उत्तराखंड: हिमस्खलन कशामुळे झालं असावं? काय सांगतात तज्ज्ञ?

    • Author, नवीन सिंह खडका
    • Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यानंतर जलप्रलय कशामुळे आला? या दुर्घटनेमागील कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

ज्या भागात हिमस्खलन झालं, तो दुर्गम असल्यामुळे नेमकी ही घटना कशी घडली, याबाबदत अद्याप काही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

अभ्यासक आणि संशोधक या घटनेबाबत काय सांगतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.

हिमालयाच्या या भागातच जवळपास 1 हजार हिमनद्या आहेत, असं ग्लेशियर तज्ज्ञ सांगतात.

त्यांच्यामते तापमानवाढीमुळे मोठे हिमखंड वितळून त्यांच्यात साठलेलं पाणी वेगानं बाहेर आल्यामुळे हिमस्खलन झालं असावं आणि वेगानं वाहणाऱ्या बर्फासोबत चिखल आणि दगडही खाली आले असावेत.

डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीमधून नुकतेच निवृत्त झालेले ग्लेशॉलॉजिस्ट डीपी डोभाल सांगतात, "आम्ही त्याला मृत बर्फ म्हणतो, म्हणजे आटत चाललेल्या हिमनदीच्या प्रवाहापासून वेगळे झालेले हिमखंड. अशा मोठ् हिमखंडांवर सहसा दगडांचा ढिगारा जमा झालेला असतो. इथेही असंच झाल्याची शक्यता सर्वात जास्त आहे, कारण हिमस्खलनासोबत मोठ्या प्रमाणात गाळ खाली वाहात आला आहे."

काही तज्ज्ञांच्या मते, हिमस्खलनाच्या वाटेत एखादा हिमतलावही आला असण्याची शक्यता आहे. एखाद्या हिमनदीतलं बर्फ जिथे संपतं तिथे पाणी वितळल्यानं तयार होणारा तलाव म्हणजे हिमतलाव. वरच्या हिमनदीतलं बर्फ तुटून खाली आलं, तर त्यासोबत पाण्याचा प्रवाहही मोठ्या वेगानं खालच्या दिशेनं वाहात जाऊ शकतो.

पण अशा प्रकारचा कुठलाही हिमतलाव या परिसरात तयार झाल्याची माहिती नव्हती, असं काही तज्ज्ञ सांगतात.

"पण सध्याच्या दिवसांत असे ग्लेशियल लेक किती लवकर तयार होऊ शकतात ते सांगता येणार नाही," असंही डीपी डोभाल यांनी म्हटलं.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिंदू कुश- हिमालय प्रदेशात हिमनद्या झपाट्यानं वितळत असून त्यामुळे हिमतलावांचा आकार वाढतो आहे आणि नवे हिमतलाव तयार होत आहेत.

आणखी एक शक्यता आहे. एखाद्या हिमस्खलनामुळे किंवा भूस्खलनामुळे नदीत कधीकधी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तात्पुरते जलाशय तयार होतात.

अशा तलावांतील पाण्याची पातळी धोक्याची मर्यादा ओलांडते, किंवा दबाव वाढतो तेव्हा ते फुटतात आणि त्यांच्या मार्गात येणार्या मानवी वस्त्या, पूल, जलविद्यूत प्रकल्प, अशा बांधकामांची प्रचंड हानी होते.

हिमालय प्रदेशात, भूस्खलनामुळे नद्यांना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तात्पुरते जलाशय निर्माण होतात. हे जलाशय फुटली की मानवी वस्त्या, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांची हानी होते.

याआधीही या परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. 2013 मध्ये केदारनाथ येथे महापूर आला त्यावेळी त्याविषयी अनेक सिद्धांत मांडण्यात आले.

"केदारनाथमधील आपत्तीचं नेमकं कारण कळण्यासाठी काही काळ जावा लागला. चोराबारी हिमनदीतला तलाव फुटल्याने पूर आल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते."

आता धौलीगंगा नदीला आलेल्या पुरामागचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तरखंडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डॉ. डोभाल सांगतात, "केदारनाथ घटनेच्या काही काळानंतरच आम्हाला त्यामागील कारण कळू शकले. चोराबारी हिमनदी फुटल्याने पूर आल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते."

आता धौलीगंगा नदीला आलेल्या पुरामागचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तरखंडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.