75 वर्षांपूर्वीचा आईचा आवाज ऐकणं सुखद धक्का : वेणूताईंच्या मुलीची प्रतिक्रिया

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

१९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीनं मराठीतून प्रसारण सुरू केलं होतं. वेणूताई चितळेंनी मराठीतून बातम्या दिल्या होत्या. 75 वर्षांपूर्वीचा आईचा आवाज ऐकून त्यांची कन्या नंदिनी आपटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

१९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीनं मराठीतून प्रसारण सुरू केलं होतं. तेव्हा वेणू चितळे लंडनहून मराठीत आणि इंग्रजीतही बातम्या द्यायच्या. वेणूताईंची ही कहाणी बीबीसी मराठीनं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली.

बीबीसीच्या संग्रहात वेणूताईंचा आवाज गवसेल असं त्यांच्या कुटुंबीयांनाही वाटलं नव्हतं. त्यांच्यासाठी हे एक खास सरप्राईज होतं.

वेणूताईंची लेक नंदिनी आपटे यांनी बीबीसी न्यूज मराठीच्या व्हीडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्या आईचा रेडियोवरील आवाज ऐकला.

आईचा 75 वर्षांपूर्वीचा आवाज ऐकल्यावर नंदिनी आपटे यांना काय वाटलं? त्यांच्याच शब्दांतली ही प्रतिक्रिया --

उत्साह, आश्चर्य आणि आनंद

मी अगदी उत्साहात, काहीशा घाईघाईतच मला पाठवण्यात आलेली लिंक उघडून पाहिली.

सुरूवातीला भराभर व्हीडिओ पाहिला, कहाणी वाचली. तेव्हा अनेक गोष्टींकडे खरंतर माझं लक्षही गेलं नाही- हे स्वाभाविकच आहे.

मग थोड्यावेळानं शांतपणे बसून मी पुन्हा ही बातमी पाहिली, तेव्हा कुठे मला बऱ्याच गोष्टी जाणवल्या.

उपलब्ध माहिती आणि कमी वेळात ही कहाणी बांधली गेली होती. अडीच मिनिटांत एवढं सगळं सांगणं ही सोपी गोष्ट नाही.

मी दुसऱ्यांदा व्हीडिओ पाहिला, तेव्हा सुरुवातीला असलेल्या आवाजानं माझं लक्ष वेधलं. रेडियोवरून युद्धासंबंधी बातम्या देणारा तो आवाज.

अगदी खरं सांगायचं, तर मी तो आवाज, उच्चार काहीच ओळखीचं नव्हतं. 'नमस्ते महाराष्ट्र' म्हणताना खास शैलीत शेवटच्या 'र' वर दिलेला भर वेगळा वाटला.

पण लक्ष देऊन पुन्हा पुन्हा ऐकल्यावर मला वाटलं, हा माझ्या आईचा आवाज असावा. माझ्या आईचा तिच्या तरूणपणीचा आवाज.

पण तरीही माझ्या मनात शंका डोकावली. कदाचित, रेडिओचा आभास व्हावा यासाठी हा कुणा दुसऱ्याचा आवाज तर वापरला नसावा?

मला वाटलं, हे स्पष्ट व्हायला हवं. म्हणून मी जान्हवीला मेसेज करून विचारलं, हा माझ्या आईचा ओरिजिनल आवाज आहे का?

तिनं अगदी लगेचच रिप्लाय केला, "होय, हा त्यांचाच आवाज आहे."

त्यानंतर मी पुन्हा तो आवाज ऐकला आणि मला त्यातलं साम्य जाणवू लागलं.

75 वर्षांपूर्वीचा आईचा आवाज

मला एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. आम्ही माझ्या आईचा, तिच्या तारुण्यातला आवाज कधीच ऐकला नव्हता. त्यामुळंच तिचा आवाज ओळखण्यास थोडा वेळ लागला असावा.

इतक्या वर्षांनंतरही ते रेकॉर्डिंग किती स्पष्ट आहे हे ऐकून थक्क व्हायला होतं. जवळपास 75 वर्षांपूर्वीचा हा आवाज आहे.

मला इथं बीबीसीचं कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी इतकी वर्ष हे रेकॉर्डिंग संग्रहात ठेवलं. ज्या टीमनं हे रेकॉर्डिंग शोधून काढलं त्यांनाही हॅट्स ऑफ.

बीबीसी मराठीला इतक्या वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीची कहाणी मांडावीशी वाटली, हेही कौतुकास्पद आहे. यातूनच एखाद्या संस्थेची प्रकृती दिसून येते- त्यांनी इतिहासाला आणि माणसांनाही महत्त्व दिलं आहे.

माझ्यासाठी तर हा अनुभव अगदी थरारक आणि आनंददायक ठरला आहे.

प्रतिक्रियांचा पाऊस

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नंदिनीताईंनी आलेल्या प्रतिसादाबद्दल त्या म्हणतात --

मी अनेकांसोबत ही बातमी शेअर केली. पण त्याआधीपासूनच अनेकांच्या मला प्रतिक्रिया आल्या आहेत. सर्वांनीच खूप प्रशंसा केली आहे.

कुणाला छायाचित्रं आवडली, कुणाला काळाच्या ओघात मागे गेल्यासारखं वाटलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इतक्या वर्षांनंतरही हे सारं काही अगदी ताजंच असल्यासारखं वाटतंय कुणाला.

अनेकांना ही गोष्ट प्रेरणा देते आहे. त्या काळातही एक स्त्री होती, जिनं हे सारं काही केलं.

कुणी तिच्या संघर्षाविषयी बोलतंय. कुणी तिच्या पेहरावाचा उल्लेख केला आहे. एका थंड देशात साडी नेसून वावरणं कसं जमलं असावं?

मला विशेष आवडलं ते या कहाणीतलं अॅनिमेशन. तरुण, मोकळ्या केसांच्या वेणूला पाहणं हा रंजक अनुभव होता. प्रभावी सिनेमॅटिक लिबर्टीचं हे उदाहरण ठरावं.

हे सगळंच अविस्मरणीय आहे.

वेणूताईंची कहाणी प्रेरणादायी

आता माझ्या एका मैत्रिणीला त्यांच्या वाङमय मंडळात ही गोष्ट सांगायची आहे. लोक वेणूच्या कहाणीत रस दाखवत आहेत.

लोकांना इतिहासात इतका रस वाटतो आहे, हे अनपेक्षित आहे. युद्ध, परदेशात राहणारे भारतीय, त्यांचं यश आणि संघर्ष हे आजच्या काळातही समर्पक आहे.

आजची युवा पिढी, अगदी आमच्या घरातली मुलं-मुल अशा संघर्षापासून अनभिज्ञच आहे.

परदेशात जाऊन काम करणं, हे आता कठीण नाही, त्यात काही नवलाई उरलेली नाही.

पण ज्या काळात आजच्या सारखं प्रगत तंत्रज्ञान किंवा सोयी सुविधा नव्हत्या, त्या काळाविषयी त्यांच्याही मनात उत्सुकता आहेच.

काळासोबत आता परिस्थितीही बदलली आहे, तरीही काही आव्हानं तशीच आहेत. पण आज मुलींसमोरही जास्त पर्याय आहेत.

तुमच्यासमोरील आव्हानांना कसं तोंड द्यायचं हे मला आईकडून शिकायला मिळालं. ती हसतमुख आणि स्वतःआधी इतरांचा विचार करून वागणारी होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)