सुंदर, घरगुती, सभ्य नवरा कोणी का शोधत नाही? -ब्लॉग

    • Author, सिंधूवासिनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? तुम्ही कसे कपडे घालायला आवडतं - जीन्स की साडी, की दोन्ही? तुम्ही लग्नानंतर नोकरी करणार का?

हे प्रश्न कोणत्याही मुलाच्या घरच्यांनी मला नाही विचारले. हे सगळे प्रश्न लग्न आणि प्रेमाचा दावा करणारी एक मॅट्रिमोनिअल वेबसाईट विचारत आहे.

गेल्या काही दिवसांपासून लग्न जुळवणाऱ्या अशा वेबसाईटवर अकाऊंट उघड, असा घरचे माझ्यावर दबाव टाकत होते.

ते टाळण्याचे सगळे उपाय संपल्यावर मी अखेर अकाउंट बनवण्यास होकार दिला. मला वाटलं की कंटाळवाण्या आयुष्यात थोडा आनंद, थोडा रोमांच येईल.

पहिल्या वेबसाईटवर काही आनंदी जोडपं डोळ्यासमोर आली. तिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "Love is looking for you. Be found." मराठीत सांगायचं झालं तर "प्रेमाला तुमचीच प्रतीक्षा आहे. थोडं रडारवर या".

म्हणजे माझी वाटचाल प्रेमाकडे सुरू होती. पण त्यासाठी मला धर्म, जाती, गोत्र, वय, चेहरा, शिक्षण, नोकरी याची माहिती देणं आवश्यक होतं.

प्रश्नांची सरबत्ती

मग प्रश्न आला की, 'तुम्हाला स्वयंपाक करता येतो का?' मी उत्तरादाखल 'नाही' क्लिक केलं.

पुढचा प्रश्न असा होता की 'लग्नानंतर नोकरी करायची इच्छा आहे का?'

हे सगळं सांगितल्यानंतर पुढचे प्रश्न होते 'मी कशा प्रकारची मुलगी आहे?' 'आयुष्यात माझे काय प्लॅन्स आहेत?' वगैरे.

मी टाईप करायला सुरुवात केली की, मला जेंडरच्या विषयात रस आहे. पण लगेच लक्षात आलं की हा नोकरीचा अर्ज नाही.

शेवटी कसातरी तो अकांऊट फॉर्म पूर्ण भरला.

आता वेळ होती मुलांचं अकाउंट शोधायची. एकेक करून बघू लागली. कुणीच सांगितलं नव्हतं की ते स्वयंपाक बनवू शकतात की नाही.

कोणीही हे सांगितलं नाही की, ते लग्नानंतर ते ऑफिसचं काम करणार की घरातलं. ते कोणते कपडे घालतात याचा कोणताही उल्लेख नव्हता.

मुलांना हे प्रश्न नाही

थोडी अजून चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की, मुलांना हे सगळे प्रश्न विचारलेच नव्हते.

बदलत्या काळाबरोबर खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या या काळात पुरुष आणि महिलांना वेगवेगळ्या चष्म्यातून बघितलं जात होतं.

त्यानंतर आणखी काही वेबसाइट्सवर नजर फिरवली तर सगळीकडे तशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते.

एका मॅट्रिमोनिअल साईटवर जर मुलगी शोधण्याचं डिफॉल्ट वय 20-25 वर्ष दाखवलं जातं आणि मुलगा शोधत असाल ते 24-29 असं दाखवतात.

यातून मुलीचं वय मुलापेक्षा कमी असतं, या धारणेला नकळतपणे पुष्टी मिळते.

दुसऱ्या एका वेबसाईटवर जर तुम्ही स्वत:च अकाऊंट बनवलं असेल तर तुमच्याकडे संशयानं बघतात. म्हणजे जर तुम्ही लग्न करत असाल तर तुम्ही आपल्या आईवडील किंवा भावा बहिणीला अकाऊंट बनवायला सांगायचं. नाहीतर तुमच्यासाठी कमी प्रस्ताव येतील.

इतकंच काय तर मुला आणि मुलींच्या फोटोमध्ये सुद्धा फरक होता.

काय होता फोटोंमधला फरक?

मुलं तर सेल्फी किंवा स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो टाकतात, पण त्याच वेळी मुली टिपिकल नवरीसारखे भाव असलेले फोटो टाकतात.

वर्तमानपत्रात सुंदर, गोरीपान, बारीक आणि गृहकृत्यदक्ष वधूची मागणी करणाऱ्या जाहिराती अनेक बघितल्या होत्या. पण इंटरनेटवर मॅट्रिमोनिअल साईटवरची ही वृत्ती थोडी आश्चर्यचकित करणारी होती.

वर्तमानपत्रात क्वचितच कोणीतरी सुंदर, घरगुती आणि सुशील अशा मुलाची मागणी केली असेल. किंवा त्यांना काही विशिष्ट कपडे घालून त्यांना फोटो पाठवायला सांगितलं असेल.

या जुन्या गोष्टीबद्दल आपण दुर्लक्ष केलं तरी मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या दृष्टिकोनाबदद्ल का आक्षेप घेऊ नये?

खासकरून जेव्हा ऑनलाईन मॅचमेकिंगचा उद्योग हजारो कोटींचा असेल.

अब्जावधीचा कारभार

ASSOCHAMच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत मॅट्रिमोनिअल वेबसाइटचा बाजार वेगाने वाढतो आहे. त्याचा कारभार 15000 कोटींपर्यंत पोहोचला आहे.

मी वेबसाईटवर दिलेल्या नंबरवर फोन करून मुलांना आणि मुलींना विचारलेल्या प्रश्नांमध्ये काय फरक आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

बऱ्याच ठिकाणी फोनवर बोलणारे व्यस्त आहे, असं कारण सांगितलं. मी पाठवलेल्या ईमेल्सला कोणी प्रतिसाद दिला नाही.

बऱ्याच वेळानंतर एका वेबसाईटच्या ऑफिसमध्ये आलोक नावाच्या एका कस्टमर केअर प्रतिनिधीनं फोन उचलला. त्यांनं सांगितलं, "आम्हाला आमचे प्रश्न लोकांच्या गरजेनुसार तयार करावे लागतात. बहुतांश लोकांना नोकरीबरोबर घर सांभाळणाऱ्या मुली हव्या असतात."

माझ्या एका मैत्रिणीला सँडल काढून उभं रहायला सांगितलं जेणेकरून ते तिची नेमकी उंची कळू शकेल.

मॅचमेकिंग साईटची कार्यपद्धती यापेक्षा वेगळा नव्हती.

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर उच्चशिक्षित आणि उच्चपदावर काम करणारे लोक रजिस्टर करतात. अनिवासी भारतीय आईवडील इथे आपल्या मुलांसाठी आयुष्याचा जोडीदार शोधायला येतात.

अशा परिस्थितीत जर कुणी या दुटप्पी व्यवहारावर आक्षेप घेत नाही आहे, तर हे नक्कीच चिंताजनक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)