मानसिक आरोग्य : आई-वडिलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर काय परिणाम होतात?

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

स्वप्नील (बदललेलं नाव) तसा हुशार विद्यार्थी. सातवी-आठवीपर्यंत त्याने वर्गातला पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. विविध स्पर्धांमध्ये तो सहभाग घ्यायचा. पण अचानक त्याची अभ्यासातली कामगिरी खालावली. दिवसेंदिवस स्वप्नीलचा गुणपत्रिकेतला क्रमांक खाली-खाली सरकू लागला.

स्वप्नीलच्या वर्गशिक्षकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी त्याला बोलावून घेतलं. चर्चेदरम्यान सुरुवातीला स्वप्नील शांतच होता. काही वेळानंतर तो मोकळेपणाने बोलू लागला.

अखेर, शिक्षकांना संपूर्ण परिस्थिती समजली. त्यांनी तातडीने स्वप्नीलच्या आई-वडिलांना बोलावून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल आपण कधीच विचार केला नव्हता, याचं स्वप्नीलच्या आई-वडिलांना वाईट वाटलं.

शिक्षकांनी नेमकं असं काय सांगितलं? स्वप्नीलची कामगिरी खालावण्याचं काय बरं कारण होतं? त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं?

या सगळ्याचं उत्तर म्हणजे स्वप्निलच्या आई-वडिलांचं घरगुती भांडण. त्यांच्यातील भांडणं काय नवी नव्हती. ती नेहमीच व्हायची. पण स्वप्नील मोठा होऊ लागला होता. त्याला बरं-वाईट कळू लागलं होतं. घरातलं वातावरण शांत नसल्यामुळे त्याला सतत बाहेरच राहावं असं वाटायचं. दिवसभर तो मित्रांमध्ये खेळत राहायचा.

घरात आल्यानंतरही स्वप्नील जास्त कुणाशी बोलायचा नाही. तो विचलित झाला होता. या परिस्थितीत कसं वागावं, काय करावं, काहीच त्याला कळत नव्हतं. मनात सारख्या त्याच गोष्टींचा विचार यायचा. परिणामी स्वप्नीलची अभ्यासातली कामगिरी खालावली होती.

लॉकडाऊन आणि घरगुती हिंसाचार

वर दिलेली परिस्थिती तुम्ही अनेक कुटुंबांमध्ये पाहिली असेल. गेल्या वर्षी आलेल्या कोरोना संकटानंतर या स्थितीत आणखी जास्त वाढ होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी 23 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यावेळी 23 मार्च ते 16 एप्रिलदरम्यान म्हणजेच लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जवळपास पहिल्या तीन आठवड्यात राष्ट्रीय महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या 239 तक्रारी आल्या होत्या. तर, लॉकडाऊन आधीच्या तीन आठवड्यात केवळ 123. म्हणजेच कोरोना काळात घरगुती-कौटुंबिक हिंसाचार कसा वाढला, याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.

या भांडणांना तोंड दिलेल्या व्यक्तींना कोरोना काळातील कटू आठवणींसोबतच या हिंसाचाराच्या जखमाही आठवणीत राहणार आहेत. या घरगुती भांडणांचा परिणाम लहान मुलांवर होणार नाही, तरच नवल.

पण ही बाब फक्त लॉकडाऊनपुरतीच मर्यादित नाही. 2018 मधील आकडेवारीनुसार, महिलांविरोधातल्या जेवढ्या तक्रारी नोंदवल्या जातात त्यापैकी 32% म्हणजे जवळपास एक तृतीयांश केसेस या नवरा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाच्या असतात.

2018 साली घरगुती हिंसाचाराच्या 1 लाख 3 हजार 272 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

2015-16 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार जवळपास 33% महिलांना जोडीदारांकडून शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. यापैकी केवळ 14 टक्के स्त्रियांनीच याविरोधात तक्रार दाखल केली. असं असलं तरी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.

अर्थात, म्हणजेच कौटुंबिक तसंच पती-पत्नींच्या भांडणाचं प्रमाण वाढलं आहे. पण, अशा प्रकारच्या भांडणांमध्ये सर्वाधिक भरडली जातात ती म्हणजे त्यांची मुलं.

भांडणाचा मनावर होणारा परिणाम

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच असं म्हटलं जातं. पण त्या भांड्यांचा आवाज किती कर्णकर्कश आहे, हे तपासण्याची आता वेळ आली आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.

प्रौढ व्यक्ती भांडणं करून कदाचित विसरून जात असतील. पण या गोष्टी लहान मुलांच्या लक्षात राहतात. त्यातही जर आपल्या आई-वडिलांचं भांडण असेल, तर त्यावेळी वापरण्यात आलेले शब्द मुलांच्या मनावर खोलवर रुतली जातात.

युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सचे प्रा. गॉर्डन हॅरोल्ड यांनी या विषयावर बीबीसीसाठी एक लेख लिहिला होता.

या लेखानुसार, "पालक आणि मुलं यांच्यातील नातेसंबंध तर महत्त्वाचे आहेतच, पण पालकांचे एकमेकांशी नातेसंबंध कसे आहेत, यावरसुद्धा पाल्याचं भविष्य अवलंबून असतं. भविष्यात मुलांचं मानसिक आरोग्य किती सुदृढ असेल, त्याला शिक्षणात मिळणारं यश, त्याचे इतरांशी तसंच त्याच्या जोडीदाराशी नातेसंबंध कसे असतील, या सगळ्या गोष्टींबाबत पालकांच्या वागणुकीची मोठी भूमिका असते."

एका संशोधनानुसार, वयाच्या सहाव्या महिन्यांपासूनच मुले अशा भांडणांना प्रतिक्रिया देऊ लागतात.

सातत्याने घरगुती भांडण कानावर पडणारी मुलांमध्ये

  • हृदयाचे ठोके अनियमित होणे
  • हार्मोन्समध्ये बदल
  • मेंदूच्या विकासात अडथळे
  • झोपेच्या समस्या
  • अस्वस्थता
  • नैराश्य

यांसारख्या गोष्टी दिसून येऊ शकतात.

या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.

चेतन एरंडे पुण्यात सृजनशील पालक संघटनेत सामूहिक पालकत्वसंदर्भात काम करतात. त्यांच्या ग्रुपमध्ये पाल्याचं संगोपन कशा प्रकारे करावं, याबाबत सातत्याने चर्चा केली जाते.

चेतन एरंडे याबाबत सांगतात, आई-वडिलांची भांडणं पाहून मुले

  • स्वतःला असुरक्षित समजू लागतात.
  • एकतर अति आक्रमक बनतात किंवा आत्मविश्वास गमावून बसतात.
  • या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत, अशी भावना मनात निर्माण होते.
  • अशी मुले जास्त भांडखोर होतात, इतर लहान मुलं खेळताना अतिशय आक्रमक दिसतात. घाणेरडी शिवीगाळ करतात.
  • आपलं म्हणणं मांडण्यासाठी आक्रमक भांडण हाच एक मार्ग आहे, असा गैरसमज त्यांच्यात निर्माण होतो.
  • काही उदाहरणांमध्ये, मुलांना गोष्टीला कसं रिअक्ट करावं, ते कळत नाही. त्यामुळे ते शांत-शांत राहू लागतात.
  • अशी मुलं स्वतःला आक्रसून घेतात.
  • लोकांमध्ये मिसळणं ते टाळू लागतात.
  • आपल्यावर ओढवलेले प्रसंग ते घरच्यांसोबत शेअर करत नाहीत.

मुलांना आई-वडील दोघे हवे

सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले अड. शांतवीर महिंद्रकर यांना कौंटुबिक विषयांच्या समुपदेशनाचा 20 वर्षांचा अनुभव आहे.

त्यांच्या मते, मुलांना आई-वडील दोघेही हवे असतात. त्यामुळे कोणताही घटस्फोटाचा अर्ज आल्यानंतर पती-पत्नी यांच्यात कोणत्या विषयावर मतभेद आहेत, हे सर्वप्रथम पाहिलं जातं.

अॅड. महिंद्रकर यांनी हाताळलेल्या एका घटस्फोटाच्या प्रकरणात वडिलांना दर शनिवारी-रविवारी मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. ती मुलगी आठवडाभर सतत रडत बसायची. मला वडिलांकडे जायचं, असं म्हणत शनिवार-रविवारची वाट पाहत बसायची.

ही परिस्थिती गंभीर असते. छोट्या-मोठ्या भांडणातून असे प्रसंग निर्माण होतात. मुलांच्या भविष्यावर या गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळायला हव्यात. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये सर्वप्रथम लहान मुलांचा विचार करा, असा सल्ला आम्ही देतो, असं अड. महिंद्रकर यांनी सांगितलं.

मुलांसमोर वाद टाळा

आपण लेखात आधी लिहिल्याप्रमाणे घर म्हटलं तर भांड्याला भांडं लागणार, हे मान्य करू. पण यात काही बदल करता आला तर?

आपल्यात काही मतभेद असतील, तर त्याबद्दल मुलांसमोर वाद करत बसण्यापेक्षा त्यांच्या अनुपस्थितीत याबाबत चर्चा करता येऊ शकेल का?

प्रा. गॉर्डन हॅरोल्ड, याबाबत सांगतात, "विशेषतः वय वर्षे दोन ते नवव्या वर्षापर्यंत मुले ही आई-वडिलांचं बारकाईने निरीक्षण करत असतात. ते भांडणांचंही निरीक्षण करतात. त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरतो. पती-पत्नींमध्ये एखाद्या विषयावर वाद होणं, भांडण होणं हे सामान्य आहे. पण त्याचा मुलांवर होणारा परिणाम आपल्यालाच कमी करता येऊ शकतो.

काही वादविवादातून मुलांच्या ज्ञानात भर पडते. त्यांना बरं-वाईट हे चांगल्या पद्धतीने कळू शकतं. त्यामुळे छोट्या मोठ्या विषयांची खेळीमेळीने चर्चा होणं आवश्यक आहे. अतिशय गंभीर प्रकरणांची चर्चा आपण बंद खोलीत करू शकतो."

चेतन एरंडे यांनीही याबाबत असंच मत नोंदवलं.

ते सांगतात, "तुमच्यात काही मतभेद असतील तर मुलासमोर न करता एकांतात या गोष्टी चर्चा करू शकता. आपल्या दोघांसाठी 'कॉमन इंपॉर्टंट पॉईंट' काय आहे, याचा विचार आई-वडिलांनी केला पाहिजे. आनंदी वातावरण असतं, तेव्हा मुलाचं वागणं कसं असतं. घरात भांडण झाल्यावर तो कसा वागतो, या गोष्टींचं पालकांनी सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी चटकन समजू शकतील."

"आपल्या मुलाचं भवितव्य योग्य प्रकारे घडवायचं असेल, तर आपल्या अहंकाराला, हेव्यादाव्यांना मागे सोडणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे," असं एरंडे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)