निर्भयाच्या आईने दिला कोपर्डीच्या आईला धीर - 'हिंमत ठेवा, ही लढाई अजून संपलेली नाही'

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी तिघा दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अहमदनगर कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

2012च्या डिसेंबरमध्ये दिल्लीत घडेलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने देश हादरून गेला होता, अगदी तशीच कोपर्डीची घटना महाराष्ट्रभर गाजली.

पाच वर्षांपूर्वी निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिच्याच जिद्दीनं कोर्टात लढा दिला.

आपल्या मुलीसारखी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी निर्भयाची आई आशादेवी सिंग आजही लढा देत आहेत.

कोपर्डी प्रकरणात आज अहमदनगर सत्र न्यायालय शिक्षा सुनावली जात आहे. या घटनेविषयी बीबीसी मराठीनं आशादेवी यांच्याशी बातचीत केली.

"जिच्यावर बलात्कारासारखा प्रसंग ओढवतो तिच्यासाठी दु:ख खूप मोठं असतं. कुटुंब आणि समाजावरही हा मोठा आघात असतो. त्यामुळे दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे," असं त्या म्हणाल्या.

कोपर्डी प्रकरणात कोर्टानं दिलेल्या निकालावर तुम्ही समाधानी आहात?

बलात्कारासारखा प्रसंग म्हणजे मृत्यूपेक्षाही वाईट. मुलीसाठी आणि कुटुंबीयांसाठी याला सामोरं जाणं खूपच कठीण असतं. हा आघात फारच मोठा असतो. अशा कुटुंबांला समाजात वावरणंही कठीण जातं.

म्हणूनच दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असं मला वाटतं. प्रत्येक बलात्काऱ्याला फाशीच झाली पाहिजे. निर्भयासारखा न्याय या मुलीलाही मिळाला पाहिजे.

तुम्ही नेहमीच बलात्काऱ्याला फाशीचीच मागणी केली आहे. त्यामागचा विचार काय आहे?

हो. कारण कुणाला गोळी लागली किंवा काठीने वार झाले तर त्याच्या खुणा शरीरावर राहतात. ती जखम शरीरावर दिसते.

पण ज्या मुलीवर किंवा महिलेवर बलात्कार होतो, तिचं दु:ख दिसत नाही. निर्भयावर अत्याचार झाला. तिला झालेलं दु:ख सगळ्यांना दिसलं नाही.

त्यामुळे असं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.

काही कायदेतज्ज्ञांनी फाशीचा कमीत कमी वापर करून बलात्कार प्रकरणातही जन्मठेपेची मागणी केली आहे.यामागे दृष्टिकोन मानवतेचा आहे. तुमचं यावर काय मत आहे?

अजिबात नाही. बलात्कार प्रकरणात दोषींना माफी मिळता कामा नये. त्यांना जन्मठेप नाही, फाशीच झाली पाहिजे.

क्षणभर आपण मान्य करू की जे आमच्या बाबतीत जी घटना घडली, ती एक दुर्घटना होती. पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून बुजून असे गुन्हे केले जातात.

सध्याच्या जगात मुली आणि महिलांना जेवणाची थाळी समजलं जातं. जेवल्यानंतर थाळी जशी जंगलात फेकून दिली जाते, तसं विनयभंग करा आणि दुसरीकडे फेकून द्या, अशी मानसिकता आहे.

म्हणून मला वाटतं की असं कृत्य करणाऱ्यांची समाजात राहण्याची लायकी नाही.

कोपर्डीतल्या निर्भयाच्या आईवडिलांशी कधी बोलणं झालं आहे का?

नाही. त्यांच्याशी कधी बोलणं झालेलं नाही. पण मी त्यांना हेच सांगेन की, हिंमत ठेवा, अजून लढायचं आहे. ही लढाई संपलेली नाही.

सध्या खालच्या न्यायालयात खटला सुरू आहे. पुढे खटला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाईल. तिथे लढण्यासाठी बळ लागेल.

देवाकडे प्रार्थना की ही शक्ती कुटुंबीयांना मिळो. आणि त्यांनीही ही ताकद स्वत:मध्ये निर्माण केली पाहिजे.

आपण स्वत:ची मदत केली नाही, तर देवही मदतीला येणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, मी त्यांच्याबरोबर आहे. कधी भेट होईल नाहीतर नाही होईल, पण मी मनाने त्यांच्या बरोबर आहे.

त्यांच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे.

मातांना माझं हेच सांगणं आहे की, मुलीला दोषी समजू नका. उलट तिला न्याय मिळवून द्या. तिच्या दोषींना शिक्षा मिळेल, यासाठी पूर्ण प्रयत्न करा.

कोपर्डीतल्या घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक निषेध करणारे मोर्चे निघाले. निर्भयानंतरही वातावरण तापलं होतं. लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या रोषामुळं काही सकारात्मक बदल होत आहेत, असं वाटतं का?

बघा, जे काही होत आहे, ते फक्त बोलण्यापुरतं आहे. अगदी असंही नाही म्हणता येणार की काहीच बदललं नाही.

पण याबाबतीत फारशी प्रगती झालेली नाही. कारण इतक्या घटना रोज समोर येतात. कधी कुठला नेता पुढे येऊन नाही म्हणाला की, अशी घटना घडली आहे. आणि त्यासाठी सरकारने ही पावलं उचलली आहेत.

याचं कारण म्हणजे आपल्या समाजात अगदी सुरुवातीपासून पुरुषांचं वर्चस्व आहे. महिलांचं स्थान बरोबरीचं हे म्हणायला ठीक आहे.

पण प्रत्यक्षात ज्यांच्या घरी असे प्रसंग येतात, त्यांनाच याचं गांभीर्य माहीत असतं. इतरांसाठी हे नेहमीच घडणारं असतं.

मीडियामुळे निदान अशी प्रकरणं बाहेर येतात. त्यावर चर्चा होते. ही प्रकरणं लोकांपर्यंत तरी पोहोचतात.

निर्भया प्रकरणानंतर सरकारनं काही पावलं उचलली. कायद्यात बदल केले. त्यानंतर महिला आज सुरक्षित आहेत, असं वाटतं का?

नाही. कायद्यात बदल म्हणजे काय? वर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन झाली. त्यानंतर कायद्यात काही बदल करण्यात आले.

पण कायद्याची प्रक्रिया बघितली तर अपेक्षित बदल नाही झाले. उदाहरणासाठी आमचंच प्रकरण घ्या. तीनही कोर्टात जलदगतीने खटला चालला. शिक्षा सुनावली. पण दोषी अजूनही जिवंत आहेतच ना!

आमची लढाई आहे त्याच जागी आहे. पुन्हा अपील झालं. त्यामुळे आमच्या कोर्टाच्या फेऱ्या चुकलेल्या नाहीत. निर्भयाला न्याय कधी मिळणार, आम्ही अजूनही याच्याच प्रतीक्षेत आहोत.

निर्भया फंडाची स्थापना मध्यंतरी झाली होती. त्यातून पीडित मुलींना मदत अपेक्षित आहे. ती मुलींपर्यंत पोहोचतेय का?

मदत मिळालेली नाही. जेव्हा हा निधी उभारण्यात आला, तेव्हा तो महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाईल, असं ठरलं होतं.

पण मला नाही वाटत त्यातून कुणाला मदत मिळाली आहे. ना कोणा पीडित मुलीला यातून मदत मिळाली, ना तर अशा घटना टाळण्यासाठी काही उपयायोजना झाल्या.

महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं?

अशा घटनांमध्ये जरापण घट झालेली नाही. बलात्कार थांबवायचे असतील तर सगळ्यांत आधी आई-वडिलांनी आपल्या मुलींना सशक्त बनवलं पाहिजे.

दुसरं म्हणजे, या घटनांसाठी तुम्ही-आम्ही, समाज, कायदा, सगळेच जबाबदार आहोत. कारण आपलं या घटनांकडे दुर्लक्ष झालं आहे.

खास करून आईवडील आणि महिलांनी म्हणावा तसा आवाज उठवलेला नाही. जोपर्यंत आपण एकजुटीनं आवाज उठवत नाहीत, तो पर्यंत काहीही बदल होणार नाही.

ज्या महिला हळूहळू जागृत झाल्या आहेत, हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल?

मला आनंद झाला हे ऐकून. अशा स्त्रियांना माझ्या शुभेच्छा. मी त्यांना सांगेन तुमची ताकद ओळखा. तुम्ही कुणापेक्षाही दुबळ्या नाहीत.

कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. आपण सक्षम आहोत. आपण घर सांभाळतो, ऑफिस सांभाळतो, मुलांचं संगोपन करतो.

जर सगळ्यांसाठी आपण इतकं करतो, मग स्वत:साठी का नाही करू शकणार?

स्वत:च्या अधिकारांसाठी आपण का नाही लढत? मला तर वाटतं प्रत्येक मुलीने आपल्या अधिकारांसाठी लढलं पाहिजे. स्वत:ला ओळखा आणि स्वत:ची सुरक्षा स्वत: करा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)