ट्रंप-किम सिंगापूर भेट 'यशस्वी', पण उत्तर कोरियावरचे निर्बंध कायम राहणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यात मंगळवारी सिंगापूरच्या एका हॉटेलमध्ये ऐतिहासिक भेट झाली. दोन्ही नेत्यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं आहे. या भेटीनंतर ट्रंप पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले तर किम हे उत्तर कोरियासाठी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितलं.

पाहा सोमवारी दिवसभरात काय काय घडलं?

सांयकाळी 6.10 - 'अनेक महिन्यांपासून किमबरोबर बोलत होतो'

गेल्या काही महिन्यांपासून मी किम जाँग-उन यांच्या संपर्कात होतो, असं ट्रंप यांनी ABC News शी बोलताना सांगितलं. सिंगापूर भेटीनंतर त्यांनी दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे.

"हो, मी त्यांच्याबरोबर बोललो होतो, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबरही माझं गेल्या काही महिन्यांमध्ये बोलणं झालं होतं," असं ट्रंप यांनी या मुलाखतीत प्रथमच जगासमोर उघड केलं.

उत्तर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाच्या निर्णयाबाबतीत ते बोलले, "हो, किम लवकरच यावर कारवाई करणार आहेत. आणि ते पूर्णपणे अण्वस्त्रांचा त्याग करणार आहेत. मला वाटतं, ते कदाचित आता लगेच कामाला लागतील."

दपारी 3.15 - ही भेट पहिलं पाऊल - जपानचे पंतप्रधान

"मी खरंच ट्रंप यांच्या नेतृत्वाचा आणि प्रयत्नांचा आदर करतो. कोरियन द्वीपकल्पात आण्विक निशस्त्रीकरण करण्याचं किम यांनी आश्वासन दिलं आहे. तसे कागदपत्र मी पाहिले आहेत, आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे," असं जपानचे पंतप्रधान शिंझो आबे म्हणाले.

"अपहरण झालेल्या जपानी माणसाचा उल्लेख ट्रंप यांनी किम यांच्याबरोबरच्या चर्चेत केला, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांना मी नंतर फोन लावणार आहे."

"उत्तर कोरियासंदर्भातल्या अपहरण, अण्वस्त्रसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जपान प्रयत्न करणार आहे," असं आबे म्हणाले.

दुपारी 1.53 - ट्रंप यांची पत्रकार परिषद

  • किम यांच्याबरोबरची बैठक प्रामाणिक, थेट आणि फलदायी ठरली.
  • आम्ही नवा इतिहास लिहित आहोत.
  • संपूर्ण आण्विक निशस्त्रीकरण उत्तर कोरियानं मान्य केलं आहे.
  • किम यांनी आधीच काही क्षेपणास्त्र चाचणी केंद्रं बंद केली आहेत.
  • किम हे प्रतिभाशाली व्यक्ती आहेत.
  • दक्षिण कोरियाबरोबरचा सुद्ध सराव थांबवला जाईल.
  • भूतकाळात आम्ही अमेरिकेशी चर्चा करण्याचे प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले, असं किम मला म्हणाले.
  • योग्य वेळी किम यांना व्हाईट हाऊसचे आमंत्रण देऊ.
  • योग्य वेळी मी सुद्धा प्याँगयांगला जाईन.
  • मानवी हक्कांवर सुद्धा चर्चा झाली.
  • आण्विक अस्त्र पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री पटल्यानंतरच निर्बंध हटतील.
  • उत्तर कोरियाला समजलं आहे, मला त्यांना धमकावायचं नाही.
  • आमच्यात आणखी एक बैठक होईल.

दुपारी 1. 11 - अमेरिकेनं जपान आणि दक्षिण कोरियाला दिली माहिती

अमेरिकेचे परराष्ट्रं मंत्री माईक पाँपेओ यांनी फोन करून जपान आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना ट्रंप-किम चर्चेची माहिती दिली. त्यांनी त्यांचा फोटोसुद्धा ट्वीट केला आहे.

दुपारी 1 - किम यांच्या बहिणीने पेन बदललं

पत्रकार मार्टिन विल्यम्स यांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे. त्यांनी ते ट्वीट सुद्धा केलं आहे. करारावर सह्या करण्यासाठी अमेरिकेकडून 2 पेन ठेवण्यात आले होते. ऐनवेळी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर किम यांची बहिण किम-यो-जाँग यांनी त्यांचं पेन किम यांना दिलं.

दुपारी 12.50 - कोरियन टीव्हीवर अजूनही बातमी नाही

उत्तर कोरियन टीव्हीवरील कार्यक्रम वेळनुसार सुरू झाले आहेत. पण अजूनही कोरियन टीव्हीवर ट्रंप-किम भेटीची चर्चा नाही.

फक्त किम यांच्या सिंगापूर भेटीची बातमी देण्यात आली आहे. कुठलेही फोटो किंवा फुटेज न दाखवता फक्त टीव्ही अँकरनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

दुपारी 12.23 - चीनचा दावा

या संपूर्ण चर्चेत चीननं फार महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी केला आहे. तसंच यापुढे सुद्धा चीन सहकार्य करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. हेच चीनला अपेक्षित होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

दुपारी 12.18 - असा आहे करार

या करारात अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या संरक्षणाची हामी दिली आहे. तसंच उत्तर कोरियानं संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरणाचं आश्वासन दिलं आहे.

दुपारी 12.16 - चार मुद्द्यांवर सामंजस्य

बीबीसी प्रतिनिधी लॉरा बीकर यांच्यामते खालील 4 मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य झालं आहे.

  • दोन्ही देश शांतता आणि समृद्धीसाठी संबंध प्रस्थापित करणार.
  • कोरीयन द्विपकल्पात स्थैर्य आणि शांततेसाठी दोन्ही देश प्रयत्न करणार.
  • उत्तर कोरिया संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी कटिबद्ध राहणार.
  • एकमेकांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांची सुटका.

दुपारी 12 - उत्तर कोरियाच्या टीव्हीचे प्रसारण सुरू

उत्तर कोरियाच्या सरकारी टीव्ही चॅनेलचे प्रसारण सुरू झालं आहे. नियमित कार्यक्रमानं त्याची सुरुवात झाली आहे.

सकाळी 11.41 - चीनकडून कौतुक

बीजिंगनं या बैठकीचं वर्णन ऐतिहासिक असं केलं आहे. "दोन्ही नेते एकत्र बसून बरोबरीत चर्चा करू शकतात हा सकारात्मक संदेश यातून मिळाला आहे. नवा इतिहास निर्माण झाला," असं चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी म्हणाले आहेत.

सकाळी 11.35 - ट्रंप यांची पत्रकार परिषद

डोनाल्ड ट्रंप थो़ड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देणार आहेत. सँटोसा बेटावरून दोन्ही नेते निघाले आहेत.

किम जाँग-उन मात्र तासाभरात सिंगापूर सोडणार असल्याचं समजतं.

सकाळी 11.17 - करार झाला, पण कसला?

दोन्ही नेत्यांनी बैठक यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. किम यांनी यावेळी ट्रंप यांचे आभार मानले. आम्ही भूतकाळ मागे सोडून दिला आहे, असं यावेळी किम म्हणाले आहेत.

दोन्ही नेत्यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण हा करार नेमका कसला आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. पण तो माहिती झाल्यावर लोकांना आनंदच होईल, करार ऐतिहासिक आणि व्यापक असल्याचा दावा ट्रंप यांनी केला आहे.

तसंच आम्ही फार मोठी समस्या सोडवल्याचा दावा ट्रंप यांनी केला आहे. ट्रंप यांनी किम यांचे सुद्धा आभार मानले.

"आजचा दिवस वादळी होता," असं ट्रंप म्हणाले.

"आम्ही एकमेकांविषयी आणि आमच्या देशांविषयी भरपूर जाणून घेतलं."

किम जाँग-उन यांच्या विषयी विचारल्यावर ट्रंप म्हणाले, "ते फार हुशार व्यक्ती आहेत आणि त्यांचं त्यांच्या देशावर फार प्रेम आहे."

सकाळी 10.55 - कराराची प्रतीक्षा

या ठिकाणी थोड्याच वेळात दोन्ही नेते कराराची घोषणा करणार आहेत.

सकाळी 10.30 - ट्रंप म्हणतात अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद

ते कुठल्या करारापर्यंत पोहचलेत हे अद्याप स्पष्ट नाही. पण माध्यम प्रतिनिधींशी थोडक्यात बोलताना ट्रंप म्हणाले "कुणी अपेक्षा केली नसेल त्यापेक्षा चांगला प्रसिसाद आहे."

सकाळी 10.25 -'ही खरोखर विलक्षण बैठक होती'

"ही खरोखर विलक्षण बैठक होती - पुष्कळ प्रगती आहे. टॉप ऑफ द लाइन. आता आम्ही एका करासाठी जात आहोत," असं ट्रंप बोलल्याचं ट्वीट CNN प्रतिनिधी जेफ यांनी केलं आहे.

सकाळी 10.21 - घोषणेची प्रतिक्षा?

दोन्ही नेत्यांचे भोजन संपले आहे, आता नजरा दोन्ही नेत्यांच्या घोषणेकडे लागल्या आहेत.

सकाळी 10.12 - या बॉडी लँग्वेजचा अर्थ काय?

"त्यांनी तीन वेळा हस्तांदोलन केलं आणि तीनही वेळेला ट्रंप यांनी पहिल्यांदा हात पुढे केला," बॉडी लँग्वेज एक्सपर्ट मनोज वासुदेवन यांनी बीबीसीला सांगितलं. त्यातून कदाचीत ट्रंप हे आपल्या प्रभुत्वावर ठाम असल्याच दर्शवत असावेत असं त्यांना वाटतं.

तसंच मनोज म्हणाले की, ट्रंप यांना मात्र समोरून अपेक्षित असलेला हस्तांदोलनाचा प्रतिसाद मिळाला नाही.

"अमेरिकन संस्कृतीमध्ये हस्तांदोलन बराच वेळ चालतं. त्यांना मात्र तसा प्रतिसाद मिळाला नाही."

सकाळी 10.10 - दक्षिण कोरियाच्या कॅबिनेटची बैठक

दक्षिण कोरियाच्या कॅबिनेटच्या बैठकित सिंगापूरमधल्या घडामोडींवर चर्चा केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष मून आणि त्यांची टीम या बैठकीचं थेट प्रक्षेपण पाहत आहेत.

सकाळी 10.06 - सजवलेलं लंच टेबल

कॅपेला हॉटलमध्ये या दोन्ही जागतिक नेत्यांसाठी लंच टेबल सजवलं होतं. सध्या हे दोन्ही नेसे त्यांच्या शिष्टमंडळासह भोजन करत आहेत.

सकाळी 9.55 - आतापर्यंत ठोस काहीच नाही

"दोन्ही पक्षांनी या बैठकीला यशस्वी घोषित केलं आहे," असं बीबीसी प्रतिनिधी रुपर्ट विंगफिल्ड हायेस यांनी सांगतिलं आहे. ट्रंप आणि किम सध्या दाराआड दुपारचं भोजन घेत आहेत.

"पण यात एक गोष्ट दिसून येत नाही ती म्हणजे यातून अद्याप ठोस असं काहीही समोर आलेला नाही. दोन्ही पक्ष बैठकीदरम्यान कुठले मुद्दे ठेवत आहेत आणि उत्तर कोरियाकडून अमेरिकेला काय मिळणार आणि त्याबदल्यात ते काय देणार हे स्पष्ट नाही."

सकाळी 9.49 - 12 ध्वज आणि 12 सेंकदांचा हँडशेक

सँटोसा बेटवरील कॅपेला हॉटेलच्या प्रांगणात उत्तर कोरियाचे सहा ध्वज अमेरिकेच्या सहा ध्वजांबरोबर लावलेले होते. याच राष्ट्रीय ध्वजांसमोर डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांनी हस्तांदोलन केलं.

बीबीसीच्या कोरिया प्रतिनिधी लॉरा बिकर या क्षणाविषयी लिहतात : निश्चितपणे इतिहासातील सर्वांत अपेक्षित आणि उल्लेखनीय असं हे हस्तांदोलन होतं. ते जिथं एकमेकांना पहिल्यांदा भेटणार होते, तिथं सहा अमेरिकन ध्वज आणि सहा उत्तर कोरियन ध्वज लावण्यात आले होते. ते दोघं आले. एकमेकांना बघून त्यांनी स्मितहास्य केलं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ट्रेडमार्क ठरलेली लाल रंगाची टाय घातली होती. तर किम हे त्यांच्या माओ सुटमध्ये होते. जवळपास 12 सेकंद हस्तांदोलन केल्यानंतर ते तिथून बैठकीसाठी गेले.

सकाळी 9.27 - नेत्यांचं एकत्र भोजन

ट्रंप आणि किम यांनी चर्चेतून ब्रेक घेतला आहे. या दोन्ही नेत्यांसह उपस्थित शिष्टमंडळ सध्या एकत्र दुपारचं जेवण घेत आहेत.

सकाळी 9.18 - बैठकीचा मेन्यू

बैठकीच्या दुपारच्या जेवणात फक्त हँबर्गर नसणार आहे. पाश्चिमात्य आणि दक्षिण कोरियन डिशेसचाही यात समावेश असेल.

सकाळी 9.15 - उत्तर कोरियात मात्र टीव्ही बंद

मार्टिन विल्यिम्स यांनी प्याँगयांगमधल्या स्थितीबाबत ट्वीट केलं आहे. उत्तर कोरियातल्या नागरिकांविषयी तुम्ही विचार करत असाल तर त्यांनी या बैठकीविषयी अद्याप काहीही पाहिलेलं नाही. या देशाच्या सरकारी TVचं प्रक्षेपण दुपारी 3 वाजता सुरू होईल.

सकाळी 9.11 - 38 मिनिटात इतिहास घडला

ट्रंप आणि किम या दोघांची खाजगी बैठक 38 मिनिटं चालल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. भाषांतराचं काम पाहता हा वेळ चांगला आहे, असंही व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

सकाळी 9.05 - आण्विक नि:शस्त्रीकरण करणार का?

ओपन कॉरीडोअरमधून दुसऱ्यांदा जेव्हा हे दोन्ही नेते चालत होते, तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना दोन वेळेस विचारलं, "चेअरमन किम, तुम्ही आण्विक नि:शस्त्रीकरण करणार का?" पण त्यांनी उत्तर दिलं नाही.

तिसऱ्यांदा विचारण्यात आलेला प्रश्नसुद्धा अनुत्तरितच राहिला. "मिस्टर किम तुम्ही तुमचे आण्विक शस्त्र नष्ट करणार का?" या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ते ट्रंप यांच्याबरोबर चालत राहिले.

याचवेळी ट्रंप यांनी मात्र चर्चा उत्तम सुरू असल्याचं पत्रकारांना सांगितलं.

सकाळी 8.57 - पहिल्या अर्ध्या तासात काय झालं?

ट्रंप आणि किम यांच्यात पहिल्या अर्ध्या तासात काय झालं या विषयी थेट सिंगापूरमधून अधिक माहिती देत आहेत बीबीसी प्रतिनिधी जुबैर अहमद.

सकाळी 8.55 - उत्तर कोरियात ट्रेंड नाही?

ट्विटरवर या बैठकीची जोरदार चर्चा आहे. त्यातले काही ट्वीट्स हे उत्तर कोरियातून आलेत, पण यात आश्चर्य वाटू देऊ नका. उत्तर कोरियातले युझर्ससाठी ट्विटरवर हॅशटॅग नसल्याचं एका उत्तर कोरियन तरुणानं म्हटलयं.

सकाळी 8.40 - त्यांना बैठकीविषयी ठाऊक आहे?

हो त्यांना याची माहिती मिळत आहे. उत्तर कोरियाच्या माध्यमांकडून या बैठकीचं कव्हरेज केलं जात आहे. अर्थात सरकारला पाहिजे त्याच पद्धतीनं.

सकाळी 8.33 - पण ती कोण आहे?

या ऐतिहासिक सकाळी तिचा वावर सगळीकडे दिसत होता. पण ती आहे तरी कोण. या दोन्ही नेत्यांबरोबर दिसणारी ती महिला फक्त भाषांतरकार नसून दुभाषक आहे.

सकाळी 8.30 - कॉफी टंचाई

दरम्यान मीडिया सेंटरमध्ये सध्या कॉफीची टंचाई उद्भवली आहे. प्रत्येकालाच घाई झालेली आहे. इथं जवळपास तीन हजार माध्यम प्रतिनिधी आले आहेत. असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

सकाळी 8.27 - बैठकीसाठी 100 कोटींचा खर्च

ही बैठक आयोजित करण्यासाठी दीड कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजेच साधारण 100 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती सिंगापूरनं दिली आहे. यातला बहूतांश हिस्सा हा सुरक्षा आणि तीन हजारांपेक्षा जास्त उपस्थित असलेल्या परदेशी पत्रकारांवर झाला आहे. सिंगापूरनं याआधी कधीच एवढे परदेशी माध्यम प्रतिनिधी पाहिले नाहीत.

सकाळी 8.13 - हाच तो ऐतिहासिक क्षण

सकाळी 8.11 - काय म्हणतात अमेरिकी वृत्तपत्रं?

अमेरिकन प्रसार माध्यमांनी या ऐतिहासिक भेटीवरून त्यांचा नेहमीचा पवित्रा थोडा मवाळ केल्याचं दिसून येत आहे.

सकाळी 8.03 - उत्तम संबध

किम जाँग-उन यांच्याबरोबरची बैठक कशी सुरु आहे, असं ट्रंप यांना विचारलं असता त्यांनी "फार चांगली, उत्तम संबंध," असं सांगितलं आहे.

सकाळी 7.55 - बैठकीत कोण कोण?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ हे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या बाजूला बसले होते. स्टाफ प्रमुख जॉन केली दूसऱ्या बाजूनं बसले होते.

तर उत्तर कोरियाच्या बाजून किम जाँग-उन यांच्याबरबोर आलेल्या शिष्टमंडळात किम याँग-चोल आहेत. ते किम यांचे राइट हँड समजले जातात.

या बैठकीच्या तयारीच्या निमित्तानं महिनाभरापूर्वी ते अमेरिकेत गेले होते. उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि याँग-हो आणि माजी परराष्ट्रमंत्री रि सु-याँग हे किम यांच्याबरोबर आहेत.

सकाळी 7.46 - देवाणघेवाण

"दोन्ही बाजूनं देवाणघेवाण होईल," असं दक्षिण कोरियातल्या बुसान विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट केली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

उत्तर कोरिया सगळंच काही सोडायला तयार होणार नाही. आणि त्यांनी काही जरी सोडायचं म्हटलं तरी त्याबदल्यात ते मदतीची किंवा निर्बंध उठवण्याची अपेक्षा करतील, असंही ते म्हणाले.

सकाळी 7.40 - किम यांचे इग्रंजी

"भेटून आनंद झाला अध्यक्ष महोदय," किम जाँग-उन यांनी इंग्रजी भाषेत ट्रंप यांच्याशी संवाद साधला.

सकाळी 7.38 - समोरासमोर बैठक

दोन्ही नेत्यांमध्ये आता समोरासमोर बसून चर्चा सुरू आहे.

सकाळी 7.36 - दक्षिण कोरियाची नजर

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन हे सुद्धा या ऐतिहासिक भेटीचं कव्हरेज पाहत आहेत. त्यांचं या भेटीकडे लक्ष आहे.

सकाळी 7.28 - खासगी चर्चा संपली

दोन्ही नेत्यांमधली खासगी चर्चा संपली आहे. आता शिष्टमंडळांसह दोन्ही नेते चर्चा करत आहेत.

सकाळी 7.26 - अभूतपूर्व क्षण

हा इतिहास घडत असताना दक्षिण कोरियाच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे.

सकाळी 7.08 - काय बोलले दोन्ही नेते?

डोनाल्ड ट्रंप - "मला खरोखरच छान वाटतं आहे. आम्ही एक उत्तम चर्चा करणार आहोत आणि मला वाटतं ती प्रचंड यशस्वी ठरेल. आणि हा माझा सन्मान आहे आणि आमचे संबध दृढ होतील याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही."

किम जाँग-उन (दुभाषकाच्या माध्यमातून) - "इथं पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. भूतकाळ... आणि जुने पूर्वग्रह आणि प्रथा या प्रगतीच्या मार्गावरील अडथळ्यांच्या रुपात काम करत होते. आम्ही त्यांच्यावर मात केली आणि आज आम्ही इथं आहोत."

सकाळी 7.00 - ऐतिहासिक फोटो

ट्रंप आणि किम यांच्या भेटीचे ऐतिहासिक फोटो.

सकाळी 6.55 - फक्त विचारपूस

उत्तर कोरियाचे विश्लेषक अंकित पांडा म्हणतात, दोन्ही नेत्यांमध्ये फक्त विचारपूस झाली आहे. अजून काही फार बोलले नाहीत.

सकाळी 6.46 - ट्रंप यांना विश्वास

आमचे संबंध उत्तम होतील, याबद्दल मला शंका नाही - डोनाल्ड ट्रंप

सकाळी 6.46 - हे सोपं नव्हतं - किम

किम जाँग-उन म्हणाले, आज जिथं आहोत तिथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं.

सकाळी - 6.41 - दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू

कॅपेला हॉटेलात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली आहे.

सकाळी 6.34 - हाच तो क्षण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन एकाच छायाचित्रात. हाच तो ऐतिहासिक क्षण.

सकाळी 6.33 - दक्षिण कोरियात उत्सुक्ता शिगेला

दक्षिण कोरियातील लोक टीव्हीवर या भेटीचं वार्तांकन पाहण्यात मग्न आहेत.

सकाळी 6.30 - ट्रंप कॅपेला हॉटेलात दाखल

ट्रंप यांचा ताफा कॅपेला हॉटेल परिसरात दाखल झाला आहे.

सकाळी 6.23 - किम जाँग-उन कॅपेला हॉटेलात दाखल

किम यांचा ताफा कॅपेला हॉटेल परिसरात दाखल झाला आहे.

सकाळी 6.20 - कॅपेला हॉटेलबाहेरील दोन्ही देशांचे ध्वज

याच ठिकाणी दोन्ही नेते पहिल्यांदा समोरासमोर येणार आहेत.

सकाळी 6.17 - इथेच होणार पहिली भेट

हीच ती बैठकीची खोली, जिथं किम आणि ट्रंप भेटणार आहेत.

सकाळी 6.15 - डेनिस रोडमनसुद्धा दाखल

NBA स्टार खेळाडू डेनिस रोडमन मंगळवारी पहाटेच सिंगापूरमध्ये दाखल झाला आहे. या ऐतिहासिक भेटीचा एक भाग होत असल्याचं मला आनंद होत असल्याचा तो म्हणाला आहे. या दोन्ही नेत्यांचा मित्र आणि दोघांना भेटलेली एकमेव व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जातं.

सकाळी 6. 13 - पण सिंगापूरच का?

दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी सिंगापूरच का निवडलं? वाचा बीबीसीचा स्पेशल रिपोर्ट - उत्तर कोरियाच्या किम यांनी अमेरिकेबरोबर चर्चेसाठी सिंगापूरच का निवडलं?

सकाळी 6.10 - किम यांचा ताफा दाखल

किम जाँग-उन हे बैठकीच्या ठिकाणी पोहचले आहेत. ट्रंप त्यांच्या आधीच आले आहेत.

सकाळी 6.07 - ट्रंप कॅपेला हॉटेलमध्ये पोहोचले

सकाळी 6.01 - ट्रंप यांचा ताफा

कॅपेला हॉटेलच्या दिशेनं नेते निघाले आहेत. जगभरातल्या मीडियात याचं लाइव्ह कव्हरेज सुरू आहे.

सकाळी 6 - जगभरातल्या पत्रकारांची गर्दी

या बैठकीच्या ठिकाणी जगभरातल्या माध्यम प्रतिनिधींची इथं गर्दी झाली आहे.

सकाळी 5.57 - ट्रंप दाखल

ट्रंप यांचा ताफा सँटोसा बेटावर दाखल झाला आहे.

सकाळी 5.55 - किम यांचा ताफा रवाना

किम जाँग-उन यांचा ताफा कॅपेला हॉटेलच्या दिशेनं रवाना.

सकाळी 5.54 - ट्रंप यांच्या मनात काय?

बैठकीच्या ठिकाणी जात असतानाच ट्रंप यांनी हे ट्वीट केलं आहे. यातून त्यांच्या मनात सुरू असलेले इतर विचार दिसून येतात.

या ऐतिहासिक बैठकीत सुरूवातीची 45 मिनिटं फक्त दोन्ही नेते आणि दुभाषक उपस्थित असतील. पहिल्याच मिनीटाला ही बैठक यशस्वी होईल की नाही हे मला कळेल असं ट्रंप म्हणाले आहेत.

सकाळी 5.45 - बैठकीचे ठिकाण

हे आहे कॅपेला हॉटेल जिथं ट्रंप आणि किम भेटणार आहेत. दुसऱ्या महायुद्धातल्या नरसंहाराचं ठिकाण आणि नंतर शांतीचं बेट म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण आहे.

सकाळी 5.40 - ट्रंप यांचा ताफा रवाना

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मोटारींचा ताफा सँटोसा बेटावरील कॅपेला हॉटेलच्या दिशेनं निघाला आहे.

इतिहासात आतापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष कधीही उत्तर कोरियाच्या नेत्याला भेटलेले नसल्यानं ही भेट ऐतिहासिक आहे.

सिंगापूरच्या मुख्य बेटापासून काही मीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध सँटोसा बेटावर स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होईल. या बैठकीसाठी ट्रंप आणि किम हे सिंगापूरमध्ये आधीच पोहोचले आहेत.

बैठकीच्या परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय नेते आणि अधिकारी थांबलेल्या ठिकाणीही कडक सुरक्षा आहे.

काही वेळेपूर्वी केलेल्या एका ताज्या ट्वीटमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या टीकाकांराना लक्ष्य केलं.

"मी करत असलेल्या या बैठकीमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होणार असल्याचं द्वेषकर्ते आणि अपयशी लोक सांगत आहेत. आमच्या चाचण्या, संशोधन आणि मिसाइल लाँचिंग थांबलेलं आहे आणि हे पंडित जे मला नेहमी चुकीचे ठरवतात त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. सगळं चांगल होईल."

तर दुसरीकडे किम जाँग-उन यांनी सोमवारी रात्री सिंगापूरमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या.

पर्यटक आणि सिंगापूरवासीयांच्या गर्दीकडे हात करून त्यांनी स्मितहास्य केलं. त्यांच अभिवादन स्वीकारलं. त्यांच्यासोबत सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री व्हिव्हियन बालकृष्णन हे सुद्धा होते. त्यांनी एक सेल्फीही ट्वीट केला आहे.

असा असेल बैठकीचा अजेंडा

- व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, या बैठकीचं नियोजन असेल.

- ट्रंप आणि किम स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता भेटणार.

- दोन्ही नेते वन-टू-वन बैठक करणार.

- इतर प्रतिनिधींबरोबरसुद्धा बैठक.

- ट्रंप आज संध्याकाळीच सिंगापूरहून अमेरिकेला परतणार.

- किम स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता सिंगापूर सोडतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)