ब्लॉग : #HerChoice स्त्री असू शकते वेश्या, पत्नी आणि प्रेमिकाही!

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.

तू...पत्नीपासून वेश्यांमध्ये फरक करतोस,

तू...पत्नीपासून प्रेयसीलाही वेगळं ठेवतोस,

किती त्रागा करतोस तू...

जेव्हा स्त्रीस्वच्छंद होते, स्वत:चं व्यक्तिमत्व शोधायचा प्रयत्न करते...

एकाच वेळी वेश्या, पत्नी आणि प्रेमिकांमध्ये !

प्रसिद्ध हिंदी कवी आलोक धन्वा यांनी 40 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'भागी हुई लडकियाँ' कवितेतील या काही अनुवादित ओळी आपल्याकडेच बोट दाखवतात, आजही असं वाटतं.

खरंच तर आहे, जेव्हा स्त्री स्वच्छंदपणे जगायला सुरुवात करते तेव्हा आपण किती त्रागा करून घेतो.

पण यामुळे स्त्रियांनी त्यांच्या स्वच्छंदीपणात काही बदल केलेला नाही किंबहुना तुम्ही काय विचार करता याचा त्यांना काही फरकही पडत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

या वास्तवाकडे तुमच्यातल्या काहींनी बघून दुर्लक्ष केलंय, काहींनी डोळ्यांना झापडं लावली आहेत पण असं असलं तरी, काही स्त्रियांनी स्वत:च्या आयुष्यात क्रांती घडवून आणली आहे, अगदी चुपचाप.

तेव्हा या स्त्रियांनी पुकारलेल्या बंडावर थोडा प्रकाश टाकावं असं आम्हाला वाटलं.

आम्हाला वाटलं, भारतातल्या त्या स्त्रियांशी तुमची ओळख करून द्यावी ज्या परंपरांना, सामाजिक समजांना छेद देत, स्वप्न आणि इच्छांचा पाठपुरावा करत स्वत:चं व्यक्तिमत्व शोधत आहेत.

या स्त्रिया आपल्यातीलच आहेत. भारतातल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, शहरी, ग्रामीण भागातल्या या स्त्रिया स्वत:च्या मर्जीनं म्हणजेच #HerChoiceनं जीवन जगत आहेत.

पुढच्या दीड महिन्यात आम्ही देशातल्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या 12 अशाच स्त्रियांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.

या कथा तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरतील. तसंच तरुण आणि वयस्क महिलांबद्दल असलेल्या तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्यासही हातभार लावतील.

आम्ही तुम्हाला एका अशा स्त्रीची कथा सांगू जिला लग्नानंतर कळालं की आपला नवरा नपुंसक आहे. जो शारीरिक संबंध ठेवू शकत नाही आणि ज्याला प्रेम करण्याची इच्छाही नाही.

त्या माणसानं तर समाजाच्या दबावाखाली खोटं बोलून लग्न केलं, पण या अपुऱ्या नात्यात काय केलं असेल त्या स्त्रीन?

एक मुलगी अशीही आहे जिला जन्मानंतर आई-वडिलांनी त्यांच्या प्रेम संबंधांसाठी सोडून दिलं. आई-वडील असतानाही अनाथाचं जीवन जगणाऱ्या या मुलीची इच्छा काय आहे?

समलैंगिक संबंधांबद्दल आपण बरंच काही वाचलं-ऐकलं आहे. पण कोणत्याही प्रेम संबंधांशिवाय दशकांपासून एकत्र राहणाऱ्या दोन महिलांना तुम्ही कधी बघितलं आहे? मुक्तपणे वावणाऱ्या या दोन जणींना तुम्हाला भेटायला आवडेल?

घटस्फोटित महिलेकडे नेहमी गरीब बिचारी या भावनेतून बघणाऱ्या स्त्री एक कथाही आपल्या या दृष्टीकोनाला तडा देणारा ठरेल.

या कथेद्वारे आम्ही तुम्हाला अशा घटस्फोटित स्त्रीची भेट घालून देणार आहोत जी घटस्फोटानंतरच स्वत:वर प्रेम करायला शिकली, स्वत:बद्दल अभिमान बाळगायला शिकली.

आपल्या इच्छेनुसार एकटीनं राहण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांच्याही कथाही अशाच मनोवेधक आहेत.

कारण लग्न न करण्याचा तो अवघड निर्णय म्हणजे कुटुंब आणि समाज यांच्याबरोबर युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नाही.

आणि या स्त्रिया आज आनंदी आयुष्य जगत आहेत. कोणी एकटीनं मजेत आयुष्य घालवत आहेत तर कुणी मुलीला दत्तक घेऊन तिला वाढवत आहे.

काही तर याहूनही मोठ्या मनाच्या आहेत. लिव्ह-न रिलेशनमध्ये प्रेग्नंट राहिल्यानं सोबत्यानं त्यांची साथ सोडली. याही परिस्थितीत त्यांनी मुलाला जन्म दिला आणि आज त्याला स्वत:च्या हिमतीवर वाढवत आहेत.

यात अशा स्त्रीचीही कथा असेल जिनं आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन लग्न केलं. पण त्यात तिला फक्त हिंसेला सामोर जावं लागलं. कशी सामोरी गेली ती या सगळ्याला? तिनं ते नातं कायम ठेवलं? की त्यातून बाहेर पडण्याची हिंमत दाखवली.

पती मारझोड करत नाही, पण प्रेमही करत नसेल तर? अशा निरस वैवाहिक जीवनात रस भरण्याचा काय उपाय आहे? पत्नी आणि आईची भूमिका वठवताना महिलेच्या मनात अपुरेपणाची भावना निर्माण होते का? आणि जर त्या अपुरेपणावर उपाय शोधायला ती कुणा परपुरुषासोबत वेळ घालवत असेल तर?

आपल्याच नवऱ्यापासून दूर जावंसं का वाटतं स्त्रीला? या प्रश्नाचं उत्तर सांगणारी कथाही तुम्हाला वाचायला मिळेल. ज्यात नातं तोडण्याऐवजी त्याला सुसह्य बनवण्यासाठी स्त्रीनच शोधलेला रस्ताही तुम्हाला दिसेल.

महिला विकलांग असेल तर पुरुष आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नजरेत सक्षम कसं बनायला हवं? लग्नाअगोदर संबंध ठेवण्याची हिंमत आणि मग त्या संबंधांमध्ये स्वत:च्या क्षमतांवरील विश्वास पटवून देण्यासाठीचे प्रयत्नही एका महिलेच्या कथेत तुम्हाला भेटतील.

कमी सुशिक्षित अशा स्त्रीची एक कथाही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, जी एका बेजबाबदार नवऱ्यासोबत राहत आहे. जो काही कमावत तर नाही, पण जरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवतो.

मुलांच्या जन्मावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही, महिलेचं शरीर कमकुवत होत चाललं आहे, पण नातं तोडण्याची हिंमतही नाही. काय करते अशी स्त्री? तिची इच्छा काय असते? शेवटी तिच्यासमोर काय पर्याय उरतो?

बीबीसीच्या विशेष सीरिज #HerChoice मध्ये येत्या शनिवार-रविवारपासून वाचा अशा 12 सत्यकथा. वाचा आणि विचारही करा.

विचार करणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे.

कारण हे जे घडतंय ते आपल्यामध्येच होत आहे. कुणी विचार करत आहेत, तर कुणी प्रत्यक्षात त्याला भिडली आहे. अशा स्त्रियांना जाणून घेण्याची ही संधी आहे.

जसं 'भागी हुई लडकियाँ' या कवितेत कवी आलोक धन्वा लिहितात,

कितीतरी मुली मनातल्या मनात बंड करतात ,

रात्री त्याविषयीचं मनोगत त्या आपल्या डायरीत उतरवतात ,

खऱ्या अर्थानं बंड पुकारलेल्या या मुलींपेक्षा अशा शांततेत क्रांती करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)