'मासिक पाळी सुरू झाली अन् आजीची शेवटची आठवण हुकली...' #पाळीविषयीबोलूया

    • Author, मेघा मोहन
    • Role, बीबीसी स्टोरीज

मासिक पाळीमुळे धार्मिक कार्यासाठी प्रवेश मिळू न शकलेल्या लेखिकेचा दृष्टिकोन मांडणारी कथा.

'कोणाकडे टॅम्पून आहे का?' बाथरुममधून बाहेर येत मी विचारलं.

वाफाळत्या चहाच्या घोटासह रंगात आलेल्या गप्पांना एकदम ब्रेक लागला. प्रश्नाचं उत्तर मिळण्याऐवजी शांतताच पसरली. तामिळनाडूमधल्या रामेश्वरम शहरातल्या एका छोटेखानी हॉटेलच्या रूममध्ये आम्ही सगळे नातेवाईक बसलो होतो.

निःशब्द शांततेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. खिडकीवर पावसाच्या टपोऱ्या थेंबांचं वादन सुरू होतं आणि त्याचवेळी सतत गप्पांमध्ये रमणारं कुटुंब असं एकदम शांत झालं होतं.

आमच्या कुटुंबाचा पसारा तीन खंडात पसरला आहे. व्हॉट्स्अप ग्रुप सतत 'पिंगत' असतो.

हॉटेलातल्या दिवाणावर निवांत पहुडलेली मावशी उठली आणि हँडबॅग शोधू लागली. बॅगेतून सॅनिटरी नॅपकीन बाहेर काढत तिने मला दिला.

"एखादं मेडिकलचं दुकान मिळेपर्यंत हा नॅपकीन तुझी काळजी घेईल," असं मावशीने सांगितलं.

#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.

"पाळी सुरू झाली याचा अर्थ कळला ना तुला?" मावशीने विचारलं. मी 'नाही' म्हणून मान डोलावली.

मावशी म्हणाली, "तुला देवळात प्रवेश करता येणार नाही."

रामेश्वर शहर पर्यटन आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आम्ही या दोन्हीसाठी आलो नव्हतो. रामेश्वर गाठण्याचं आमचं कारण हळवं होतं.

वर्षभरापूर्वी माझी आजी गेली. आमच्या कुटुंबासाठी ती आधारवड होती. गोतावळ्यातल्या सगळ्यांना एकत्र सांधणारा दुवा होती ती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आजीने या जगाचा निरोप घेतला. मिळेल ते विमान पकडून आम्ही भारताच्या दिशेने निघालो.

माणूस गेल्यानंतर हिंदू धर्मात काही विधी केले जातात. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धती असतात.

दक्षिण भारतीय कुटुंबातील परंपरेप्रमाणे आमच्या घरीही काही प्रथांचं पालन केलं जातं. आजीचा देह घेऊन आम्ही गावच्या घरी पोहोचलो. शुभ्र कॉटन वस्त्रामध्ये लपेटलेला तिचा देह केळ्याच्या पानांवर ठेवण्यात आला होता. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आम्ही प्रार्थना केली.

अंत्यसंस्कारासाठी आजीचा देह घेऊन घरातली पुरुष मंडळी स्मशानभूमीकडे रवाना झाली. मलाही तिथे जायचं होतं. आजीला शेवटचं पाहायचं होतं. पण आमच्या पद्धतीनुसार स्त्रिया सहसा स्मशनाभूमीत जात नाहीत.

आजी गेल्यानंतर पुढचे 15 दिवस आम्ही मांसाहार केला नाही. तीन महिन्यानंतर आजीचं श्राद्ध केलं.

सगळे विधी आटोपल्यानंतर नातेवाईकांचा निरोप घेऊन आम्ही विमानतळ गाठला. आजीच्या पुढच्या क्रियाकर्मांसाठी वर्षभराने रामेश्वरला भेटू असं ठरवत जड मनाने परतलो. रामेश्वर हे हिंदूधर्मीयांचं पवित्र असं तीर्थस्थळ आहे.

रामेश्वरशी आणखीही काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 36 वर्षांपूर्वी आजोबा गेले तेव्हा आजीने या ठिकाणी शेवटचे विधी केले होते. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेलं रामेश्वर ऐतिहासिक देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. हिंदू पुराणांनुसार रामानं पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी रामेश्वरहूनच श्रीलंकेला जाण्यासाठी सेतू बांधला अशी आख्यायिका आहे.

तीन वेगवेगळे विमान प्रवास आणि नंतर गाडीच्या प्रवासाची दगदग या दरम्यान पवित्र रामेश्वर शहराबद्दलच्या अनेक गोष्टी मी ऐकत होते. शांतता आणि समाधानाने भरून पावलेले रस्ते, देवस्थानांची गोपुरं आणि दीपमाळा, भव्य पवित्र शिळा या गुणवैशिष्ट्यांसाठी रामेश्वर प्रसिद्ध आहे.

माझा पिंड अध्यात्मिक नाही. मात्र रामेश्वरला आल्यानंतर मला आत काहीतरी वेगळं जाणवलं. मला धार्मिकतेकडे झुकल्यासारखं वाटू लागलं. मीही भाविक झाले होते.

रामेश्वरबद्दल मी खूप विचार केला. आजीसारख्या खूप जवळच्या व्यक्तीला स्मरण्याचा आणि तिला पुन्हा निरोप देण्याचा क्षण कसा असेल याचाही मी खूप विचार केला.

मावशीने दिलेला सॅनिटरी नॅपकीन हातात घेत असताना तिचं वाक्य ऐकलं आणि मला हे सगळं लख्खपणे आठवलं. माझी मासिक पाळी सुरू झाली होती. कुटुंबाच्या आणि धर्माच्या नियमांनुसार आता मला आजीच्या श्राद्धकार्यावेळी उपस्थित राहता येणार नव्हतं.

"केवळ पाळी सुरू झालीये म्हणून श्राद्धकार्याला देवळात यायचं नाही असं म्हणायचंय का तुला?" मी विचारलं

मावशीनं माझ्याकडे बोचरा कटाक्ष टाकला. मी तरुण असताना असा प्रश्न विचारला असता तर खपूनही गेला असता कदाचित, पण तेव्हा पुरेसं वय झालेल्या माझ्यासारख्या पोक्त स्त्रीने असं सगळ्यांदेखत विचारणं अजिबातच शिष्टसंमत नव्हतं.

"माझं चुकलं", मी चटकन म्हणाले. "मी इतक्या लांबून फक्त आजीच्या श्राद्धकार्यासाठी आले आहे. आणि आता माझी पाळी सुरू झाली म्हणून देवळात होणाऱ्या कार्यावेळी मला हजर राहता येणार नाही, असं तुला म्हणणार नाहीस मला माहितीये."

"मला तसं म्हणायचं नव्हतं", ती म्हणाली, "पण आहे हे असं आहे."

"पण कोण म्हणतंय मग असं?" मी रेटून म्हणाले.

"हे असंच आहे. ही गोष्ट मोठी आहे आणि तिचं पालन करायला हवं." हे सांगतानाचा तिचा आवाज टोकदार झाला. माझ्या बाजूने बोलणं अडचणीत आणू शकतं हे दर्शवणारं ते कठोर वाक्य होतं. तिथे उपस्थित काहींना माझ्या पाठिंब्यात बोलायचं होतं. मला ते त्यांच्या देहबोलीत दिसतही होतं. पण ते बोलू शकले नाहीत. निर्णय झाला होता.

आजीचं श्राद्धकार्य सुरू असताना मला देवळाबाहेर ड्रायव्हरबरोबर थांबावं लागणार होतं.

मी वयात आले ते दिवस आठवले. पाळी सुरू झाली की गोष्टी बदलत. घरच्या सगळ्यांनी मिळून देवळात जाण्याच्या गोष्टीतून मला बाजूला करण्यात येत असे. ही पद्धत अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं माझ्या आणखी एका मावशीनं सांगितलं.

पूर्वीच्या काळी पाळीदरम्यान होणारा स्राव शोषून घेण्यासाठी स्त्रियांकडे अत्याधुनिक सॅनिटरी कापड नसायचं. पाळीदरम्यान स्त्रीला घरात बाजूला बसावं लागे अशी आठवण आईनेच मला सांगितली होती. प्रत्येक महिन्यातल्या त्या दोन दिवसात स्त्रीला स्वयंपाक करणं, पूजाअर्चा करणं ही कोणतीच कामं करता येत नसत. घरात बाजूला बसून पूर्ण आराम करण्याची मुभा स्त्रीला असे.

पाळीच्या काळात स्त्रियांना असं बाजूला बसवण्यात येत असे. या विषयासंदर्भात काही दिवसांपूर्वी मी तज्ज्ञांशी बोलले. हिंदू चौपदी पद्धतीनुसार पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र आणि अशुभ मानलं जातं. मात्र या कालावधीत स्त्री अत्यंत पवित्र असते असं एका पंडितानं मला सांगितलं.

माँट्रेअलस्थित मॅकगिल विद्यापीठात धर्मविषयक प्राध्यापक डॉ. अरविंद शर्मा यांचा हिंदू धर्मातील महिलांचे स्थान याविषयाचा अभ्यास आहे. अपवित्र आणि अशुभ या संकल्पनांशी निगडित असल्यामुळे पाळीच्या वेळी स्त्रीवर विविध प्रकाराची बंधनं असतात.

'मृतदेहाशी संपर्क करताना तसंच अन्य काही क्षणी माणूस परंपरेनुसार अपवित्र समजला जातो. धर्मग्रंथ असं का करावं याचं कोणतंही कारण देत नाही हे दुर्दैवी आहे. हिंदू धर्माच्या स्मार्त परंपरेत (स्मृतींवर आधारित धर्म परंपरा ) पाळीदरम्यान स्त्री अपवित्र आणि अशुभ मानली जाते. मात्र शाक्त परंपरेनुसार स्त्री पाळी काळात पवित्र मानली जाते. शाक्त परंपरेत स्त्रीचा गौरव केला जातो. स्त्रीला देवता मानली जाते', असं शर्मा यांनी सांगितलं.

भारतात सध्या सगळ्यांत चर्चित विषय पाळी हा आहे. ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याच्या मुद्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

#HappyToBleed या हॅशटॅगद्वारे महिलांनी पाळीदरम्यान असलेल्या जाचक प्रथा, परंपरांविरोधात बोलायला सुरुवात केली. पाळीशी संलग्न असलेल्या गैरसमजुतींविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी हा विषय केंद्रस्थानी असलेला पहिलावहिला चित्रपट आहे. महिलांना अल्पदरात सॅनिटरी पॅड मिळावेत यासाठी तामिळनाडूत कार्यरत सामाजिक कार्यकर्ते अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे.

'आई-बहीण-बायको-मुलगी अशा माझ्या आयुष्यात अनेक महिला आहेत. पण या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पाळीविषयक अनेक गोष्टी कळल्या. आपण जगतोय ते अश्मयुग नाही. पाळी ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे', असं पॅडमॅन चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारने सांगितलं.

हे सगळं डोक्यात येत होतं, जेव्हा माझ्या आजीचं श्राद्धकार्य देवळात सुरू झालं होतं. घरचे एकेक करून देवळात प्रवेश करत होते. मी हताशपणे देवळाबाहेर उभी असताना हे सगळं माझ्या डोळ्यासमोर तरळलं.

या श्राद्धकार्यासाठी येऊ न शकलेल्या बहिणीला मेसेज करण्यासाठी मी फोनवर व्हॉट्सअप उघडलं. तिने माझ्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. टायपिंग करण्यासाठी तिने थोडा वेळ घेतला.

"पाळी सुरू झाली आहे ते तू सांगायलाच नको होतंस. त्यांना कळलंच नसतं", असं ती म्हणाली.

"पाळी आलेली असताना तू कधी देवळात गेली आहेस का?" असा प्रश्न मी तिला विचारला.

"आपल्या वयाच्या मुली-बायका पाळी सुरू असताना देवळात जातात. पाळी आली आहे हे सांगत बसत नाहीत", असं तिने मला सुनावलं. अर्ध्या तासापूर्वी मावशीचं बोलणं माझ्या कानात पुन्हा

'कोणाला काही कळलं नाही तर काही फरक पडत नाही', असं माझ्या बहिणीने ठामपणे सांगितलं.

(मेघा मोहन भारतीय वंशाच्या लंडनला स्थायिक झालेल्या बीबीसी पत्रकार आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)