ट्रंप-किम भेटः अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेसंबंधी नऊ महत्त्वाचे मुद्दे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन व्हिएतनाममध्ये भेटत आहेत. ट्रंप आणि किम हे दुसऱ्यांदा भेटत आहेत.

उत्तर कोरियाच्या वादग्रस्त अण्वस्त्र कार्यक्रमांसंबंधी तोडगा काढणारा एखादा करार या भेटीमध्ये होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भेटीमध्ये अजून काय होऊ शकतं, ट्रम्प आणि किम जाँग यांच्या भेटीची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हे महत्त्वाचे मुद्दे जरूर वाचा.

1. दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार आहे?

सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या ऐतिहासिक भेटीदरम्यान ज्या विषयावर ट्रंप आणि किम यांच्यात चर्चा झाली होती, त्याच विषयावर यावेळेसही ते बोलतील. हा विषय म्हणजे अण्वस्त्रं.

उत्तर कोरियानं आपला अणवस्त्र कार्यक्रम सोडून द्यावा, असं बहुतांश देशांचं मत आहे. अणवस्त्र नष्ट करणं किंवा त्याच्या वापरावर मर्यादा आणणं याला 'आण्विक निःशस्त्रीकरण' असं म्हणतात. मात्र उत्तर कोरियाकडून सातत्यानं ही गोष्ट अमान्य केली जात आहे. यामुळेच उत्तर कोरियावर अनेक देशांनी निर्बंधही लादले आहेत. व्यापारावर निर्बंध तसंच अनेक देशांशी खुंटलेला संवाद अशा परिणामांना उत्तर कोरियाला सामोरं जावं लागत आहे. हे निर्बंध शिथिल व्हावेत यासाठी उत्तर कोरियाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.

2. उत्तर कोरियानं आपली अण्वस्त्र नष्ट करण्यासंबंधी यापूर्वी कोणतं आश्वासन दिलं होतं का?

असं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. गेल्या वर्षी ट्रंप आणि किम भेटीमध्ये सिंगापूर 'जाहीरनाम्या'वर सह्या करण्यात आल्या होत्या. या जाहीरनाम्यामधून प्रचंड आशावाद व्यक्त होत असला तरी यात नमूद केलेल्या बाबी तशा मोघम होत्या.

आम्ही शांतता आणि अण्वस्त्रांवर निर्बंधांसाठी कटिबद्ध आहोत, असं या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. पण याचा नेमका अर्थ काय किंवा हे साध्य कसं होणार याबद्दल मात्र कोणताही उल्लेख नव्हता.

उत्तर कोरियानं आपलं अण्वस्त्रांच्या चाचणीचं केंद्र नष्ट केलं होतं. मात्र उत्तर कोरियाला त्याची काही आवश्यकता उरली नव्हती. कारण या अण्वस्त्रांच्या चाचण्या घेऊन त्याच्या उपयोगितेविषयी आधीच खात्री पटविण्यात आली होती. त्यापुढे जाऊन उत्तर कोरियानं आपला आण्विक विकास कार्यक्रम थांबविण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही.

किंबहुना उत्तर कोरिया आपला आण्विक कार्यक्रम मुळीच थांबवणार नाही. कारण किम यांना आपली राजवट टिकविण्यासाठी ते आवश्यक वाटतं, असं मत अमेरिकेच्या गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे.

गेल्या काही आठवड्यांत डोनाल्ड ट्रंप हे आपल्या अपेक्षेपासून एक पाऊल मागेच सरकरले आहेत. जोपर्यंत उत्तर कोरिया कोणत्याही नवीन क्षेपणास्त्राची किंवा अणु बाँबची चाचणी करत नाही, तोपर्यंत मी समाधानी आहे, अशा आशयाचं विधान ट्रंप यांनी केलं होतं. याचाच अर्थ ट्रंप यांनी 'जैसे थे' परिस्थिती मान्य केली, असा होता.

कदाचित या भेटीत अमेरिका उत्तर कोरियाला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आण्विक तंत्रज्ञानाची यादी सादर करण्याची मागणी करू शकते. मात्र उत्तर कोरियाला या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद द्यायला फारसा उत्सुक नसेल.

3. उत्तर कोरिया अण्वस्त्रं का बाळगू शकत नाही?

अणुबाँब हे सर्वांत धोकादायक अस्त्र आहे. कदाचित त्यामुळेच काही अपवाद वगळता जगात नवीन अण्वस्त्रधारी देश तयार होऊ नयेत, यावर सर्वांचच एकमत आहे. उत्तर कोरियानं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा तसेच करारांचा भंग करत आण्विक विकास कार्यक्रम हाती घेतला.

उत्तर कोरियाकडून रागाच्या भरात ही अण्वस्त्रं वापरली जातील ही भीती अवास्तव असली तरी काही शक्यता या प्रत्यक्षात येऊ शकतात. उत्तर कोरिया अण्वस्त्रं बनवण्याचं तंत्रज्ञान अन्य देशांना विकू शकतो, अणुचाचणी केंद्रातील चुकांमुळे होणारे अपघात किंवा जर उत्तर कोरियातील सरकार कोसळल्यास ही अण्वस्त्रं चुकीच्या हातात पडण्याची भीती अशा अन्य शक्यताही वर्तविल्या जात आहेत. जर उत्तर कोरियाला अण्वस्त्रं बाळगण्याची परवानगी दिली, तर इतर देशांना चुकीचा संदेश जाऊ शकतो.

4. उत्तर कोरियापासून खरंच धोका आहे का?

या प्रश्नाचं संभाव्य उत्तर 'हो' असं आहे. कोणीही धमकावल्यास आपण अण्वस्त्रं किंवा अन्य क्षेपणास्त्रांचा वापर करायला कचरणार नाही, असं उत्तर कोरियानं वारंवार बोलूनही दाखवलं आहे.

उत्तर कोरियाच्या या भूमिकेमुळं सर्वाधिक धास्ती त्याचे दोन शेजारी अर्थात दक्षिण कोरिया आणि जपानला आहे. (विशेष म्हणजे या दोन्ही देशांत अमेरिकेच्या फौजा आहेत.) इतकंच नाही तर अमेरिकेच्या भूमीवर हल्ला करता येईल इतकी शक्तिशाली क्षेपणास्त्रं आपल्याकडे आहेत, असा दावाही उत्तर कोरियानं केला होता.

गेल्या काही वर्षांत उत्तर कोरियाकडून सायबर हल्ल्याची धमकीही दिली जात आहे. अर्थात, उत्तर कोरियानं अशा प्रकारच्या हल्ल्यांचा कोणताही प्रयत्न केला तर तो आत्मघातकी पाऊल ठरेल, असं मत बहुतांशी तज्ज्ञ व्यक्त करतात.

5. अमेरिका आणि उत्तर कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत?

तांत्रिकदृष्ट्या 'हो.' कोरियन युद्ध हे तात्पुरत्या शस्त्रसंधीनंतर संपुष्टात आलं होतं. मात्र शांतता करारावर कधीही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नाहीत. युद्धानंतर झालेल्या तहानुसार आजही दक्षिण कोरियात अमेरिकेचे 23 हजार सैनिक तैनात आहेत. दक्षिण कोरियाच्या सैनिकांसोबत त्यांचे नियमित प्रशिक्षण कार्यक्रम होत असतात.

डोनाल्ड ट्रंप आणि किम यांच्यातील भेटीदरम्यान शांतता करार करण्यात येईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. किम यांचीही अशीच अपेक्षा असणार. अर्थात, हा औपचारिक शांतता करार नसेल. केवळ प्रतिकात्मक कृती असेल, ज्याचा फायदा दोन्ही नेत्यांना त्यांच्या देशामध्ये होईल.

6. व्हिएतनाममध्ये का होत आहे ही भेट?

साम्यवादी देश असलेल्या व्हिएतनाम आणि उत्तर कोरियामध्ये काही राजकीय समानता आहेत. अमेरिका आणि व्हिएतनाम संबंधांनाही युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

जगापासून वेगळं पडलेल्या उत्तर कोरियाला एकटेपणातून बाहेर येण्यासाठी व्हिएतनामची भूमी उत्तम आहे. किम उद्योग तसेच व्यापार यांचा आढावा घेण्यासाठी काही काळ इथे थांबतील. जर किम यांना आपल्या दशकांच्या अमेरिकाविरोधी भूमिकेतून बाहेर यायचे असेल तर देशातील विचारवंतांना या भेटीतून आपल्याला काय फायदा होईल हे पटवून द्यावं लागेल.

व्हिएतनाममध्ये किम यांना निदर्शनं, आंदोलनाची कोणतीही भीती नाही. व्हिएतनामा कोणत्याही निदर्शनांना परवानगी देणार नाही आणि या बैठकीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवरही बारीक नजर असेल.

7. उत्तर कोरियामध्ये काय आहे परिस्थिती?

उत्तर कोरियातील राजवट ही जगातील क्रूर राजवटींपैकी एक आहे. लोकांच्या आयुष्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. The World Food Programme च्या अंदाजानुसार उत्तर कोरियातील 1 कोटी लोक हे कुपोषित आहेत.

राजकीय आणि शहरी उच्चभ्रूंसाठी काही वर्षांत आयुष्य किमान सुकर बनलं आहेत. काही निर्बंध असले तरी उत्तर कोरिया राजनयिक चर्चांमध्ये सहभागी होऊ लागल्यानं मानवाधिकारांची परिस्थिती बरी आहे.

असं असलं तरी ट्रंप आणि किम भेटीमध्ये मानवाधिकार हा विषय अजिबात चर्चिला जाणार नाही. मात्र उत्तर कोरियातील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात चर्चा होईल किंवा युद्धामध्ये एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जाईल.

8. उत्तर कोरियामध्ये लाइट्स का नाहीत?

हा प्रश्न सर्वाधिक गुगल केला जातो. याचं कारण म्हणजे अशापद्धतीची सॅटेलाइट छायाचित्रं. उत्तर कोरियाच्या मध्यभागी असलेला अंधारलेला भाग हा चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांनी वेढलेला आहे.

या प्रश्नाचं उत्तर म्हणजे दक्षिण कोरियाकडे व्यापक आणि भरवशाची अशी वीज पुरवठ्याची सुविधा नाहीये. विद्युत निर्मिती केंद्रं तसेच जलविद्युतसाठी आवश्यक धरणं ही खूप जुनी झाली आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रांना इंधनाचा तसंच यंत्रांच्या सुट्या भागांचाही तुटवडा भासतो. वीज पुरवठा करताना लष्कर आणि कार्यालयीन कामकाजाला प्राधान्य दिलं जातं.

शहराच्या बाहेर राहणारे अनेक जण महागड्या आणि खूप आवाज करणाऱ्या जनरेटर्सचा वापर करतात. NK News नं दिलेल्या माहितीनुसार स्वस्त आणि खात्रीलायक असे सोलर पॅनल्स हे सध्या घरगुती वापरासाठी लोकप्रिय ठरत आहेत.

9. अमेरिका उत्तर कोरियावर हल्ला करण्याचा विचार करू शकतं का?

उत्तर कोरियाकडून असलेला धोका विचारात घेता अमेरिका या देशावर हल्ला करू शकते का, हा प्रश्न वारंवार विचारला जातो.

सैद्धांतिकदृष्ट्या याचं उत्तर हो असं आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते हा केवळ कल्पनाविलास आहे.

या प्रश्नाची एक नैतिक बाजूही आहे. उत्तर कोरियामध्ये 2.5 कोटी लोक आहेत. हे लोक सरकारच्या दडपशाहीनं गांजले आहेत. ते या समस्येचा भागही नाहीयेत.

किम आणि वरिष्ठ नेत्यांना हटवलं, तर उत्तर कोरियामध्ये प्रचंड अराजकता निर्माण होईल, निर्वासितांचा प्रश्नही निर्माण होईल. उत्तर कोरियाच्या शेजारी देशांना याच गोष्टीची चिंता भेडसावत आहे. ही अस्थिरता सगळ्यांनाच टाळायची आहे.

महत्त्वाचं म्हणजे उत्तर कोरियाकडे आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्रं आहेत. प्रचंड लष्कर आहे. एकाच वेळी या सर्व गोष्टी नष्ट नाही केल्या तर उत्तर कोरियाही जोरदार प्रत्युत्तर देणारच.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)