#100Women : यंदा विक्रमी संख्येने महिला एव्हरेस्टची चढाई करणार

    • Author, नवीन सिंग खडका
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

माउंट एव्हरेस्ट - जगातल्या या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याची अनेकांची इच्छा असते. दरवर्षी शेकडो लोक या मोहिमेसाठी हिमालय गाठतात. यंदाही विक्रमी संख्येनं काही नेपाळी महिला गिर्यारोहक ही चढाई करणार आहेत.

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की 20 जण नेपाळच्या बाजूने गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यापैकी 15 नेपाळी महिला तर पाच नेपाळी पुरुष गिर्यारोहक आहेत.

यापूर्वी 2008 मध्ये सर्वाधिक दहा महिला गिर्यारोहकांनी 'एव्हरेस्ट समिट'पर्यंत पोहचण्यात यश मिळवलं होतं.

या वेळेस बहुतांश महिला गिर्यारोहक या लिंगभेद आणि पर्यावरणीय मुद्द्यांकडे जगाचं लक्ष वेधू इच्छितात.

"आमच्या टीमधील महिला गिर्यारोहकांचा दोन स्वतंत्र संदेशांवर भर असेल - एक म्हणजे महिलांची तस्करी रोखण्यासाठी पावलं उचलली जावीत, आणि दुसरं म्हणजे गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमध्ये झाला होता, याची आठवण जगाला करून देणं," असं शर्मिला लामा यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून बीबीसीला ही माहिती दिली.

पण हे मुद्दे का?

नेपाळमध्ये मानवी तस्करी हा गंभीर मुद्दा झाला आहे. ग्रामीण भागातील मुलींना तस्करांकडून फसवलं जातं. परदेशातल्या नोकरीचं आमिष दाखवून त्यांना घरापासून दूर करून देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं जातं.

2015च्या भूकंपावेळी नुकसान झालेला परिसर हा तस्करीसाठी प्रचलित असल्याचं काही अहवाल सुचवतात.

दुसरं म्हणजे, नेपाळ ही बुद्धांची जन्मभूमी आहे, हे सांगून लोकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं लामा सांगतात. "त्यांचा जन्म भारतात झाल्याची चुकीची माहिती काही लोकं जगात पसरवत असल्याचं दिसून आलं आहे."

'घरी न सांगताच मोहिमेवर निघाली'

टीमला अनेक खडतर आव्हानांचा सामनाही करावा लागत असल्याचं त्या म्हणतात.

"आम्ही इथले (हिमालयाचा भाग) नसल्यानं या उंचीवर काम करणं आमच्यासाठी कठीण जातं. मला डोकेदुखीचा त्रास आहे. पण आणखी काही दिवस. मला खात्री आहे की त्यावर मी मात करून आम्ही लवकरच चढाईला सुरुवात करू," असा विश्वास त्या दाखवतात.

लामा या स्वतः ट्रेकिंग गाइड आहेत आणि त्यांच्या टीममध्ये काही व्यावसायिक तर काही हौशी गिर्यारोहक आहेत. त्यापैकी एक आहे फोटोजर्नलिस्ट पूर्णिमा श्रेष्ठा.

एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर त्यांनी आधीच 'हसतमुख नेपाळी महिलांवर' एक छायाचित्र प्रर्दशन भरवलं आहे, आणि आता एव्हरेस्ट शिखरावर पोहचल्यावर तिथं असंच एक फोटो प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस आहे.

गेल्या वर्षी या भागात आयोजित करण्यात आलेल्या मॅरथॉनची छायाचित्रं त्यांनी घेतली होती. त्यामुळे या विषयात त्यांची आवड वाढली.

"जेव्हा मी काठमांडूला परतले आणि लोकांना सांगितलं की पुढील हंगामात मी एव्हरेस्ट शिखर सर करणार आहे, तेव्हा लोकांनी माझी चेष्टा करायला लागले," असं त्या म्हणाल्या.

"जे बेस कॅम्पपर्यंत पोहोचतात ते सगळेच जर एव्हरेस्टची चढाई करायला लागते तर आपण सगळेच एव्हरेस्ट गिर्यारोहक तयार होऊत असं ते म्हणायचे."

पण अशा प्रतिक्रियांमुळे स्वप्नांचा वेध घेत असताना त्या नाउमेद झाल्या नाही.

गेल्यावर्षी 27 वर्षांच्या पूर्णिमांनी जगातलं आठवं सर्वोच्च शिखर, नेपाळमधील माऊंट मनासालू, सर केलं होतं.

"माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि बघा मी एव्हरेस्टसाठी परत आले आहे," आता त्या सांगतात.

पाच महिला पत्रकारांच्या टीमनेसुद्धा नेपाळमध्ये माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिलांना प्रेरणा मिळावी, महिलांमध्ये कुठलंही आव्हान पेलण्याची क्षमता असते, हे दाखवून देण्यासाठी आम्ही सहभागी झाल्याचं रोशा बासनेत म्हणतात.

"आम्ही पत्रकार असल्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि समिटवरून सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर लाइव्ह प्रक्षेपण करण्याचा आमचा मानस आहे," असं त्या सांगतात.

मोहिमेदरम्यान आजारी पडल्यानं दोन वर्षांपूर्वी टीमच्या दुसऱ्या सदस्य कल्पना महाजन यांना एव्हरेस्ट चढाईची मोहीम अर्ध्यातच सोडावी लागली होती.

"प्रत्येक जण म्हणायचा की हे तुझं काम नाही. पण मी आशा सोडली नाही. माझ्या कुटुंबाला काही एक कल्पना न देता गेल्या वर्षी मी दुसऱ्या एका पर्वताची चढाई पूर्ण केली," त्या सांगतात. "मला यश मिळाल्यानंतरच या मोहिमेची माहिती मी माझ्या घरच्यांना दिली. त्यामुळेच मला यंदा एव्हरेस्ट चढाई करण्याची परवानगी मिळाली आहे."

आपलाच विक्रम मोडीत काढला

आणखी एका टीममध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्या सगळ्या जणी शेरपा समुदायातील आहेत.

हिमालयन परिसरातील उंचच उंच पर्वतरांगामध्ये भ्रमण करण्याच्या बाबातीत शेरपा समुदायातील लोक तज्ज्ञ, ज्ञानी आणि कुशल वाटाडे म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट चढाईचा मान असलेली महिला ही नेपाळची शेरपा असून सध्या त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

लख्पा शेरपा यांनी गेल्या वर्षी जगातल्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला. आठव्यांदा एव्हरेस्ट सर करण्याचा नवीन विक्रम त्यांनी प्रस्थापित केला.

नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, 1975मध्ये जपानच्या जुंको टाबै या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक होत्या. तेव्हापासून 2017 पर्यंत 323 महिला गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली.

तथापि, या वर्षांमध्ये किती महिलांनी एव्हरेस्ट चढाईचा प्रयत्न केला, याची माहिती सरकारी यंत्रणेकडे उपलब्ध नाही.

नेपाळच्या हिमालय पर्वतरागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मोहिमांचा रेकॉर्ड ठेवणाऱ्या 'द हिमालयन डेटाबेस' संस्थेच्या माहितीनुसार, 1998 ते 2017 दरम्यान 918 महिलांनी एव्हरेस्ट चढाईचा प्रयत्न केला. त्यापैकी 494 महिला गिर्यारोहकांना यश मिळालं.

यामध्ये त्या 44 नेपाळी महिला गिर्यारोहकांपैकी यशस्वी ठरलेल्या 35 महिलांचाही समावेश आहे. एकूण 3,195 पुरुषांनी एव्हरेस्ट सर केला असून त्यात 135 नेपाळी पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे.

नेपाळ आणि चीन अशा दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट चढाई करणाऱ्यांची ही आकडेवारी आहे.

जगातल्या सर्वांत मोठ्या शिखरावर चढाई करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच विक्रमी संख्येने नेपाळी महिला गिर्यारोहक या वेळेस चढाईचा प्रयत्न करत आहेत.

यंदाचा हंगाम नुकताच सुरू झाला असून मेच्या अखेरपर्यंत चालणार आहे. पर्यटन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बेस कॅम्पवर 350 गिर्यारोहक जमतील.

'द हिमालयन डेटाबेस'नुसार, 2013च्या सीझनमध्ये 665 गिर्यारोहक हे एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले होते, ज्यात त्यांचा सहाय्यक स्टाफही होता. अत्यल्प अनुभव गाठीशी असणाऱ्या लोकांना जगातल्या सर्वोच्च ठिकाणी चढाई करण्यासाठी परवानगी दिली जावी का, असा वादाचा विषय यातून चर्चेत आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)