प्रेस रिव्ह्यू : दरवर्षी 1600 सैनिकांना युद्ध न करताना मृत्यू, 120 सैनिकांची आत्महत्या करतात

कोणत्याही देशाशी युद्धा सुरू नसताना देशात विविध कारणांनी दरवर्षी तब्बल 1600 सैनिकांना प्राण गमवावे लागतात. त्यापैकी 120 सैनिक दरवर्षी आत्महत्या करतात, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तातून समोर आली आहे.

या वृत्तानुसार, भारतातील सैनिकांचे सर्वाधिक मृत्यू कुठल्याही युद्धभूमीवर लढताना किंवा नियंत्रण रेषेवर चकमकीदरम्यान न होता इतर कारणांनी होत आहे.

द टाइम्स ऑफ इंडियाने मिळवलेल्या माहितीनुसार, सर्वांत जास्त सैनिकांना रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावावे लागतात. त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या सैनिकांचीही संख्या मोठी आहे.

दरवर्षी तीनही लष्करी सेवेतील जवळजवळ 350 सैनिकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. जवळपास 120 सैनिक आत्महत्येला कवटाळतात. इतर कारणांमध्ये प्रशिक्षणादरम्यान अपघातात किंवा आजारपणामुळं मृत्यू होत असल्याचं म्हटलं आहे.

2014 पासून 6500 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युद्धेत्तर सामान्य परिस्थितीत जख्मी होणाऱ्या सैनिकांचं प्रमाण हे 12 पट आहे.

मनमोहन सिंग यांचा मोदींवर टोला

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शनिवारी सूरतमध्ये काँग्रेसच्या प्रचारार्थ घेतलेल्या एका सभेत केंद्र सरकारवर टीका केली.

तुमच्या योजनांना विरोध करणारा प्रत्येक व्यक्ती देशद्रोही नाही. मग त्यांच्याकडे संशयाने का बघितलं जात आहे? हे चुकीचं आहे, असं डॉ. सिंग म्हणाल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

राजकीय नेत्यांनी शालीनता पाळायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.

"नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीने जनतेला ज्या वेदना झाल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजल्याच नाहीत. "काळ्या पैशाविरोधात निष्फळ ठरलेली ही मोहीम आहे. यामुळं जनतेला त्रास झाला, खरे चोर मात्र सुटले," असा आरोप त्यांनी केला.

"कर दहशतवाद वाढला. जणू प्रत्येक व्यक्ती देशद्रोही आहे, असं संशयानं पाहू लागले. हे चुकीचं आहे. राजकीय नेत्यांनी शालीनता पाळायला हवी," असा सल्ला त्यांनी दिला.

नरेंद्र मोदीच्या चहावाला होते, असा प्रचार भाजपनं 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जोरानं केला होता. आता गुजरात निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा हेच चर्चेत आलं आहे.

मनमोहन सिंगांनी या मुद्द्यावर टोला लगावला - "आमची परिस्थिती आधी कशी होती, हे सांगून मला काही मोदींच्या इतिहासाशी स्पर्धा करायची नाही."

केरळ, तामीळनाडूचे 900 मच्छिमार पोहोचले महाराष्ट्राच्या तटावर

'ओखी' चक्रीवादळामुळं समुद्रात मासेमारी करताना भरकटलेले 900 पेक्षा अधिक मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. चक्रीवादळात बेपत्ता झालेल्या सर्वं 68 बोटींपैकी 66 बोटी केरळच्या आणि दोन बोटी तामिळनाडूच्या आहेत.

या सर्व बोटींमध्ये मिळून 952 मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

भरकटलेल्या या मच्छिमारांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या मदतीबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

हजार मच्छिमार समुद्रात अडकलेल्या बातम्या खोट्या असून 97 मच्छिमार चक्रीवादळात अडकल्याचं संरक्षण मंत्री सितारामण यांनी सांगितलं आहे.

प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता?

ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचा खळबळजनक दावा प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, महाजन कुटुंबीयांच्या उस्मानाबादमधल्या वडिलोपार्जित जमिनीतील हिश्श्यावरुन महाजन कुटुंबातला वाद जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्याच्या सुनावणीसाठी त्या उस्मानाबादेत आल्या होत्या.

त्यावेळी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले. "जमीन आपल्याला मिळू नये, यासाठी मला सहा वर्षांपासून चकरा मारायला लावल्या जात आहेत. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत."

"माझ्यावर दडपण आणण्यासाठी न्यायालयाच्या तारखेला गाडीभरून गुंड आणले जातात. हे काम एक स्वीयसहाय्यक करतो," असा आरोप सारंगी महाजन यांनी केला.

पती प्रवीण यांच्या मृत्यूसंदर्भात मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, असाही आरोप त्यांनी केला.

जे आता हयातीत नाहीत, त्यांच्याविषयी आता अकारण वाद उकरून काढले जात आहेतं. घाणेरडे आरोप केले जात आहेत, असं प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

हाफिज सईदची संघटना निवडणुका लढवणार

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यानं पाकिस्तानात 2018 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचं नियोजन केलं जात असल्याची चिन्ह दिली आहेत.

द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या संघटनेतर्फे मिली मुस्लीम लीगच्या बॅनरखाली निवडणुका लढवण्याचा विचार करण्यात आला होता, ज्याची अजून पाकिस्तान निवडणूक आयोगात नोंदणी व्हायची आहे.

जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत असलेल्या हाफिज सईदला 24 नोव्हेंबर रोजी मुक्त करण्यात आलं.

"मिली मुस्लीम लीग पुढील वर्षांत होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूका लढवण्याचं नियोजन करत आहे. तसेच पुढील वर्ष हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या काश्मिरींनाही मी अर्पण करतो," असं सईद याने जमात-उद-दावाच्या मुख्यालयात बोलताना सांगितलं.

हाफिज सईद आणि त्याची संघटना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडित आहे. 2008 साली झालेल्या मुंबई हल्ला लष्कर-ए-तोयबाने केल्याचा भारताचा आरोप आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)