बर्ड फ्लू : कोरोना काळात 'बर्ड फ्लू'चा संसर्ग का ठरू शकतो आव्हान?

बर्ड फ्लू, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता एका नव्या साथीचं संकट घोंघावताना दिसत आहे. हे संकट आहे 'बर्ड फ्लू' चं.

'बर्ड फ्लू' हा पक्ष्यांना होणारा आजार. हा आजार H5N1 व्हायरसमुळे होतो.

हा आजार हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात प्रामुख्याने आढळून आला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने या राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 'बर्ड फ्लू'मुळे पक्षी मृत झालेले आढळून आलेले नाहीत. राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आलेला नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यभर अलर्ट जारी केला आहे.

बर्ड फ्लू, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने केंद्र सरकारला हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट दिला आहे.

हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लू'चं संकट

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'च्या केसेस आढळून आल्या आहेत. कांगडा जिल्ह्यातील पोंग लेक परिसरात हजारोंच्या संख्येने पक्षी मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे पोंग लेक परिसरात पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बीबीसीशी बोलताना हमीरपूर वाईल्डलाईफ डिव्हिजनचे डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसर (DFO) राहुल रोहाने म्हणाले, "पोंग लेकच्या 1 किलोमीटर परिघात कोणालाच जाण्याची परवानगी नाही, तर 9 किलोमीटरचा परिसर सर्व्हेक्षण झोन घोषित करण्यात आला आहे. जंगलात मृतावस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांना एकत्र करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे."

बर्ड फ्लू, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लू' चा संसर्ग सद्य स्थितीत कांगडा जिल्ह्यापूरताच मर्यादित आहे. संसर्ग पसरू नये यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत.

"आतापर्यंत 2300 पक्षी मृतावस्थेत आढळून आले. यात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त आहे," असं राहुल रोहाने पुढे म्हणाले.

हिमाचल सरकारने केलेल्या उपाययोजना

  • कांगडा जिल्ह्यातील फतेपूर, देहरा, जवाली आणि इंदोरा परिसरात चिकन, अंडी, मासे यांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णत: बंदी
  • पोंग लेकच्या 1 किलोमीटर परिसरात पर्यटक आणि इतरांना जाण्यास निर्बंध

याबाबत बीबीसीशी बोलताना हिमाचल प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव निशा सिंह म्हणाल्या, "पोंग लेकच्या आसपासच्या 10 किलोमीटर परिसरात पोल्ट्री उद्योगावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात आलेली आहे."

'बर्ड फ्लू'ला एव्हियन इन्फ्लूएन्झा असं म्हणतात. कोरोनाच्या काळात यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे का?

यावर बोलताना निशा सिंह म्हणतात, "आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना अलर्ट केलं आहे. याची लक्षणं कोरोनासारखीच आहेत. त्यामुळे हे आव्हानात्मक असणार आहे."

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आलेला नाही. पण महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यात अलर्ट जारी केला आहे.

याबाबत बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, "सद्यस्थितीत राज्यात बर्ड फ्लू संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. राज्य भरात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अलर्ट आहे. एकही पक्षी मृतावस्थेत आढळला तर तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

बर्ड फ्लू, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

राज्य सरकारने जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारकडून मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत.

राज्याच्या पशु, दुग्धविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी म्हटलं, "स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात अशा जागांवर सरकारचं लक्ष आहे. सोलापूरला उजनी जलाशयाच्या भागावर आम्ही सतत मॉनिटरिंग करतोय. त्यातसोबत नाशिक, नागपूरच्या भागातही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

मार्गदर्शक सूचना

  • सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लू बद्दल माहिती द्यावी
  • पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी
  • संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
  • उघड्या कत्तलखान्यात जैनसुरक्षा सक्षण करावी
  • बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी
  • जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी
  • पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा

केरळमध्ये 'बर्ड फ्लू'च्या केसेस

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार केरळच्या कोट्टायम आणि अलापूर्झा जिल्ह्यातील काही भागात 'बर्ड फ्लू'चा प्रादूर्भाव आढळून आला आहे.

त्यामुळे सरकारने बदक, कोंबडी आणि घरातील इतर पक्षांना मारण्याचे आदेश दिले आहेत. निंदूरच्या बदक फार्ममध्ये 1700 बदकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बर्ड फ्लू, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

केरळचे पशु, दुग्धविकास आणि मत्स्यपालन मंत्री के राजू म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांकडील पक्षी मारले जातील, त्यांना सरकारकडून मदत केली जाईल."

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बर्ड फ्लूचा प्रसार रोकण्यासाठी केरळमध्ये 40 हजार पक्ष्यांना मारावं लागणार आहे. त्यापैकी 34,000 पक्षी फक्त कुट्टनाड परिसरात मारले जाणार आहेत. पण, माणसांना या व्हायरसपासून धोका पोहचू नये यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे."

'बर्ड फ्लू'चा प्रादूर्भाव आढळून आलेल्या भागाच्या 10 किलोमीटर आसपासच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यात येण्यात आहे.

राजस्थानात 'बर्ड फ्लू'ची परिस्थिती

राजस्थानच्या पशु, दुग्धविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत 425 कावळे आणि इतर पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत. सोमवारी 170 नवीन पक्षी मृत झाल्याचं आढळून आलं.

राजस्थानच्या 15 जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू' च्या केसेस समोर आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

'बर्ड फ्लू' आजार काय आहे?

'बर्ड फ्लू' आजार H5N1 व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इन्फ्लूएन्झा असं म्हणतात. हा आजार संसर्गजन्य असून पक्षी आणि प्राण्यांमध्ये एकापासून दुसऱ्याला अत्यंत वेगाने पसरतो.

हा आजार माणसांना देखील संसर्ग करू शकतो. प्रामुख्याने हा व्हायरस पक्ष्यांमध्येच आढळून येतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)