किम-ट्रंप भेटीनंतर काय बदललं आहे उत्तर कोरियात?

    • Author, आँद्रियाज इल्मर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगापासून बराच दूर गेलेला देश म्हणजे उत्तर कोरिया. पण, या देशात आता काही बदल दिसू लागले आहेत. आपल्या प्रचार अभियानानं चर्चेत राहणाऱ्या या देशानं हे आपला हा प्रोपगंडा सध्या काहीसा कमी केला आहे.

उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांगमध्ये आजवर लावण्यात आलेल्या बॅनर आणि पोस्टर्समध्ये अमेरिका हा एक साम्राज्यवादी आक्रमणकारी देश. दक्षिण कोरिया आणि जपान यांना सहकार्य करणारा देश म्हणून दाखवला जायचा.

पण, हल्लीच्या दिवसांत उत्तर कोरियात गेलेले लोक एक वेगळाच दावा करतात. राजधानीतल्या भिंतींवर, पोस्टर्सवरची जागा अमेरिकाविरोधी संदेशांऐवजी आर्थिक विकास आणि दोन्ही कोरियाई देशांच्या मीलनाच्या छायाचित्रांनी घेतली आहे.

काही विश्लेषकांचं असंही मत आहे की, सरकारच्या नियंत्रणात राहणाऱ्या उत्तर कोरियाच्या मीडियानंही आपला सूर बदलला आहे.

कसे बदलले उत्तर कोरियाचे सूर?

मग, आता हा प्रश्न पडतो की, आता उत्तर कोरियात आता अमेरिकेला शत्रू म्हणून दाखवलं जात नाहीये का?

उत्तर कोरियाच्या बहुतांश लोकांसाठी मीडिया म्हणजे सूचना आणि माहिती मिळवण्यापर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे इथे सरकारी मीडिया आणि त्यामार्फत होणारा प्रोपगंडा याचा परिणाम इथल्या लोकांवर सर्वाधिक होतो.

या देशात पारंपरिकरीत्या अमेरिकेला शत्रू क्रमांक एक म्हणून दाखवलं जात आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याला उत्तर कोरिया कसं प्रत्युत्तर देईल हेच आजवरच्या प्रपोगंडामध्ये दाखवण्यात आलं आहे. उत्तर कोरियाच्या मिसाईल आणि अभेद्य सैन्य आक्रमणकर्त्यांना कसं नेस्तनाबूत करेल हेच वारंवार दाखवलं गेलं आहे.

दशकांपासून लागणारी ही पोस्टर्स लोकांच्या मनात देशाबद्दलचं प्रेम आणि आपल्या नेत्याबद्दलचा भरवसा निर्माण करत होती. युद्धभूमीवर जाणं हे देशासाठीचं सगळ्यांत मोठं योगदान ठरेल ही भावनाही या काळात जनतेच्या मनात रुजवण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियातल्या ग्रिफिथ युनिर्व्हसिटीमधले आंद्रे अब्राहम याबद्दल सांगतात, "आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण वाईट झालं की, कठोर संदेश देणारी पोस्टर्स उत्तर कोरियात लावली जात असत."

सध्या आंतरराष्ट्रीय वातावरणात सकारात्मकता वाढीस लागल्यानं हे प्रोपगंडा अभियानही थंडावलं आहे. त्यामुळे सध्या उत्तर कोरियासाठी योग्य वेळ सुरू आहे.

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या घोषणांनंतर, उत्तर कोरियानं दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत ऐतिहासिक मनोमिलन करण्यात यश मिळवलं. आपल्या मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना, पण आपली अण्वस्त्र सोडण्याचं आणि शांतता राखण्याचं वचन या देशानं दिलं.

प्रपोगंडा अभियानात झालेला हा बदल केवळ राजधानी प्याँगयांगपर्यंतच मर्यादित नाही. उत्तर कोरियात परदेशी पर्यटकांना फिरवणाऱ्या गाईड सांगतात की, प्रपोगंडा अभियानाच्या भाषेत कमालीचा बदल दिसून येत आहे.

आक्रमक भाषेऐवजी सकारात्मक संदेशांवर भर अधिक देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे नेते मून जे इन यांच्यादरम्यान झालेल्या कराराचे आता परिणाम दिसू लागले आहेत.

यंग पायोनियर टूर्सचे मॅनेजर रोवन बियर्ड यांनी रॉयटर्स या एजन्सीला याबद्दल सांगितलं की, "साधरणतः किम इल सुंग चौक इथे दिसणारी अमेरिका विरोधी पोस्टर्स आता गायब झाली आहेत. उत्तर कोरियात मी गेल्या पाच वर्षांपासून काम करतो आहे. पण, पहिल्यांदाच ही पोस्टर्स गायब झाल्याचं पाहतो आहे."

नवा प्रचार

जुन्या पोस्टर्सची जागा नव्या पोस्टर्सनी घेतली आहे. या पोस्टर्समध्ये एक वेगळंच चित्र उभं करण्यात आलं आहे. कोरियाई द्विपकल्पातील दोन्ही देशांचं मीलन, आर्थिक विकास आणि वैज्ञानिक क्षेत्रातील यश हे या पोस्टर्समध्ये दिसून येत आहे.

N K न्यूजचे पत्रकार फ्योदर तेरतित्सकी यांनी याबाबत बीबीसीसोबत चर्चा केली. ते सांगतात, "उत्तर कोरियाला शांतता आणि आराम या वातावरणाची गरज आहे आणि अशावेळी ही पोस्टर्स हे वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत."

एवढंच नव्हे तर पर्यटकांना विकल्या जाणाऱ्या अमेरिका विरोधी साहित्यातही बदल झाले आहेत. आता इथे वॉशिंग्टनवर हल्ला करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाईलची पोस्टकार्ड विकत मिळत नाहीत.

देशाचं मुख्य राष्ट्रीय वृत्तपत्र रोडोंग सिनमुनमधूनसुद्धा धोरणांमध्ये झालेले बदल दिसत आहेत.

मीडियाचेही बदलले सूर

उत्तर कोरियात स्वतंत्र प्रेस किंवा माध्यमं नाहीत. जो काही मीडिया उत्तर कोरियात आहे, त्यावर इथल्या सरकारचं कडक नियंत्रण आहे. प्रकाशित होणाऱ्या किंवा प्रसारित होणाऱ्या सामुग्रीवर सरकारची करडी नजरही असते.

इथल्या राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये अमेरिका विरोधी बातम्या नियमित प्रकाशित होत असत. अमेरिकेला शत्रू दाखवणारे तसंच, सीरियासारख्या देशांमधल्या युद्धामध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा घडवणारे लेख यात छापले जात.

पण, १२ जूनला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग ऊन यांच्या भेटीआधीपासूनच या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होणारे अमेरिका विरोधी लेख गायब झाले.

या भेदी दरम्यान किम जोंग उन यांना जगातला मोठा नेता या स्वरुपात दाखवण्यात आलं आणि उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा कोणताही उल्लेख यात करण्यात आला नाही. तसंच, ट्रंप आणि किम भेटीची छायाचित्र यात छापण्यात आली.

एनके न्यूजचे विश्लेषक आणि उत्तर कोरियाचे अभ्यासक पीटर वॉर्ड सांगतात, "आता उत्तर कोरियात अमेरिकेला एक सामान्य देश म्हणून दाखवलं जातं. उत्तर कोरियाला शत्रू मानण्यासाठी अमेरिकेनंही केलेल्या सगळ्या कृत्यांकडे आता हे वृत्तपत्र काणाडोळा करतं."

याच आठवड्यात अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचा राजीनामा दिला. पीटर वॉर्ड यांच्या मते, उत्तर कोरियातील वृत्तपत्रांनी ही बातमी तटस्थपणे छापली.

पीटर पुढे सांगतात, "ही खूप नवी गोष्ट आहे. सामान्यतः उत्तर कोरियामध्ये सकारात्मक किंवा तटस्थ वृत्तांकन अशा देशांचं केलं जातं, ज्यांना उत्तर कोरिया आपलं मित्र मानतं."

पण, अजूनही अभ्यासक एका गोष्टीबाबत साशंक आहेत. उत्तर कोरियात झालेले हे बदल कायमस्वरुपी आहेत की तात्पुरत्या स्वरुपाचे? तसंच, हा प्रश्नही पुढे येत आहे की, पोस्टर आणि बॅनरमध्ये झालेल्या या बदलांमुळे इथल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातही काही फरक पडणार आहे का? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरं अधांतरीच आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)