You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानातली निर्भया : झैनबच्या हत्येनं बदलेल का पाकिस्तान?
- Author, शुमाईला जाफरी
- Role, बीबीसी पाकिस्तान प्रतिनिधी
मला आज तेवढीच भीती वाटते जेवढी पाच वर्षांपूर्वी वाटत होती. जेव्हा दिल्लीतल्या रस्त्यावर एका चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता.
मला तेव्हाचं सगळं लख्ख आठवलं. हे सगळं ऐकून इतकी घाबरले होते की आजारीच पडले. मला स्वतःला असुरक्षित वाटू लागलं होतं. अशा वातावरणात दोन देशांमध्ये असलेल्या दुराव्याचा मी विचार करत नव्हते.
आज अशीच एक घटना पाकिस्तानात घडली आहे. आज जवळपास एक आठवडा झाला या घटनेला. कसूर इथं राहणाऱ्या 7 वर्षीय झैनबवर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
त्यामुळे मी परत एकदा दुःखी आणि निराश झाले आहे.
दररोज लैंगिक शोषणाच्या 11 तक्रारी
या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानात रोष व्यक्त केला जात आहे. यानंतर गेल्या काही दिवसांत लैंगिक शोषणाच्या डझनभर तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा घटनेला सामोरी जाणारी झैनब पहिली मुलगी नाही.
इस्लामाबादमधली लहान मुलांची संघटना 'साहिल'कडल्या माहितीनुसार, पाकिस्तानात दररोज लैंगिक शोषणाच्या अंदाजे 11 घटना होत आहेत. झैनबच्या घटनेनंतर पाणी डोक्यावरून गेल्याचंही स्पष्ट झालं आहे.
2016मध्ये पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या पोलीस प्रमुखांनी तिथल्या कोर्टात दिलेल्या आकड्यांनुसार, पंजाब प्रांतात 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 107 मुलींवरील बलात्काराच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
गेल्या वर्षी अशा बलात्काराच्या 128 घटना घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये दोषी पकडलं जाण्याचं प्रमाण पाहिलं तर मान शरमेनं खाली जाते. कारण, 2017मध्ये एकही व्यक्ती यात पकडली गेलेली नाही.
इथे दोषींना शिक्षा नाही
साहिल या संस्थेचे कार्यकारी संचालक मनीज बानो यांनी सांगितलं की, "अनेकदा पोलिसांकडे ठोस पुरावे नसतात. काही वेळेस कायद्यामधली गुंतागुंत वाढल्यानं या प्रकरणांचा तिढा सुटत नाही."
त्यांनी पुढे सांगतिलं की, "पीडितेला न्याय देण्यासाठी आरोपींना ताब्यात घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. समाजाला सुरक्षित वाटावं यासाठी प्रशासनानं दक्ष राहिलं पाहिजे."
दिल्लीमध्ये निर्भया ही पहिलीच मुलगी नव्हती, जिच्यासोबत अशी बलात्काराची घटना घडली आहे. मात्र, या घटनेनं देशातल्या सगळ्यांचंच आतडं पिळवटून निघालं होतं.
या घटनेमुळे संपूर्ण देश स्वतःला निर्भयाप्रमाणे पीडित समजू लागला होता. आणि यामुळेच लोक त्यावेळी रस्त्यावर उतरले होते.
निर्भयाच्या आरोपींना शिक्षा झाली. पण, तिचा मृत्यू देशातली एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदला गेला.
पाकिस्तानच्या रस्त्यांवर उद्रेक
भारताप्रमाणेच आता पाकिस्तानातील रस्त्या-रस्त्यांवर असाच राग दिसू लागला आहे. झैनबवरील बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या यानं सामान्य जनता हादरुन गेली आहे.
लोक या घटनेला विसरूच शकत नाही. अगदी भारतात त्यावेळी लोकांनी व्यक्त केलेल्या रागाप्रमाणेच आता पाकिस्तानातले लोकही राग व्यक्त करत आहेत.
आणि या रागाचं कारणही तितकंच गंभीर आहे. या कसूर भागात गेल्या एका वर्षात 12 मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. आणि इथल्या पोलिस सूत्रांप्रमाणे या 12 पैकी 9 मुलींवर कमीतकमी एकानं बलात्कार केला आहे.
झैनबवर झालेल्या या बलात्कार आणि हत्येनंतर 2015मध्ये झालेल्या एका घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी कसूर गावात एक सेक्स स्कँडल उघडकीस आलं होतं.
इथल्या हुसेन खान वाला गावांत शेकडो मुलांचं लैंगिक शोषण करून त्याच्या मोबाईलद्वारे चित्रफिती तयार करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला होता.
या घटनेच्या एकच वर्षानंतर पाकिस्तानच्या संसदेत एक कायदा पास करण्यात आला. ज्यात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराला गुन्हा ठरवण्यात आलं होतं. आणि या गुन्ह्यासाठी 7 वर्षांची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी फक्त बलात्कार हाच पाकिस्तानात गुन्हा होता.
लोकांची समजूत बदलणं गरजेचं
मात्र, हा कायदा झाल्यानंतर कसूर मधल्या लहान मुलांना न्याय मिळाला? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. कारण, या प्रकारांत केवळ दोनच जणांवर आरोप सिद्ध होऊ शकले आहेत.
डझनभर आरोपी सुटले आहेत तर काहींना जामीन मिळाला आहे. यामुळेच झैनबच्या प्रकरणाला पूर्णविराम मिळू नये अशी लोकांची इच्छा आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न उचलून धरावा अशी नागरिकांची इच्छा आहे.
काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार यात अपयशी ठरलं आहे. तर, काहींनी झैनाब बरोबर झालेल्या याप्रकारामुळे तिच्या आई-वडिलांसह समाजाला दोषी ठरवलं आहे.
सध्या सरणाऱ्या प्रत्येक दिवसासह जनतेत निराशा वाढू लागली आहे. कोर्टानं पोलिसांना तपासासाठीच्या वेळेत वाढ करून दिली आहे. पोलिसांनीही तपासाची व्याप्ती वाढवली आहे. मात्र, अजून हवे तेवढे पुरावे समोर आलेले नाहीत.
दोषी पकडले जावेत यासाठी अनेक कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. जबाबदार पालकत्वासाठी अभ्यासक्रमात बदल करणं आवश्यक असल्याची त्यांची मागणी आहे.
ज्या विषयांबाबत मुलं बोलायला घाबरतात, त्या विषयांबद्दल मुलांना माहिती देणं गरजेचं असल्याचं म्हणणं आहे.
लहान मुलांच्या या हक्कांसाठी बोलणाऱ्यांपैकी एक म्हणजे इथले अभिनेते एहसान खान. काही वर्षांपूर्वी लहान मुलांवरील लैंगिक शोषणावर आधारलेल्या 'उदारी' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं.
त्यावेळी खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करण्यात आली होती. या चित्रपटात असामाजिक गोष्टी दाखवण्यात आल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला होता.
त्यामुळे पाकिस्तानच्या माध्यम नियमन प्राधिकरणानं काही वेळासाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बंदी घातली होती.
बीबीसीशी बोलताना खान यांनी सांगितलं की, "आपण अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतो. लैंगिक अत्याचाराच्या घटनांप्रती आपलं गांभीर्य दाखवत नाही."
झैनब पाकिस्तानची निर्भया होईल?
सध्या समाजात बदलाची एक लाट दिसून येत आहे. सोशल मीडियाचा वापर करून लोक आपली मतं मांडू लागली आहेत. यात अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. आमच्यासोबतही अशा घटना घडल्याचं ते सांगत आहेत.
ज्या पद्धतीनं झैनबच्या दोषींचा शोध सुरू आहे, त्याच पद्धतीनं पाकिस्तानचा समाज आपल्या अंतर्मनात डोकावून लैंगिक अत्याचारांबद्दल आपला दृष्टिकोन बदलेल का? हा प्रश्न विचारू शकेल?
भारतात निर्भयाच्या हत्येनंतर अनेक गोष्टी बदलल्या. युवकांना आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याची इच्छा आहे. लिंग समानतेच्या जागरुकतेबद्दल भारतात आता चर्चा होऊ लागली आहे.
महिलांबद्दल समाजाचा विचार बदलावा यासाठी अनेक प्रकारची अभियानं चालवण्यात आली. महिलांना वेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. शाळांमधील अभ्यासक्रमात बदल करण्यात आले.
महिला आणि लहान मुलांवरील हिंसेला गंभीर गुन्ह्यांच्या यादीत टाकण्यात आलं. या सगळ्या प्रयत्नांमुळे महिला सक्षमीकरणाला एक नवी ताकद मिळाली.
मात्र, पाकिस्तानात या प्रकरणाला निर्भया प्रकरणासारखं समजलं गेलं पाहिजे? झैनबच्या हत्येनंतर लोकांमध्ये निर्माण झालेला राग निश्चित परिणामांपर्यंत पोहोचू शकेल? समाजातल्या अन्य झैनबसारख्या मुलींचं भविष्य सुरक्षित राहील? किंवा हा राग कालांतराने थंडावेल आणि पुन्हा असा प्रकार घडल्यानंतर उफाळून येईल?
आमचा प्रदेश 'शॉर्ट टर्म मेमरी सिंड्रोमनं' ग्रस्त असल्याचा तर इतिहासच आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)