उत्तराखंडात हिमस्खलन झाल्याने वीज निर्मिती प्रकल्पाचे नुकसान

उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याने धौलीगंगा नदीला पूर आला आहे. नदीची तटबंदी तुटल्याने पुराचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. न्यूज एजंसी पीटीआयनुसार, या वीज प्रकल्पासाठी काम करणारे 150 कामगार सध्या बेपत्ता आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अफवा न पसरवण्याचे आणि जुने व्हीडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे. बचाव कार्यासाठी NDRF चे पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

उत्तरखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले, "हिमस्खलन झाल्याने ऋषिगंगा वीज प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याठिकाणी 150 हून अधिक कामगार काम करत होते. त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड पोलीस आणि NDRF टीम घनटस्थळी पोहचल्या आहेत.

वाहत्या पाण्याच्या वेगामुळे मातीत अडकलेल्या लोकांचे शोधकार्य सुरू आहे. काही लोकांना वाचवण्यात यश आले आहे. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आहे. पाण्याचा प्रवाह आता कर्ण प्रयागपर्यंत पोहचला आहे. पुरी बेसिनचा परिसर रिक्त केला आहे. मृत्यूचा आकडा वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राफ्टिंग बंद केले असून पुढील चार ते पाच तासांत पाणी ह्रषीकेश आणि हरिद्वारपर्यंत पोहचेल."

चमोलीचे अप्पल जिल्हाधिकारी अनिल कुमार चन्याल यांनी सांगितले, "हिमस्खलन झाल्याने ऋषिगंगा वीज प्रकल्पाला मोठे नुकसान झाले आहे. यामुळे काहींच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी काही लोक बेपत्ता आहेत. पण अचूक आकडा आत्ताच सांगता येणार नाही."

"धौलीगंगा आणि अलकनंदा नदींचा विस्तार पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. तपोवनपासून ते हरिद्वारपर्यंत आम्ही हाय अलर्ट जारी केले आहे. नदीजवळ राहणाऱ्या स्थानिकांना हलवण्यात आले आहे. सैन्य दल आणि ITBP चे मदत कार्य सुरू आहे. NDRF, SDRF पथके घटनास्थळी पोहचल्या आहेत." अशी माहितीही अनिल कुमार चन्याल यांनी दिली.

प्रभावित भागात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्था विभागाला संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 1070, 1905 आणि 9557444486 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऋषिगंगा प्रकल्पाचे नुकसान

ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे यामुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. नदीचे पाणी अचानक वाढल्याने अलकनंदाच्या खालच्या भागांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. नदीजवळील सर्व क्षेत्रांना हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

"भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. अलकनंदा नदीचा प्रवाह थांबवण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामे करण्यात आले आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने आयटीबीपीच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील रेनी गावात पूरस्थिती परिस्थिती आहे. नदीलगतची तटबंदी आणि अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे जवान लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. जोशीमठाजवळ रेनी गावात मदत कार्य सुरू आहे.

ऋषिकेश, हरिद्वारमध्ये पाण्याची पातळी धोक्याची मर्यादा ओलांडणार

चमोली पोलिसांनी सांगितले, "तपोवन क्षेत्रात हिमस्खलन झाल्याने ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे नुकसान झाले असून अलकनंदा नदीच्या किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे."

श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये पाण्याची पातळी धोक्याची मर्यादा ओलांडणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. श्रीनगरमध्ये संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाण्याची पातळी 553 मीटरपर्यंत वाढू शकते. तर रात्री आठ वाजेपर्यंत श्रीनगरमध्ये पाण्याची पातळी 340 मीटर आणि हरिद्वारमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत 294 मीटरपर्यंत वाढू शकते.

उत्तर प्रदेशात अलर्ट

उत्तराखंडात हिमस्खलन झाल्याने आणि पुराचा इशारा देण्यात आल्याने उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. तसंच एसडीआरएफलाही अलर्ट केले आहे. गंगा नदीजवळील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.