फटका बसलेला आरिफ हा काही एकमेव कैदी नाहीय. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्सच्या आकडेवारीनुसार, भारतात लॉकडाऊनमध्ये तुरुंगातून बाहेर आलेल्या कैद्यांची संख्या 22 हजारांहून अधिक आहे. कुणी वैयक्तिक जातमुचलक्यावर बाहेर आलंय, तर कुणी पॅरोलवर.

आरिफला मदत करू पाहणाऱ्या एका संस्थेमुळं आम्हाला ही कहाणी कळली. त्याच्यापर्यंत थेट पोहोचणं अशक्य झालं. तसंही, भारतात आजच्या घडीला हजारो जणांबाबत घडलंय, आरिफ त्यातला एक.

आरिफ किंवा त्याच्यासारखे अनेक स्त्री-पुरुष कैदी आहेत. याचं कारण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर भारताच्या सुप्रीम कोर्टानं अधिकची गर्दी असलेल्या तुरुंगातून गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार काही कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू नये, असा त्यामागे हेतू होता.

भारतात 1339 कारागृह आहेत आणि त्यात सुमारे साडेचार लाख कैदी आहेत. त्यातील 69 टक्के कैदी खटला सुरू होण्याचीच वाट पाहतायेत.

न्यायाधीशांनी म्हटलंय की, ज्या कैद्यांना सात वर्षांपर्यंतची शिक्षा झालीय आणि ते शिक्षा भोगत आहेत, त्यांना सोडलं जाऊ शकतं. तसंच, ज्या कैद्यांचा अजून खटलाही सुरू झाला नाहीय, त्यांनाही सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो.

तुरुंगअधिकारी

फोटो स्रोत, Getty Images

आरिफला ज्या दिवशी सोडलं, त्या दिवशी त्याला नेण्यासाठी कुणीच आलं नव्हतं.

आरिफ मूळचा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातला. तळोजा तुरुंगापासून साधारण 200 किलोमीटर दूर. आरिफच्या वडिलांचं गेल्यावर्षीच निधन झालं. आरिफ खूप दारू पितो, असा आरोप करत पत्नीनं त्याला सोडलंय.

त्याचा दिव्यांग असलेला भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. मात्र, हातात पुरेसे पैसे नसल्यानं तोही येऊ शकला नव्हता. त्याची आजारी म्हातारी आई घरी असते. गेल्या सहा महिन्यांपासून घराचं भाडंही देणं तिला जमलं नाहीय. शेजारी तिला जेवायला देतात.

तुरुंगातून सुटल्यानंतर आरिफ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ट्रकमधून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावापर्यंत पोहोचला खरा, पण घराच्या शेजारच्या लोकांनी त्याला विरोध केला.

"तो मुंबईतून आलाय. आम्ही त्याला इथे घेऊ शकत नाही," असं शेजारी म्हणाले.

मुंबई सध्या कोरोना व्हायरसचं देशातील सर्वांत मोठं हॉटस्पॉट बनलंय.

आरिफ तसाच मागे फिरला. निघताना आईकडून 400 रूपये आणि एक मोबाईल घेतला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गाडीत बसला. त्या चालकाला त्यानं 200 रूपये दिले आणि तो पुन्हा मुंबईला आला. तुरुंगात ओळख झालेल्या एका कैद्याच्या घरी आला.

या कैद्यानं आरिफला बेघरांना ठेवण्यात येणाऱ्या निवाऱ्याबद्दल सांगितलं होतं. मात्र, इथल्या शेजाऱ्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि तिथून हाकलून लावलं.

"आरिफ आता रस्त्यावर आलाय. त्याच्या आईनं मला विनंती केलीय की, आरिफसाठी लवकरात लवकर काहीतरी कर," असं 'प्रयास'चे सामाजिक कार्यकर्ते मनोहर फणसेकर सांगतात. प्रयास हा TISS चा फिल्ड प्रोजेक्ट आहे.

आरिफला बेघरांसाठीच्या निवाऱ्यात ठेवण्यात आलं. मात्र, 30 एप्रिलच्या रात्री आरिफ तिथून पळाला आणि पुन्हा घरी जाण्यास निघाला.

"मला घरी जायचंय. प्रत्येकजण घरी जातोय. मला थोडे पैसे द्या आणि मला जाऊद्या. माझी आई मला बोलवतेय," असं आरिफ रात्री पळून जाण्याआधी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्याला बोलला होता.

मात्र, गावात पोहोचल्यानंतर पुन्हा तेच झालं. त्याला घरात ठेवण्यास शेजाऱ्यांनी विरोध केला.

मग आरिफ शहरातच राहणाऱ्या मित्राकडे गेला.

गेल्या आठवड्यात आरिफ दारू प्यायला आणि आईला पाहण्यासाठी रिक्षा घेऊन त्याच्या घरात गेला. तिथं रिक्षावाल्याशी बाचाबाची झाली आणि त्यात रिक्षाला थोडं खरचटलं.

आता त्या रिक्षाचालकाची नुकसानभरपाई देण्यासाठी आरिफचं कुटुंब चार हजार रूपये जमवण्याचा प्रयत्न करतेय. आरिफ तिथून मित्राच्या घरी परतला, अलगीकरण झालाय आणि दारूही पितोय.

लॉकडाऊनदरम्यान कैद्यांना सोडणं हे तितकसं सोपं नाहीय. अनेकजण घरीही जाऊ शकत नाहीत.

ज्या दिवशी आरिफ तुरुंगातून सुटला होता, त्याच दिवशी दोन मुलांची आई असलेली एक निराधार महिलाही सुटली होती. तिला सोबतच्या एका कैद्यानं मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या घरात आसरा दिला. तुरुंगातून सुटेपर्यंत ते एकमेकांना ओळखतही नव्हते.

लातूर जिल्ह्यात भाड्यानं गाडी घेऊन एका सामाजिक कार्यकर्त्यानं 24 कैद्यांना आपापल्या घरात पोहोचवलं.

तुरुंगात चिंता आणि अलगीकरण वाढत चाललंय. तुरुंगातून सोडण्याची अनेकांनी मागणी केलीय. हिंसेच्या घटनाही तुरुंगात घडल्यात.

मार्चमध्ये कोलकाता शहरातील तुरुंगात एक कैद्याचा मृत्यू, तर 28 जण जखमी झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नाहीय. "कुटुंबीयांना भेटणं म्हणजे कैद्यांसाठी सकारात्मक बाब असते. कुटुंबीयांसोबतचा संवाद तुटल्यानं कैदी भावनिकरित्या दुखावलेत," असं कॉमनवेल्थ ह्युमन राइट्सच्या मधुरिमा धनुका सांगतात.

जे कैदी आजारी आहेत, त्यांना सोडण्यात यावं, अशी मागणी अनेक समाजसेवी संस्थांनी केलीय. प्रयाससारख्या संस्था कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामही करू पाहतायत. सोडण्यात आलेल्या कैद्यांना घरापर्यंत सोडणं, त्यांना धान्य देणं, रोख रक्कम देणं अशी मदत प्रयाससारख्या संस्था करतायेत.

तुरुंगातील गर्दी कमी व्हावी, असं सुप्रीम कोर्टाला वाटतंय. मात्र, लॉकडाऊनचे नियम तोडल्यानं आणखी अनेक जणांना तुरुंगात डांबलं जातंय.

प्रयास प्रोजेक्टचे संचालक विजय राघवन यांच्या माहितीनुसार, आपण केवळ पाच ते दहा टक्के कैदी सोडले आहेत. अजूनही कारागृहात प्रचंड गर्दी आहे.

जगातली स्थिती पाहिल्यास लक्षात येईल की, अनेक देशांमध्ये कारागृह कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनलेत.

मुंबईतल्या ऑर्थर रोड कारागृहातील 2600 कैद्यांपैकी 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तसंच, कारागृहातील 26 अधिकाऱ्यांनाही संसर्ग झालाय. सातारा जिल्ह्यातील कारागृहात एका कैद्याला कोरोना झालाय.

कैद्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्ही योग्य ती व्यवस्था करत आहोत, अशी माहिती कारागृह अधिकारी दीपक पांडे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)