You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फीट आल्यावर कांदा-चप्पल हुंगवणं हा तुम्हाला उपाय वाटत असेल तर...
एपिलेप्सीला फीट येणं, आकडी येणं किंवा मिर्गी असं म्हणतात.
फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चपलेचा वास दिला की तो बरा होतो असा सर्वसामान्यांचा समज आहे.
पण, आकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
एपिलेप्सी म्हणजे काय?
एपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे.
लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.
मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लहान मुलांच्या मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा गाडगीळ सांगतात, "आपला मेंदू इलेक्ट्रिक सर्किटचा बनलेला असतो. सगळी कामं या इलेक्ट्रिकल सर्किटच्या माध्यमातून होतात. या सर्किट बोर्डमध्ये एखाद्या वेळेस शॉट सर्किट झालं. तर, फीट येते."
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला एकदा फीट आली म्हणून तो एपिलेप्सीने ग्रस्त आहे असं म्हणता येणार नाही.
फोर्टीस रुग्णालयाचे कन्सल्टंट मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राजेश बेन्नी म्हणतात, "फीट दोन किंवा जास्त वेळा आली. कोणत्याही मेंदूविकार नसताना आली तर एपिलेप्सी आहे असं म्हटलं जातं."
फीटचे प्रकार कोणते?
हात-पाय घट्ट होणं, डोळे पांढरे करणं, तोंडातून फेस येणं हे आकडी येण्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत.
डॉ. गाडगीळ म्हणतात, "मेंदूच्या कुठल्या भागात शॉर्ट सर्किट होतं. यावर कोणत्या भागावर याचा परिणाम होईल हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ, मेंदूच्या दृष्टी नियंत्रित करण्याच्या भागात इलेक्ट्रीक सर्किट बिघडलं तर डोळ्यांवर परिणाम होतो."
तज्ज्ञांच्या मते, फीट आल्यानंतर रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. लहान मुलं काही सेकंद आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. आपल्यामधेच गुंग राहतात.
आकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे?
कुटुंबात कोणाला फीट आली. तर, वडीलधारी मंडळी धावपळ करतात. रुग्णाला कांदा-चप्पल हुंगवलं जातं. कांद्याच्या उग्र वासाने चप्पलच्या वासाने रुग्ण बरा होतो हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला समज आहे.
याबाबत बोलताना डॉ. प्रज्ञा म्हणतात, "फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चप्पल लावल्याने फायदा होता हा मोठा गैरसमज आहे. रुग्णाच्या नाकाला कांदा-चप्पल लावल्याने फीट थांबत नाही. कांदा-चप्पल आणि फीट येण्याचा काही संबंध नाही."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेंदूत झालेलं शॉर्ट सर्किट आपोआप बंद होतं. बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा यावर परिणाम होत नाही.
फीट किती वेळ रहाते?
मेंदूविकार तज्ज्ञांच्या मते, फीट साधारणत: तीन ते पाच मिनिटं राहते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात 10 दशलक्ष लोकांना एपिलेप्सी हा आजार आहे.
फीट आल्यावर काय करू नये?
फीट आल्यानंतर नातेवाईकांनी काय करू नये याबाबत डॉ. प्रज्ञा गाडगीळ मार्गदर्शन करताना सांगतात.
- रुग्णाच्या नाकाला चप्पल लावू नये. त्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
- तोंडात पाणी टाकू नये. पाणी श्वासनलिकेत गेलं तर न्यूमोनिया होण्याची शक्यता.
- चमचा किंवा हाताची बोटं तोंडात घालू नये. याने रुग्णाला फायदा न होता इजा होण्याची शक्यता आहे
फीट आल्यास नातेवाईकांनी काय करावं?
फीट आलेला रुग्ण बेशुद्ध होऊन पडला तर,
- डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपवावं
- घट्ट कपडे सैल करावेत
- शरीरावरील एखाद्या गोष्टीने रुग्णाला इजा होण्याची शक्यता असेल तर ती काढून ठेवावी
- आजूबाजूला गर्दी करू नये
- झटके येत असताना दाबून ठेऊ नये. दाबून ठेवल्याने झटके थांबणार नाहीत. पण इजा होऊ शकते
- फीट किती वेळ चालली आहे हे पहावं
- पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत काही खाणं-पिणं देऊ नये
फीट येणाऱ्या रुग्णांनी काय करावं?
आजार कमी झाला की डॉक्टरांना न विचारता आपण औषधं बंद करतो. पण, तज्ज्ञांच्या मते असं करणं आजिबात योग्य नाही.
फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राजेश बेन्नी सांगतात, "डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये. औषधं अचानक बंद केली तर, पुन्हा फीट येऊ शकतात किंवा आजार गंभीर होऊ शकतो."
डॉ. बेन्नी सांगतात, फीट येणाऱ्या रुग्णांनी या गोष्टी करू नयेत
- गाडी चालवू नये
- मद्यपान करून नये
- शिफ्ट ड्यूटी किंवा रात्री जास्त काम करू नये
- रात्री 8 तास झोप घ्यावी
- औषधं कायम जवळ ठेवावी
फीट येण्याची कारणं?
- मेंदूला इजा झाली असल्यास
- मेंदूत संसर्ग झाल्यास
- ब्रेन स्ट्रोक किंवा ट्यूमर
- अपघात किंवा दुखापत
- लहानपणी दीर्घकाळासाठी ताप येणं
(स्त्रोत-नॅशनल हेल्थ पोर्टल)
तपासणी कशी करतात?
हृदयाचं कार्य योग्य पद्धतीने सुरू आहे का नाही. हे तपासण्यासाठी इसीजी काढतात. त्याचप्रमाणे मेंदूच कार्य तपासण्यासाठी ईईजी, एमआरआय आणि सीटी स्कॅन केलं जातं.
फीटबाबतचे सामाजाचे गैरसमज
डॉ. प्रज्ञा गाडगीळ यांच्या मते, "भारतात फीट येणं हा फक्त वैद्यकीय आजार नाही. तर, सामाजिक समस्या बनतो. एपिलेप्सीबद्दलच्या गैरसमजांमुळे लोकांना मला एपिलेप्सी आहे हे सांगायला लाज वाटते. कारण, समाजाची त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलते."
तज्ज्ञ सांगतात, एपिलेप्सीग्रस्तांमधील 70 ते 80 टक्के रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात. लग्न करण्यासाठी एपिलेप्सी आड येऊ शकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.