'गायब असलेल्या दुबईच्या राजकुमारी गोव्यापर्यंत आल्या होत्या'

    • Author, गॅब्रिएल गेटहाऊस
    • Role, बीबीसी न्यूजनाइट

मार्चमध्ये दुबईच्या राजकुमारी शेख लतिफा बेपत्ता झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात दिसल्या नाहीत.

"बेपत्ता असलेल्या राजकुमारी शेख लतिफा यांच्याबाबतची माहिती जगाला द्यावी," असं आवाहन ह्युमन राइट्स वॉचनं दुबई प्रशासनाला केलं आहे.

मार्चमध्ये त्यांनी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं जातं. पण चैनींच्या वस्तूंनी भरलेलं त्यांचं जहाज किनाऱ्याजवळ इंटरसेप्ट करण्यात आलं आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांना दुबईत परत आणण्यात आलं.

त्यानंतर त्या लोकांसमोर आल्याच नाहीत. "काही कायदेशीर कारणामुळे त्या समोर येऊ शकत नाही," असं स्पष्टीकरण दुबई प्रशासनानं दिलं आहे. राजकुमारी नेमक्या कुठं आहेत आणि त्यांची स्थिती कशी आहे? याबाबत प्रशासनाने उत्तरं द्यावी असं ह्युमन राइट्स म्हणत आहे.

"जर प्रशासन राजकुमारी लतिफा यांचा नेमका पत्ता सांगण्यास असमर्थ ठरलं तर असं मानलं जाईल की, राजकुमारींना बळजबरीनं कुठेतरी ठेवण्यात आलं आहे," असं ह्युमन राइट्सचं म्हणणं आहे.

"शेख लतिफा या बेपत्ता आहेत, असा दावे जे लोक करत आहेत ते सर्व लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तसेच, त्यांच्या नावावर गुन्ह्यांची नोंदही आहे," असं दुबई प्रशासनानं बीबीसीला सांगितलं.

कोण आहेत शेख लतिफा?

लतिफा या दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या कन्या आहेत.

दुबईतून पलायन करण्यासाठी लतिफा यांना फ्रान्सचा माजी गुप्तहेर आणि फिनलॅंडच्या मार्शल आर्ट ट्रेनरनी मदत केली होती असं म्हटलं जातं.

लतिफा यांच्यावर बीबीसीनं न्यूजनाइट या कार्यक्रमात एक सविस्तर वृत्तांत सादर केला आहे. या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.

राजकुमारींचा व्हीडिओ संदेश

जर पलायन यशस्वी झालं नाही तर आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील याची त्यांना कल्पना होती.

त्यामुळं त्यांनी एक व्हीडिओ संदेश रेकॉर्ड करून ठेवला. त्यांचा हा संदेश त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी रीलिज केला आहे.

"मी हा व्हीडिओ बनवत आहे. कदाचित हा माझा शेवटचा व्हीडिओ ठरू शकतो. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, माझी परिस्थिती खरंच खूप खराब आहे. माझ्या वडिलांना फक्त त्यांची प्रतिष्ठाच प्रिय आहे," असं त्यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

संयुक्त अरब अमिरातच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे, असं देखील काही लोक म्हणतात.

लतिफा यांना स्कायडायव्हिंगचा छंद आहे आणि त्या दुबईमध्ये लोकप्रियही आहेत.

आकाशातून उडी मारण्यापूर्वी त्या नेहमी आपल्या देशाचा झेंडा फडकवत असत. त्या व्हीडिओमध्ये आनंदी दिसायच्या पण वास्तव खूप वेगळं होतं.

"त्यांची स्थिती सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखी होती," असं त्यांची मैत्रीण आणि मार्शल आर्ट्स ट्रेनर टीना योहियानेन यांचं म्हणणं आहे. त्यांनी न्यूजनाइटला सांगितलं, "लतिफांना मनमुरादपणे जगावंस वाटत असे."

2002साली देखील त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तिथं त्यांना 3.5 वर्षं ठेवण्यात आलं होतं.

फ्रान्सच्या माजी गुप्तहेरानं केली मदत

गेल्या वर्षी राजकुमारींनी फ्रान्सच्या गुप्तहेराशी संपर्क साधला होता. या गुप्तहेराचं नाव आहे अर्वे जबेयर. जबेयर हे दुबईतून वेषांतर करून पळाले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता.

जबेयर यांनी बीबीसीला सांगितलं, "दुबईतून पळून जायचं असेल अंडरवॉटर टॉरपीडो आणि नेव्ही सील सारखे कपडे वापरायला शिकावं लागेल, असं मी लतिफा यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी 30,000 डॉलर खर्चून हे सर्व सामान विकत घेतलं."

पण लतिफा यांनी हा मार्ग स्वीकारला नाही.

पळून जाण्याचा प्लॅन

लतिफा यांनी त्यांची मैत्रीण टीनासोबत एक योजना आखली. लतिफा आणि टीना दोघी जणी एक कार घेऊन ओमानला पोहोचल्या.

तिथून त्यांनी एक छोटी नाव घेतली आणि नंतर 'नोस्ट्रोमो' या लक्झरी यॉटवर त्या पोहोचल्या. तिथं जबेयर हे त्यांची वाट पाहत होते. तिथून ही यॉट भारताच्या दिशेनं वळवली गेली.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारला त्यांच्या पळून जाण्याची बातमी समजली आणि त्यांनी लतिफा यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संयुक्त अरब अमिरातीनं इंटरपोलकडेही अर्ज केला. त्यानुसार, रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.

लतिफा यांनी यॉटनं प्रवास केला ही बाब रेड कॉर्नर नोटीसमध्ये देखील लिहिली गेली आहे.

पण इंटरपोलच्या रेकॉर्डमध्ये वेगळीच नोंद आहे. लतिफा यांचं अपहरण करण्यात आलं होतं, असं त्यांच्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये लिहिलं आहे.

त्यानंतरची कथा अगदी धूसर आहे. हाती आलेली माहिती पडताळणं देखील कठीण आहे.

जेव्हा त्यांना पकडण्यात आलं त्यावेळी 'नोस्ट्रोमो'वरची पब्लिक ट्रॅकिंग सिस्टम बंद करण्यात आली. त्यामुळं त्याच्या मार्गाची नोंद सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.

पण बीबीसीनं 'नोस्ट्रोमो'चा सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टमचा डेटा मिळवला. त्यानुसार त्यांचं जहाज गोव्याच्या किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं हे समजतं. त्यानंतर सॅटेलाइट ट्रॅकर देखील बंद पडलं.

जबेयर सांगतात, "ओमानहून आम्ही जेव्हा भारताकडे येऊ लागलो होतो तेव्हा आमच्या यॉटचा पाठलाग काही जहाजांनी केला."

चार मार्चचा तो दिवस

त्या दिवसाची हकिकत टीना सांगतात, "जबेयर डेकवर होते. मी आणि लतिफा दोघी आमच्या केबिनमध्ये होतो. मला गोंधळ ऐकू आला. नंतर मला कळलं हा आवाज स्टन ग्रेनेड्सचा आहे."

जबेयर सांगतात, "मी बाहेर उभा होतो. काही गडबड असल्याचं माझ्या लक्षात आलं. तितक्यात एक नाव जलदगतीनं आमच्याकडं आली. त्या नावेवरच्या सैनिकांनी आमच्यावर बंदुका रोखल्या. असं वाटू लागलं होतं की ते आम्हाला संपवण्याच्याच निश्चयाने ते आमच्याकडे पाहत आहेत."

टीना सांगतात, "राजकुमारी लतिफा आणि मी खाली बाथरुममध्ये लपून बसलो. लतिफा खूप घाबरल्या होत्या आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली. मला परत नेण्यासाठी लोक आले आहेत असं लतिफा म्हणत होत्या. त्यानंतर आम्ही केबिनबाहेर आलो. बाहेर आल्यावर सैनिकांनी धक्का देऊन मला खाली पाडलं आणि माझे हात पाठी बांधले."

"लतिफा या ओरडू लागल्या. मला परत जायचं नाही. परत जाण्याऐवजी मी मरणं पसंत करीन असं त्या म्हणू लागल्या," असं जबेयर सांगतात.

पाच मिनिटांनी एक हेलिकॉप्टर तिथं आलं आणि त्यांना घेऊन गेलं.

"यॉटवर जे बोलणं सुरू होतं ते अरबीमध्ये नव्हतं तर इंग्रजीत सुरू होतं. यॉटवर पहिलं पाऊल ठेवणारा नौसैनिक हा अरबी नव्हता तर भारतीय होता," असं जबेयर म्हणतात.

"सुरुवातीला माझ्या हे लक्षात आलं नाही. पण त्यांच्या युनिफॉर्मवर इंडियन कोस्ट गार्ड असं लिहिलं होतं. ते राजकुमारीला म्हणत होते, कमॉन लतिफा लेट्स गो होम. लतिफा त्यांना म्हणत होत्या. मला परत जायचं नाही. मी भारताकडे राजकीय शरणागती पत्करते. पण त्यांचं कुणी काही ऐकलं नाही," जबेयर सांगतात.

बीबीसीनं भारत सरकारला याबाबत विचारणा केली असता सरकारनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

जेव्हा लतिफा यांना घेऊन हेलिकॉप्टर गेलं त्यानंतर काही संयुक्त अरब अमिरातीचे सैनिक तिथं आले आणि त्यांनी ते जहाज दुबईच्या दिशेला वळवलं. टीना आणि जबेयर यांना देखील सोबत नेलं. आठ दिवस चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

सकारात्मक बदल होईल

त्या दिवसानंतर लतिफा या बेपत्ता आहेत. त्यांना कुणी पाहिलं नाही की कुणी त्यांच्याशी बोललं नाही.

लतिफा यांच्या मित्रमंडळीनं जो व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्या म्हणतात, "ज्या ठिकाणी मला गप्प बसावं लागणार नाही अशा नव्या आयुष्याला सुरुवात होईल अशी मला आशा आहे. या संकटातून मी सही सलामत सुटले नाही तरी आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील असं मला वाटतं."

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)