उत्तराखंड हिमस्खलन : 125 जण बेपत्ता असल्याची मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची माहिती

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमनदीचं स्खलन झाल्यानंतर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या दुर्घटनेत जवळपास 125 लोक बेपत्ता झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. सात मृतदेह सापडले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली.

आतापर्यंत तरी आवश्यकतेनुसार आमच्याकडे साधनसामुग्री उपलब्ध आहे. हेलिकॉप्टर आहेत. गरज पडली तर त्यांचा वापर आम्ही करू. एनडीआरएफची टीम दिल्लीहून इथे पोहोचली आहे आणि आमच्याकडे बचावपथकंही आहेत, असं रावत यांनी सांगितलं.

बचावकार्य सुरू

आयटीबीपीच्या टीमला तपोवनच्या जवळच्या एका भुयारातून 16 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

आयटीबीपीनं दिलेल्या माहितीनुसार 250 जवानांच्या तीन टीम बचावकार्यात गुंतलेल्या आहेत.

हिमनदीच्या हिमस्खलनामुळे आलेल्या पुरानं तपोवन पॉवर प्रोजेक्टचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अधिकारी सांगत आहेत.

चमोलीमध्ये हिमनदी स्खलनाच्या घटनेबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आयटीबीपीचे डीजी एस एस देसवाल यांनी म्हटलं की, बचावकार्यादरम्यान 9 ते 10 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहे.

त्यांनी म्हटलं, "तपोवन बांधापाशी एका टनलमध्ये बांधकाम सुरू होतं. तिथे 20 लोक अडकले आहेत. आयटीबीपीची टीम बचाव कार्य करत आहे."

पीटीआय वृत्तसंस्थेनं उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांच्या हवाल्याने 50 ते 100 लोक बेपत्ता झाल्याचं म्हटलं आहे.

आता परिस्थिती नियंत्रणात आहे, पण तपोवन-रिणीमधला पॉवर प्रोजेक्ट वाहून गेला आहे, असं डीजीपींनी म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, त्यांच्या जवानांना तपोवन भागातून एनटीपीसीच्या साइटच्या इथे तीन मृतदेह मिळाले आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हिमस्खलनामुळे धौलीगंगा नदीच्या पातळीत अचानक वाढ झालीये.

रेणी गावाजवळच्या वीज निर्मिती प्रॉजेक्टजवळ हिमस्खलनाची घटना घडल्याची माहिती आहे. तर, एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने, तपोवन वीज निर्मिती प्रॉजेक्ट वाहून गेल्याची सूचना मिळाल्याची माहिती दिली आहे.

'या कठीण काळात मोदी सरकार उत्तराखंडच्या जनतेसोबत आहे,' असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

त्यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. वायुसेनेलाही अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

अमित शाह यांनी म्हटलं, "जोशीमठच्या आसपास ही घटना घडली आहे. ग्लेशियर घसरल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काही लोक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. या संकटातून उत्तराखंडच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हा प्रशासनाला आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.

लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये. सरकार योग्य पावलं उचलत असल्याची माहिती रावत यांनी दिली आहे.

बीबीसीशी बोलताना उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यातील आपात्कालीन सेवेचे अधिकारी म्हणाले, ऋषिगंगा प्रोजेक्टजवळ हिमस्खलन झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. ज्यामुळे पाणी नदीपात्रात शिरलं आहे.

या घटनेत ऋषिगंगा प्रोजेक्टवर काम करणारे काही कर्मचारी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. किती कर्मचारी मिसिंग आहेत याबाबत अजूनही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.

प्रोजेक्टवर काम करणाऱ्यांना एकत्र करून माहिती घेण्याचं काम सुरू आहे.

तपोवनपासून हरिद्वारपर्यंत नदीकाठच्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरीकांना सुरक्षितस्थळी हटवण्यात आलं आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यासाठी पोहोचल्या आहेत.

'बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे'

हिमस्खलनामुळे वीज निर्मिती प्रोजेक्टचं खूप नुकसान झालं आहे. या घटनेत काही लोक मिसिंग आहेत. जीवितहानी आणि मालमत्तेची मोठी हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

किती लोक मिसिंग आहेत याबाबत सद्यस्थितीत माहिती देता येणार नाही. धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.

लष्कर, आयटीबीपीच्या जवानांची मदत बचावकार्यासाठी घेतली जात आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अशी माहिती चमौलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल सैनियाल यांनी दिली आहे.

हिमालयातल्या दुर्घटना

गेल्या 8 वर्षांत इथे हिमनद्यांशी निगडीत 3 मोठ्या दुर्घटना घडल्या. त्यातल्या 2 उत्तराखंडमध्ये झाल्या आहेत.

  • 2013 केदारनाथ
  • 2015 एव्हरेस्टवर हिमस्खलन
  • 2021 नंदादेवी हिमस्खलन

या तिन्ही दुर्घटना तीन वेगवेगळ्या मोसमांत वेगवेगळ्या कारणांनी झाल्या. पण त्यात काही साम्य आहे. त्यामुळेच हिमालयातल हजारो वर्षांपासूनचं बर्फाचं आच्छादन किती नाजूक बनलं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.