You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी : चार नव्या भारतीय भाषांमध्ये आजपासून सेवा सुरू
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने आजपासून मराठीसह चार भारतीय भाषांमध्ये सेवा सुरू केली आहे. 1940 नंतर बीबीसीच्या सेवांचा हा सगळ्यात मोठा विस्तार आहे.
मराठी, गुजराती, पंजाबी आणि तेलुगू अशा चार नव्या भारतीय भाषांमध्ये आता 'बीबीसी'ची सेवा सुरू झाली आहे.
इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, उर्दू या भाषांतील बीबीसीच्या सेवा अस्तित्वात आहेतच. त्यामुळे बीबीसी भारतात आता एकूण नऊ भाषांमध्ये बघायला मिळेल. चारही नव्या सेवा आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे सोळा तास कार्यरत असतील.
आजपासून बीबीसी न्यूज सेवेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून यासोबतच 'बीबीसी दुनिया' हे रात्री प्रसारित होणारे हिंदी टीव्ही बुलेटिन आजपासून 'इंडिया न्यूज' या चॅनेलवर नव्या स्वरूपात दिसेल.
दिल्ली ब्युरोचा विस्तार
नव्याने सुरू होणाऱ्या या चारही सेवा ऑनलाईन आणि सोशल मीडियावर उपलब्ध असणार आहेत.
आज रात्रीपासून तेलुगू भाषेतील टीव्ही बुलेटिन 'प्रपंचम' सुरू होत आहे. हे बुलेटिन ईनाडू टीव्ही आंध्र प्रदेश आणि ईनाडू टीव्ही तेलंगणा या चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
या नव्या सेवा म्हणजे 'बीबीसी'च्या भारतामधील लक्षणीय गुंतवणीचा हा एक भाग आहेत. या अंतर्गत 'बीबीसी'च्या दिल्ली ब्युरोचाही विस्तार करण्यात आला आहे.
बीबीसीच्या दिल्लीतील ब्युरोमध्ये दोन नवीन टीव्ही स्टुडिओ स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दिल्ली ब्युरो हा 'बीबीसी'चा 'यूके'बाहेरील सर्वात मोठा ब्युरो असेल.
तसंच दिल्ली ब्युरो आता संपूर्ण दक्षिण आशियासाठी व्हीडिओ, टीव्ही आणि डिजिटल कण्टेण्ट निर्माण करणारं केंद्र ठरणार आहे.
भारतीय भाषांबरोबरच आफ्रिका आणि उत्तर कोरियातील सात भाषांमध्ये बीबीसीची सेवा सुरू होणार आहे.
आशियाई भाषा
- मराठी- भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात ही भाषा बोलली जाते.
- गुजराती- ही भाषा गुजरात राज्यात, भारतीय उपखंडात तसंच संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात बोलली जाते.
- तेलुगू- अनेक भारतीय भाषांप्रमाणेच ही भाषा देखील लाखो लोकांची बोलीभाषा आहे. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यात ही भाषा बोलली जाते.
- पंजाबी- जगातील सगळ्यात लोकप्रिय भाषांत पंजाबी भाषेचा समावेश होतो. ही भारतात आणि पाकिस्तानच्या काही भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे.
- कोरिअन- बोलीत थोड्या-फार फरकाने उत्तर आणि दक्षिण कोरिआमध्ये ही भाषा प्रचलित आहे. पॉप कल्चरची स्लँग आणि परकीय भाषांतील शब्द प्रामुख्याने दक्षिण कोरियाच्या बोलीत मोठ्या प्रमाणावर असतात.
आफ्रिकन भाषा
- अफान ओरोमो : ही इथियोपियामधील सगळ्यात मोठ्या पारंपरिक समाजाची भाषा आहे.
- अम्हारिक: ही इथियोपियाची अधिकृत भाषा आहे.
- तिग्रिन्या : अरेबिक भाषेबरोबरच ही इर्ट्रिया देशाची कामकाजाची भाषा आहे.
- इबो: ही नायजेरियाची अधिकृत भाषा आहे. इक्वेटोरिअल गिनीमध्येही ही भाषा बोलली जाते.
- योरोबा: ही भाषा नैर्ऋत्य नायजेरियात तसंच पश्चिम आफ्रिकेच्या बेनिन आणि टोगो भागात बोलली जाते.
- पिजिन: ही भाषा इंग्रजीतूनच जन्मलेली स्थानिक बोली असून दक्षिण नायजेरिया, घाना, कॅमरून, आणि इक्वेटोरिअल गिनी भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाते.
नव्याने सुरू होणाऱ्या भारतीय भाषांतील या सेवांच्या प्रारंभासाठी 'बीबीसी'चे डायरेक्टर जनरल लॉर्ड हॉल ऑफ बर्कनहेड भारतात आले आहेत.
दिल्लीतून या सेवांच्या आरंभाची घोषणा करताना ते म्हणाले, "बीबीसीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या विस्ताराच्या आरंभासाठी भारतात असल्याचा मला आनंद आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारतीयांनी निष्पक्ष आणि स्वतंत्र बातम्यांबद्दल बीबीसीवर विश्वास ठेवला आहे आणि आता लाखो भारतीयांना बीबीसी त्यांच्या भाषेत उपलब्ध होणार आहे."
"आम्हाला माहिती आहे की, भारतभर बीबीसीवर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. आता आम्हाला बीबीसी न्यूज नवीन प्रेक्षकांपर्यंत खासकरून तरुण वर्गापर्यंत घेऊन जायचं आहे."
"त्यासाठी आम्ही भारतातील प्रतिभावान लोकांची निवड केली आहे आणि या कार्यक्रमानिमित्त त्या सर्वांना भेटणं माझ्यासाठी गौरवाचं असेल."
दोन नवे सहकारी
शिवाय 'बीबीसी'ला भारतात इंडिया न्यूज आणि ईनाडू टीव्हीसारखे दोन नवीन सहकारी लाभल्याचाही मला आनंद झाला आहे", असंही लॉर्ड हॉल ऑफ बर्कनहेड म्हणाले.
ईनाडू टीव्ही नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. बापिनीडू म्हणाले,
"जगभरात बीबीसीला त्यांच्या विश्वासार्हतेमुळे ओळखलं जातं. वैश्विक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय बातम्या तेलुगू भाषेत देण्याचा बीबीसीचा हा उपक्रम ईटीव्ही नेटवर्कच्या जास्तीत जास्त तेलुगू प्रेक्षकांपर्यंत खरी बातमी पोहोचण्याच्या प्रयत्नांत भर घालणारा ठरेल."
आयटीव्ही नेटवर्कचे संस्थापक, प्रवर्तक आणि इंडिया न्यूजचे प्रमुख कार्तिकेय शर्मा म्हणाले,
"बीबीसीला त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष बातम्यांसाठी ओळखलं जातं. आता या बातम्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत आणि फॉरमॅटमध्ये सहजपणे पोचणार आहेत.
"इंडिया न्यूज चॅनेल देशाची नस ओळखून थेट आणि जबाबदारीने केलेल्या वार्तांकनासाठी देशभरात ओळखलं जातं. आता आम्ही एकत्र आल्यामुळे आंतरराष्ट्रीयदृष्टया महत्त्वाच्या बातम्यांवर लोकांचा वैश्विक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होईल."
मराठी टीव्ही बुलेटिन लवकरच
'बीबीसी दुनिया' या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 'बीबीसी प्रपंचम' हा कार्यक्रम ईनाडू टीव्ही आंध्र प्रदेश आणि ईनाडू टीव्ही तेलंगणा या चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे.
दोन्ही बुलेटिन्स जगाचा धावता आढावा घेणारी असतील. याद्वारे खरी पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. तसंच दिवसभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडोमोडींबाबत वैश्विक दृष्टिकोन प्रेक्षकांना मिळेल.
मराठी भाषेतील न्यूज बुलेटिन थोड्याच काळात सुरू होईल आणि गुजराती भाषेतील बुलेटिन पुढील वर्षी सुरू करण्यात येईल.
80 वर्षांनंतरचा मोठा विस्तार
सध्या बंगाली, हिंदी, तमिळ, उर्दू आणि इंग्रजी या भाषांतून बीबीसी न्यूज देशभरात 2 कोटी 80 लाख लोकांपर्यंत पोहोचत आहे.
भारतात झालेली गुंतवणूक ही बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 1940 नंतरचा सर्वात मोठ्या विस्ताराचा भाग आहे.
यासाठी यूके सरकारनं 291 मिलियन पौंड एवढी गुंतवणूक केली आहे.
बीबीसीने या अगोदर पिजिन, अफान ओरोमो, अम्हारिक, तिग्रिन्या आणि कोरियन भाषांमध्ये सेवा द्यायला सुरूवात केली आहे. लवकरच योरोबा, इबो आणि सर्बियन भाषांमधील सेवा सुरू होणार आहेत.
इंग्रजी शिकण्याची सुविधा
इंग्रजी भाषा शिकण्यासंदर्भातली मॉड्युल्सही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. जी सहजासहजी डाऊनलोड करता येतील.
नवीन चार भाषांच्या सेवा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्युबवरही उपलब्ध आहेत.
नवीन सेवांच्या वेबसाईट खालील प्रमाणे आहेत;
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/telugu
https://www.bbc.com/punjabi
https://www.bbc.com/gujarati
विस्ताराचा उद्देश
जास्तीत जास्त व्हीडिओ आणि मोबाईलकेंद्रित सेवा देणं तसेच सोशल मिडीयावर जास्तीत जास्त वावर या विस्तारामागील मुख्य उद्देश आहे.
या विस्तारात एकूण 289 मिलियन पाऊंड्स इतकी गुंतवणूक केली आहे. 11 नवीन भाषांमध्ये सेवा, 12 नवीन आणि विस्तारित टीव्ही बुलेटिन, तसंच 2022 पर्यंत 500 मिलियन लोकांपर्यंत पोहोचणं ही या विस्ताराची वैशिष्ट्यं आहेत.
या विस्तारामुळे यूकेच्या बाहेर 1300 नवीन संधीची निर्मिती झाली आहे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन चॅनेल आणि bbc.com/news या आंतरराष्ट्रीय सेवांच्या माध्यमांतून बीबीसी आठवड्याला 346 मिलियन (34 कोटी 60 लाख) लोकांपर्यंत पोहोचते.
यातील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल माध्यमातून इंग्रजी आणि इतर 30पेक्षा जास्त भाषांतून आठवड्याला 26 कोटी 90 लाख लोकांपर्यंत पोहोचते.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक फ्रॅन अन्सवर्थ म्हणाल्या, "जागतिक स्तरावर होणारे बदल, क्रांती, विविध युद्धाच्या वेळेच्या स्वतंत्र, विश्वासार्ह, निष्पक्ष पत्रकारितेमुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास दृढ झाला आहे."
"जिथे अनेक ठिकाणी स्वतंत्र मतांना जास्त जागा मिळणं अपेक्षित आहे तिथे कमीत कमी जागा उरली आहे."
"अशा वेळी एक स्वतंत्र ब्रॉडकास्टर म्हणून आम्ही 21व्या शतकात देखील कालसुसंगत आहोत."
"आजची घोषणा ही वर्ल्ड सर्व्हिसमध्य़े एक मोठा बदल घडवण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे."
"आपण आपल्या प्रेक्षकांचा वेध घ्यायला हवा. बातमी जाणून घेण्याची त्यांची पद्धत बदलते आहे. टीव्हीवर वर्ल्ड सर्व्हिस बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. त्याचवेळी काही सेवा फक्त डिजिटल स्वरूपात आहे.
आम्ही डिजिटल रुपात विशेषत: युवा पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी झपाट्यानं पावलं टाकत आहोत. तसेच व्हिडीओच्या स्वरुपात बुलेटिनमध्ये अधिकाधिक तरतूद करणार आहोत"
"निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेप्रती असलेली आमची निष्ठा मात्र आम्ही कायम ठेवणार आहोत" असंही त्या म्हणाल्या.
नवीन सेवा आल्यामुळे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आता इंग्रजीबरोबर 40 भाषांमध्ये उपलब्ध होईल.
2022 साली बीबीसीची शतकपूर्ती होणार आहे. तेव्हापर्यंत 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)