You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bitcoin : बिटकॉईन म्हणजे नेमकं काय? ब्लॉकचेन म्हणजे काय?
बिटकॉईन नेमकं काय आहे? आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय?
जुलै 2020 मध्येही बिटकॉईन चर्चेत आलं होतं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम म्हटलं गेलं होतं.
याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती.
क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?
अगदी सोप्या शब्दांत - क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं नसतं.
कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते.
मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.
जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत.
बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करतंय.
यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती.
बिटकॉईन म्हणजे काय?
बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे.
बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.
जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.
ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.
जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.
2017 पर्यंत जगभरातल्या एक लाखांहून अधिक सुपरमार्केट चेन्स आणि मोठ्या दुकानदारांनी बिटकॉईनमध्ये व्यवहारांना मान्यता दिली होती.
भारतातही इन्फोसिसच्या इन्फोसिस फिनॅकल या सबसिडरी कंपनीनं ब्लॉकचेनच्या माध्यमातून व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे.
जवळ जवळ सगळेच शेअर बाजार हे नियामक संस्थांकडून चालवले जातात. म्हणजे व्यवहारांवर नियामक मंडळाचं लक्ष असतं. पण इथं तसं नाही.
बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात. आणि त्यावर इतर कुणाचंही नियंत्रण नसतं.
हे सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो.
बिटकॉईनचे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत- एक म्हणजे क्लासिक बिटकॉईन किंवा BCT, ज्याचा सर्रास वापर होतो. आणि दुसरा म्हणजे हार्डफोर्क बिटकॉईन कॅश किंवा BCH.
शिवाय क्लासिक बिटकॉईनची 1, 0.1, 0.01, 0.001 अशी डिनॉमिनेशनही आहेत. म्हणजे कमी मूल्याचे बिटकॉईन तुम्ही खरेदी करू शकता.
याशिवाय इथेरिअम, लाईटकॉईन, रिपल, डॅश, मोनेरो, डॉजकॉईन अशा अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. पण त्या बिटकॉईनच्या जवळपासही नाहीत. शिवाय त्यांची विश्वासार्हताही नाही.
बिटकॉईनचे फायदे काय?
बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.
कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.
पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होऊ शकते. त्यासाठी सगळ्यांत सोपा गेट वे आहे.
जगभरात अनेक वित्तीय संस्था बिटकॉईनचे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातही रिझर्व्ह बँक त्याबाबतीत सकारात्मक आहे. पण ही तरतूद ट्रेडिंग नाही तर ऑनलाईन व्यवहारांसाठी आहे. त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते.
सध्या रशिया आणि अर्जेंटिना वगळता इतर देशांमध्ये बिटकॉईन व्यवहार सुरू आहेत.
यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.
तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्युटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.
ब्लॉकचेन म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं.
ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत Chain of Blocks - किंवा रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते.
आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो. ही माहिती एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर बदलता येत नाही.
माहिती एका कुलुपबंद पेटीत ठेवून अशा अनेक पेट्या एकात एक ठेवण्यासारखं हे असतं. त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करता येणं खूपच कठीण होतं.
परिणामी हे व्यवहार अतिशय सुरक्षित होतात आणि ही यंत्रणा हॅक करणं शक्य नसतं.
ऑनलाईन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सगळ्यात सुरक्षित मानलं जातं.
शिवाय त्यामध्ये गुप्तता आहे. आणि व्यवहार फक्त दोन व्यक्ती किंवा संगणकांदरम्यान होतो. त्यामुळे त्यावर इतर कुणाचं नियंत्रण नसतं. म्हणूनच ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले जातात.
भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का?
व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिलीय.
एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती.
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे आणि इतकंच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचं म्हणणं होतं. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला केला.
हे काही सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींसाठीचं मूल्य क्रिप्टोकरन्सीने भरता येणार नाही.
पण हे चलन आभासी आहे, गोपनीय आहे आणि एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या अॅड्रेस मार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात.
या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो.
शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचं वा सरकारचं नियंत्रण वा लक्ष नसतं. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
पण जमेची बाजू म्हणजे डिजीटल करन्सी असल्याने फसवलं जाण्याची शक्यता उरत नाही.
पण इंटरनेटवरून व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बिटकॉईन्स स्वीकारायला सुरुवात केलेली आहे.
पण ज्यांच्याकडे बिटकॉईन्स आहेत ते बहुतेकजण याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात कारण या बिटकॉईन्सचं मूल्य प्रचंड आहे आणि ते सतत बदलत असतं. यातून मोठे रिटर्न्स मिळतात.
या बिटकॉईनचं मूल्य 2019च्या वर्षभरात 900 टक्क्यांनी वाढलं आणि अनेकजण या बिटकॉईन्समुळे श्रीमंत झाले.
आता ही बिटकॉईन्स मुख्य प्रवाहात हळुहळू यायला लागलेली आहेत आणि जगभरात साधारण 1 ते 2 कोटी लोक हे बिटकॉईन वापरत असल्याचा अंदाज केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॉ. गॅरिक हॅलिमन यांनी व्यक्त केलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)