You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
HIV वर मात करणाऱ्या रत्ना यांचं स्वित्झर्लंडमध्ये व्याख्यान
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी
लग्नानंतर काही वर्षातच नवऱ्याचा HIVने मृत्यू झाला. त्यानंतर 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्यानं दम तोडला. या आघातामुळे मग त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण नशीबात काही औरच लिहिलं होतं.
आज त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली आणि सर्वांना अचंबित केलं. ही कहाणी आहे रत्ना जाधव यांची.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातलं टाकळी खंडेश्वरी नावाचं एक गाव. इथल्या रत्ना जाधव यांचं वयाच्या 15व्या वर्षीच एका वाहनचालकाशी लग्न झालं.
आपल्या नवऱ्यासोबत त्यांनी पनवेलला संसार थाटला. पण लग्न होऊन दीड वर्ष झालं नाही, तोच त्यांचे पती सारखे आजारी पडू लागले. त्याचवेळी रत्ना गरोदर राहिल्या.
नवव्या महिन्यात रत्ना बाळंतपणासाठी माहेरी आल्या असताना तिकडं पनवेलमध्ये नवऱ्याची तब्येत आणखी खालावू लागली. दरम्यान रत्ना यांना मुलगा झाला.
मुलगा काही आठवड्यांचा असतानाच रत्ना यांची सासू त्यांच्याच्याकडे आली आणि रत्ना यांना घाईघाईनं पनवेलला घेऊन गेली.
पण नवऱ्याला झालं काय?
पनवेलला पोहोचल्यावर रत्ना यांना धक्काच बसला. नवऱ्याच्या आजारपणामुळे केलेल्या तपासणीत त्याला HIV असल्याचं उघड झालं होतं.
रत्ना हादरूनच गेल्या. आता त्यांचीही HIV चाचणी करावी लागणार होती.
रत्ना यांची मुंबईत तपासणी झाली आणि दुर्दैवानं त्यांची भीती खरी ठरली. रत्नालाही नवऱ्यापासून HIVचं संक्रमण झालं होतं. तिथून सुरू झाला एक अत्यंत वेदनादायी आणि खडतर प्रवास.
रत्ना यांच्याच तोंडून ऐकायचं तर, "आम्हा नवरा-बायकोला HIV असल्याचं कळल्यावर पहिला धक्का बसला तो पनवेलमध्ये. आम्ही ज्या सोसायटीत राहत होतो ती सोसायटी सोडावी लागली. आमच्या आजाराबद्दल कळल्यानंतर काही लोकांनी आमच्या तिथं राहण्याला आक्षेप घेतला."
"मग आम्ही माझ्या नवऱ्याच्या बीड जिल्ह्यातल्या गावी आलो. तिथं काही दिवस राहिलो नाही तोच गावातल्या लोकांचा त्रास सुरू झाला. सासरच्यांनाही वाटू लागलं की आम्ही त्यांच्यासोबत राहायला नको. शेवटी आम्हाला गाव सोडून शेताचा आसरा घ्यावा लागला."
"हळूहळू नवऱ्याची प्रकृती आणखीनच ढासळू लागली. एका दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनं हात लावायलाही नकार दिला. अखेर 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला," असं रत्ना सांगतात.
सगळीकडूनच उपेक्षा
नवरा गेला आणि मग सासरच्यांनी रत्ना यांना त्यांच्यासोबत राहू दिलं नाही. म्हणून त्या माहेरी आल्या आणि आईसोबत राहू लागल्या.
"पण आईच्या मैत्रिणींनी तिला HIVबद्दल भीती घातली, 'हिला सोबत ठेवलं तर तुम्हालाही आजार होऊ शकतो'," रत्ना सांगतात.
"मग आईलाही भीती वाटू लागली की माझ्यामुळे माझ्या भावंडांना HIV होईल. आई मला लांबच ठेऊ लागली. अखेर मी माझ्या बाळाला घेऊन वेगळी राहू लागले."
"सुरुवातीला घरकामाला, शेतावरच्या कामाला जाऊ लागले. पण काही दिवस काम केल्यानंतर माझ्या आजाराबाबत त्यांना कळलं की तेही काम हातातून जायचं," जुन्या आठवणी त्या सांगत होत्या.
काही दिवस त्यांची अक्षरश: उपासमार झाली. मग रोजगार हमीचं काम मिळालं.
मग एके दिवशी, बाळ 11 महिन्यांचं असताना, त्या कामावरून घरी आल्या आणि पाहिलं की त्यांच्या बाळानं दम तोडला होता.
"माझं बाळ जाण्याचा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. आता आपण जगून काही उपयोग नाही, असं मला वाटलं आणि मीही विष प्यायले."
पण रत्नाच्या शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, म्हणून त्यांचा जीव वाचला.
नवीन आयुष्यास सुरुवात
नवरा गेला, मूल गेलं, एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्नही झाला. पण रेखाच्या नशीबात काय होतं, कुणास ठाऊक?
पुढच्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "त्यानंतर जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणारी एक आरोग्यसेविका माझ्या संपर्कात आली. ती मला प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळेंकडे घेऊन गेली. त्यांनी लगेचच माझ्यावर औषधौपचार तर सुरू केले."
सोबतच, डॉ. आरोळेंनी रत्नाला प्रकल्पाच्या खडकतमधल्या शेतावर नोकरी दिली. त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली खरी, पण तो आजार आणि त्यामुळं होणारा सामाजिक त्रास काही पाठ सोडत नव्हता.
त्या सांगतात, "शेतावर काम करणारे इतर लोक माझ्यापासून फटकून वागू लागले."
"डॉ. आरोळेंना ही गोष्ट कळाल्यावर एक दिवस ते शेतावर आले. सर्व जण जेवायला बसले आणि डॉ. आरोळेंनी मला त्यांच्या ताटात जेवायला बसवलं. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला."
मग डॉ. आरोळेंनी प्रकल्पातील इतरांना समजावून सांगितलं की हा आजार सोबत राहिल्यानं होत नाही. "मग त्या सगळ्यांनी मला स्वीकारलं," रत्ना सांगतात.
"त्यानंतर मी स्वत:ला कामात बुडवून घेतलं. एकेक गोष्ट शिकत गेले. रोपवाटिका तयार करायला शिकले, गांडूळ शेतीचं प्रशिक्षण घेतलं. पोल्ट्री, शेळीपालनाचंही प्रशिक्षण घेतलं. या कामामुळं मी माझं दु:ख विसरून गेले."
ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या कृषी संशोधन केंद्रावर कामगार म्हणून रुजू झालेल्या रत्ना आज या केंद्राच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेळीपालन प्रकल्प चालवत आहे आणि गाई-बैलांचा सांभाळही करत आहे.
एवढंच नाही तर इथे भेटीला येणाऱ्या व्यक्तीला गांडूळ खत प्रकल्पाची माहिती देणं, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणंही रत्नाची जबाबदारी आहे. सर्व हिशोब त्याच सांभाळतात.
शेतीशिवाय बचत गटांमध्येही रत्ना कार्यरत आहेत. बचत गट चालवणाऱ्या महिलांना त्या मार्गदर्शन करतात.
ज्या लोकांनी रत्ना यांना दूर सारलं तेच सर्वजण आता त्यांना सन्मानानं बोलावतात. नातेवाईक लग्न किंवा इतर कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करतात.
पुढे जाऊन रत्ना यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीला 3 वर्षांची असताना दत्तक घेतलं. आज ती मुलगी अकरावीत शिकत आहे.
एड्ससह जगणाऱ्यांच्या प्रेरणास्रोत
रत्ना यांनी केवळ त्यांचंच आयुष्य नाही पालटलं तर आसपासच्या लोकांच्याही त्या प्रेरणास्रोत झाल्या. त्या सांगतात, "HIV-एड्ससह जगणारे लोक आणि त्यांचे नातेवाईक जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मी त्यांना सांगते की, मी HIV असूनही मी स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांचा विश्वास बसत नाही. मग मी माझे मेडिकल रिपोर्ट दाखवते."
"मग त्यांचा विश्वास बसतो, आणि विश्वासही वाढतो की HIVशी संघर्ष करून जगता येऊ शकतं. इतर एड्सबाधितांची, त्यांच्या नातेवाईकांची हिंमत वाढवणं, यामध्ये मला खूप समाधान मिळतं."
रत्ना यांच्या या संघर्षाची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या वाटचालीची दखल स्वित्झर्लंडमधील जी. आय. सी. ए. एम. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं घेतली.
1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी रत्ना यांना व्याख्यान देण्यासाठी स्वित्झर्लंडला आमंत्रित करण्यात आलं आहे.
रत्ना सांगतात, "मला हेच मांडायचं आहे की, समाजाने HIV-एड्ससह जगणाऱ्यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. त्यांचा तिरस्कार करू नका. कॅन्सर आणि डायबेटिस यासारखा हाही एक आजारच आहे."
"HIV-एड्ससह जगणाऱ्यांना औषधोपचार तर मिळायलाच हवेत. पण त्यांना रोजगारही मिळायला हवा. स्वत:च्या पायावर उभे राहिले तर ते सन्मानानं जगू शकतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे HIV-एड्ससह जगणाऱ्यांच्या मुलांना दूर सारू नका," असं त्या सांगतात.
(एचआयव्ही बाधित असले तरी आपली ओळख लपवण्याची इच्छा नसल्याची रत्ना जाधव यांची भूमिका आहे. त्यानुसार त्यांची ओळख करून देण्यात आली आहे. तसंच छायाचित्रं वापरण्यात आली आहेत.)
हे वाचलं का?
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)