बिग बॉस जिंकणाऱ्या शिल्पा शिंदेबद्दल हे माहीत आहे का?

शंभर दिवसांपेक्षा जास्त चाललेला एक प्रवास काल संपला आणि या प्रवासात सर्वांत जास्त ज्या व्यक्तीची चर्चा झाली, तीच व्यक्ती विजेती बनून सर्वांसमोर आली. बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये जिंकलेल्या शिल्पा शिंदेची ही गोष्ट आहे.

शिल्पा शिंदेनं हिना खान आणि विकास गुप्ता सारख्या नामवंत कलाकारांना मागे टाकत बिग बॉसच्या अकराव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे.

बिग बॉस 11च्या किताबासोबतच शिल्पाला बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि तब्बल 44 लाख रुपये मिळाले आहेत.

या विजयानंतर शिल्पानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, "हा प्रवास माझ्यासाठी खूप चांगला होता. मी खूप वाईट काळातून गेले आहे आणि आता या सर्व गोष्टींना मागे टाकून मी आशा करते की माझं आयुष्य सुख-समृद्धीनं भरून जाईल."

प्रतिमा बदलण्यासाठी

शिल्पा सांगते, "मी याआधी बिग बॉसची फार फॅन वगैरे नव्हते. पण आता ही ट्रॉफी हातात आल्यानंतर माझं जग पार बदलून गेलं आहे. बिग बॉसच्या घरात बंदिस्त झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी काहीच संबंध राहात नाही. हा एक वेगळाच अनुभव आहे."

बिग बॉसमध्ये जाण्याआधी शिल्पा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होती. 'भाभीजी घर पे है?' या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आणि जाहीरपणे झालेल्या भांडणांमुळे तिची प्रतिमा मलीन झाली होती.

पण या विजयानंतर परिस्थिती बदलेल अशी शिल्पाला आशा आहे. बिग बॉसमध्ये आपली प्रतिमा बदलण्यासाठी ती सहभागी झाली होती का? त्यावर तिने सांगितलं, "सहाजिकच शोमध्ये सहभागी होण्याचं हे एक सर्वांत मोठं कारण होतं."

"अनेक लोकांचा हा गैरसमज झाला होता की मी खूप नखरे करते आणि खूपच गर्विष्ठ आहे, पण बिग बॉसमध्ये गेल्यावर मी प्रतिमा बदलणार आहे हे मला माहीत होतं. कारण 100पेक्षा अधिक कॅमेऱ्यांसमोर जवळजवळ 105 दिवस तुम्ही नाटक नाही करू शकत..." शिल्पा सांगते.

ती सांगते, "मी स्वत:ला ओळखते आणि मला विश्वास होता की, सगळ्यांना माझा खरा स्वभाव या शोच्या माध्यमातून कळेल. गैरसमज दूर होतील."

1999मध्ये सुरू झालेला प्रवास...

'भाभी जी घर पर है?'आणि 'बिग बॉस-11'च्या आधी शिल्पा शिंदे मनोरंजन जगतात अनेक वर्षं काम करत होती.

40 वर्षांच्या शिल्पाचा टीव्हीचा प्रवास 1999मध्ये सुरू झाला. पहिल्यांदा ती 'भाभी' या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेतून सर्वांसमोर आली.

यानंतर ती 'कभी आए ना जुदाई'मध्ये दिसली आणि 'संजीवनी' मालिकेत तिने चित्रा नावाची भूमिका साकारली. तिने दूरदर्शनवरच्या 'मेहर : कहानी हक़ और हक़ीक़त की' या मालिकेतही काम केलं आहे.

सब टीव्हीवरच्या 'चिड़ियाघर' मालिकेमुळे शिल्पाचं कॉमिक टाइमिंग सगळ्यांसमोर आलं. पण तिला सर्वांत जास्त प्रसिद्धी मिळाली ती 'भाभी जी घर पर हैं?'मुळे.

शिल्पाने शिकवलेलं.... 'सही पकडे है'

भाभीजी घर पर है या विनोदी मालिकेत शिल्पाने 'अंगुरी भाभी'ची व्यक्तिरेखा सर्वांसमोर उभी केली. या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली.

चुकीचं इंग्रजी बोलल्यावर आणि समोरच्यानं दुरुस्त केल्यावर 'सही पकड़े हैं' हा तिचा डायलॉग लोकप्रिय झाला. या डायलॉगमुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

ही भूमिका आणि हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला की शिल्पाने ही मालिका सोडल्यानंतर 'अंगुरी भाभी' बनलेली शुभांगी अत्रेसुद्धा हा डायलॉग वापरताना दिसते.

का सोडली मालिका?

इतकं यश मिळूनसुद्धा शिल्पानं ही मालिका सोडली. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला मानसिक त्रास दिल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे.

तिनं मालिकेचे निर्माते संजय कोहलींवर लैंगिक शोषणाचा आरोपही केला होता. संजयच्या पत्नीनं तिचं करिअर संपवण्याची धमकी दिल्याची तक्रार तिनं केली होती.

या प्रकरणात सिने अॅँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनबरोबर तिचा वाद झाला. शिल्पानं त्यांच्याविरुद्धही मानहानीचा खटला दाखल केला होता.

तिचं शो सोडून जाणं वादात सापडलं. कारण शिल्पाचे लैंगिक शोषणाचे आरोप संजय कोहलींनी निराधार असल्याचं सांगितलं.

शो सोडल्यावर शिल्पा बराच काळ बेरोजगार होती. त्याचदरम्यान तिनं 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात एक आयटेम साँगही केलं होतं.

रोमितशी लग्न होणार होतं...

मायका या टीव्ही शोचा रोमित राज याच्याशी तिचं लग्न होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण शेवटच्या क्षणाला काहीतरी गडबड झाली आणि आणि त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

शिल्पा मागच्या वर्षी हिंदी चित्रपट 'पटेल की पंजाबी शादी'च्या गाण्यात थिरकताना दिसली त्यावेळीही तिला बॉडी शेमिंगप्रकरणी ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

अनेक वर्षांपूर्वी तिनं दोन तेलुगू चित्रपटात देखील काम केलं होतं. पण तिला तिथे फारसं यश मिळालं नाही. एकूणच शिल्पा शिंदेचं व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)