You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : डाळिंब पिकवून लाखो कमावणाऱ्या अपंग शेतकऱ्याची प्रेरणाकथा
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तेरा वर्षांपूर्वी बनासकांठातील शेतकरी डाळिंबाची शेती करण्याचा विचारच करू शकत नव्हते. पण आता, गुजरातमधील हा भाग डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे.
एवढंच नव्हे तर, राज्यात डाळिंबाच्या शेतीत या जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला आहे. याचं श्रेय जातं गेनाभाई पटेल या शेतकऱ्याला. गेनाभाई स्वतः पोलिओग्रस्त आहेत. पण ते आज या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचं प्रेरणास्थानी आहेत.
बनासकांठात नजर जाईल तिथं सगळीकडे डाळिंबाच्या बागा दिसतात. त्या बागांच्या वर पक्ष्यांना चकवण्यासाठी चकाकत्या पट्टया लावण्यात आल्या आहेत. त्या लक्ष वेधून घेतात.
डाळिंबाच्या बागांनी सगळं शिवार फुलून गेलं आहे, त्याचं श्रेय जातं ते गेनाभाई पटेल या 53 वर्षांच्या शेतकऱ्याला. गेनाभाईंनी अपंगत्वावर मात करत इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली आहे.
गेल्या 12 वर्षांत इथल्या 35 हजार हेक्टर जमिनीवर डाळिंबांच्या लाखो रोपांची लागवड करण्यात आली आहे. बनासकांठातून श्रीलंका, मलेशिया, दुबई आणि संयुक्त अमिराती इथं डाळिंब निर्यात होतात.
एस. डी. कृषी विद्यापीठातले डॉ. के. ए. ठक्कर यांच्या मते, "गेनाभाईंनी वैज्ञानिकांच्या मदतीनं स्वत: डाळिंबाची शेती सुरू केली. शिवाय, आसपासच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डाळिंबाच्या शेतीचे प्रशिक्षण वर्गही भरवले. तिथं शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकमेकांशी चर्चा सुरू झाल्या."
कोणीही त्यांच्याकडे शेतीविषयी मदत मागितली की, मार्गदर्शन करण्यासाठी गेनाभाई तडक गाडी घेऊन निघतात.
बनासकांठात सरकारी गोडिया या गावात गेनाभाईंचं घर आहे. घराच्या ओटीच्या भींतींवर सगळीकडे वेगवेगळ्या समारंभातील फोटो लावलेले आहेत.
गेनाभाईंच्या मातीनं लिंपलेल्या घराभोवती डाळिंबाच्या बागा आहेत.
बागांमध्ये बांबूच्या टेकूच्या आधारानं उभ्या राहिलेल्या झाडांवर डाळिंब लगडलेली दिसतात. दवाचा फटका बसू नये म्हणून डाळिंबाना कापडही गुंडाळण्यात आलेलं दिसतं.
कारण दवामुळे डाळिंब काळी पडतात, त्याचा मागणीवर परिणाम होतो.
बारावीनंतर ट्रक्टर चालवला
पोलिओमुळे अपंगत्व आल्यानं लहानपणी गेनाभाईंना भावाच्या खांद्यावर बसून शाळेत ये-जा करावी लागायची.
पोलियोमुळे शेतात काम करणं शक्य होणार नाही, असं वाटल्यानं आईवडिलांनी त्यांना शिक्षणावर लक्ष द्यायला सांगितलं. ते बारावीपर्यंत शिकले. पण पुढे काय करायचं हे ठरत नव्हतं.
त्याचवेळी भावाला ट्रॅक्टर चालवताना पाहिलं आणि तेच शिकण्याचं गेनाभाईंनी ठरवलं.
क्लचही हातांनी वापरता येईल असं हॅण्डल तयार करण्यात आलं. काही काळानं ट्रॅक्टरची सगळी कामं तेच करू लागले.
"मी नेहमी सकारात्मक विचार करतो. एखादी गोष्ट होऊ शकत नाही, असा मी विचारच करत नाही. लोक जे काम करतात त्यातील मी काय करू शकतो, याचाच मी विचार करतो, " गेनाभाई सांगतात.
जेवता जेवता गेनाभाईंनी त्यांच्या कामाची माहिती दिली. शुद्ध तूप लावलेली बाजरीची भाकरी, बटाट्याची भाजी, कढी आणि शिरा असा जेवणाचा बेत होता.
आधी भाव मिळाला नाही
महाराष्ट्रातून 2004मध्ये गेनाभाईंनी डाळिंबाची रोपं लागवडीसाठी आणली. तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. घाबरवून सोडलं.
अखेर डाळिंबाचं पीक आलं. आता ते विकण्याचा प्रश्न होता. आसपासचे लोक फारच कमी भाव देत होते. त्याचवेळी एका कंपनीनं डाळिंबांना 42 रुपये किलोचा भाव दिला. गेनाभाईंना लाखोंचा फायदा झाला.
ठिबक सिंचनाचा फायदा
डाळिंबाना ग्राहक शोधासाठी गेनाभाईंना त्यांच्या भाच्याची मदत झाली. त्यानं इंटरनेटवर जाहिरात केली आणि ग्राहकांची रांग लागली.
सन 2010मध्ये 80 टन डाळिंबाला 55 रुपये किलोंचा भाव मिळाला. 40 लाखापर्यंतची विक्री झाली.
त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळालं. ठिबक सिंचनाचा डाळिंबाला चांगलाच फायदा झाला.
पाकिस्तानशी व्यापाराचा मार्ग हवा
गेल्या 26 जानेवारीला सकाळीच त्यांना दिल्लीहून फोन आला. पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. प्रथम त्यांना हा विनोद वाटला, पण पत्रकारांचे फोन येऊ लागल्यावर खात्री पटली.
त्यांच्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो आहे. ते म्हणतात, वाघा बॉर्डरप्रमाणेच, 100 किमींवर गुजरातमध्येही पाकिस्तानात व्यापारास जाण्यासाठी आणखी मार्ग असावा. तसं ते पत्र लवकरच पंतप्रधानांना पाठवणार आहेत.
(बीबीसी पॉप-अप या उपक्रमात लोकांना बीबीसीनं कोणती बातमी करावी याची विचारणा केली होती. त्यात आलेल्या सूचनेवर ही बातमी आधारित आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)