कोरोना : लसीकरणाला देशभरात 16 जानेवारीपासून होणार सुरुवात

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस
    • Author, प्रवीण शर्मा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

देशभरात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण कार्यक्रमात प्राधान्य दिलं जाईल.

त्याचबरोबर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि 50 पेक्षा कमी वय असलेल्या पण को-मॉर्बिडिटी असलेल्या व्यक्ती यांनाही लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जाईल.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देण्याची योजना आखण्यात आली आहे.

दोन जानेवारीला देशभरात कोरोना लशीची ड्राय रन झाली. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली.

रविवारी (3 जानेवारी) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतात दोन कोरोनाविरोधी लशींना मंजुरी दिली. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोव्हिड-19 विरोधी लशीला आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली.

भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ही भारतात तयार झालेली पहिली कोरोनाविरोधी स्वदेशी लस आहे.

'कोव्हॅक्सीन' ला भारतात आपात्कालीन परवानगी मिळाल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कॉँग्रेससोबतच देशातील एका मोठ्या गटाने ही लस प्रभावी आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

'कोव्हॅक्सीन'ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्याचे निष्कर्ष येणं बाकी आहे. तरीही देशात या लशीच्या वापरची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सरकारने कोव्हिड-19 विरोधी लशीची ड्राय रन केली. लस कशी देण्यात येईल याबाबत निरीक्षण करण्यात आलं. पण, अजूनही कोरोनाविरोधी लशीबद्दल अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

अशाच काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

सर्वांना लशीचा डोस घ्यावा लागेल?

पब्लिक हेल्थ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'लहान मुलांना सोडून सर्वांनी ही लस घेतली पाहिजे. या लशीची चाचणी 18 वर्षाखालील मुलांवर करण्यात आलेली नाही.'

सर्वात आधी कोणाला लस मिळणार?

कोरोनाविरोधी लसीकरणाचा कार्यक्रम हा टप्प्याटप्प्याने होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी ही लस देण्यात येणार आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

डॉ. प्रीती कुमार म्हणतात, "डॉक्टर, सरकारी, महापालिका कर्मचारी, फ्रंटलाइनवर कोव्हिडविरोधी लढ्यात उतरलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाईल. 50 वर्षांवरील आणि इतर आजारांनी ग्रस्त लोकांना ही पहिल्या टप्प्यात लस देण्याचा प्रयत्न असणार आहे."

50 वर्षाखालील पण इतर आजारांनी ग्रस्त लोक प्राथमिकता देण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये येणार का?

डॉ. कुमार यांच्या माहितीनुसार 50 वर्षाखालील पण इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येणार नाही. कोव्हिड-19 विरोधी लशीचा पहिला डोस कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार आणि देखभाल करणाऱ्यांना दिला जाणार आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

जितक्या जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचेल. तितक्या जास्त लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल. डॉ. प्रिती पुढे सांगतात, '70 टक्के लोकांना लस दिल्यानंतर हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याचं पहायला मिळालं आहे.'

पहिला टप्पा केव्हापर्यंत पूर्ण होईल?

लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. लशीच्या उपलब्धतेप्रमाणे डोस दिले जाणार आहेत. लस निर्मिती, साठवणूक आणि लस देण्यासाठी उपलब्ध असणारं मनुष्यबळ यावर सर्वकाही अवलंबून आहे.

लस कशी दिली जाणार?

ही लस दोन डोसमध्ये दिली जाईल. लसीकरणासाठी केंद्र बनवण्यात येतील. या केंद्रात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येईल. लस दिली जाणाऱ्या लोकांची माहिती एकत्र केली जाईल. त्याच पद्धतीने त्यांना लस दिली जाईल.

लस सुरक्षित आहे का?

कोरोनाविरोधी लशीचं संशोधन आणि चाचणीचा कालावधी 9-10 महिन्यांचा आहे. त्यामुळे याच्या सुरक्षिततेवर कोणतचं प्रश्नचिन्ह नाही. इतर लशींप्रमाणेच याची चाचणी करण्यात आली आहे.

पण, डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'या लशीचा बराच कालावधी उलटून गेल्यानंतर काय परिणाम होतो. हे तपासणं अजूनही बाकी आहे. लशीचा परिणाम काही वर्षांनंतर कळू लागतो. जगभरात आत्तापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात आलेल्या लशीचा परत घ्यावं लागलेलं नाही.'

कोरोना, लस

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, कोरोना लस सुरक्षित आहे का?

डॉ. बुद्धीराजा सांगतात, 'सर्व लशींची सुरक्षितता चांगली आहे. लस घेतल्यानंतर थोडा ताप, लस घेतलेल्या जागी सूज येणं किंवा डोकेदुखी अशी लक्षणं दिसून येतात. कोणतीही लस 50 टक्के प्रभावी असेल तर ती लस फायदेशीर असं समजलं जातं.'

लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो?

डॉ. बुद्धीराजा सांगतात, 'लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता फार कमी आहे. कोरोनाचा संसर्ग झालाच तर त्याची तीव्रता कमी असेल. यामुळे न्यूमोनिया आणि जीव जाण्याची शक्यता कमी होणार आहे.'

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर लस प्रभावी असेल?

डॉ. बुद्धीराजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बदललेल्या कोरोना व्हायरसवर ही लस प्रभावी असणार आहे. खासकरून, कोव्हॅक्सीन. ही लस इनअॅक्टिव्हेटेड होल व्हायरस व्हॅक्सीन आहे. या प्रकारची लस खूप फायदेशीर असते. याचं कारण, ही लस पूर्ण व्हायरसविरोधात शरीरात अॅन्टीबॉडी तयार करते. व्हायरसने रूप बदललं तरी, लशीमध्ये बदललेल्या व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता असते.'

लस किती वेळा घ्यावी लागेल ?

या लशीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 ते 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'पहिला डोस दिल्यानंतर 10 ते 14 दिवसात याचा परिणाम दिसू लागतो.'

कोरोनाग्रस्त रुग्णांना लस दिली जाईल? कोरोना होऊन गेलेल्यांना लस देण्यात येईल?

कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णत बरा झाल्यानंतर 14 दिवसांनी त्याला लस देण्यात येईल. पण, सद्य स्थितीत लशीची उपलब्धता कमी असल्याने, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना काही कालावधीनंतर लस देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, SOPA

फोटो कॅप्शन, कोरोना लस

मॅक्स हेल्थकेअरचे डॉ. बुद्धीराजा म्हणतात, 'नैसर्गिक आजारात काही दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, कोरोना संसर्गात रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल याबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाही. काही लोकांना दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे. यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्यांनाही लस घेण्याची सूचना करण्यात येत आहे.'

ते पुढे सांगतात, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तीन ते सहा आठवडे असते. त्यामुळे अशा व्यक्तींना लस घेण्याची घाई नाही.

दुसरा डोस घेतला नाही तर?

भारतात अजूनही दुसऱ्या डोसबद्दल प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला नाही. पण, हा डोस जितक्या लवकर घेतला जाईल तेवढा निश्चित चांगला.

दोन डोस एकसारखेच असले पाहिजेत?

एकाच लशीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही डोस एकाच लशीचे असले पाहिजेत. पहिला डोस कोव्हॅक्सीनचा असेल तर दुसरा डोस हा कोव्हॅक्सीनचाच घेतला पाहिजे.

प्लाझ्मा थेरपी घेतलेल्यांना लस घ्यावी लागेल?

या रुग्णांना इतर कोरोनामुक्त रुग्णांसारखचं मानलं जाईल.

गर्भवती महिलांना लस दिली जाईल?

'भारतात लशीची चाचणी 18 वर्षावरील व्यक्ती आणि गर्भवती नसलेल्या महिलांवर करण्यात आली. आपात्कालीन वापराची परवानगी 18 वर्षावरील व्यक्ती आणि गर्भवती नसलेल्या महिलांसाठी मिळाली आहे. येणाऱ्या काळातील चाचणीत यावर लक्ष दिलं जाईल,' असं डॉ. बुद्धीराजा सांगतात.

मधुमेह असलेल्यांना लस देण्यात येणार?

मधुमेहाने ग्रस्त रुग्ण हायरिस्क रुग्णांमध्ये मोडतात. त्यामुळे या रुग्णांना लस देण्यात येईल.

कोणत्या वयोगटातील मुलांना लस दिली जाऊ शकते?

ही लस 12 वर्षाखालील मुलांसाठी नाही. प्रौढ व्यक्तींनाच ही लस देण्यात येणार आहे.

साईडइफेक्ट काय आहेत?

लस घेतल्यानंतर डोकेदुखी, थोडा ताप येण्याची लक्षणं दिसून येतात. पण, डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, ही लक्षणं फार गंभीर नाहीत.

डॉ. बुद्धीराजा सांगतात, 'गंभीर साईडइफेक्ट फार दुर्मिळ आहेत. अशा प्रकारचे साईडइफेक्ट दुसऱ्या लशीबाबतही पाहण्यात आले आहेत. फायझरच्या लशीमुळे अॅलर्जी झाल्याचं दिसून आलंय. पण, भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनमध्ये असं होणार नाही अशी चर्चा सुरू आहे.'

लस घ्यायची नसेल तर मग काय?

डॉ. प्रीती कुमार म्हणतात, 'लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती महत्त्वाची आहे. सरकार लोकांपर्यंत पोहोचून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांमध्ये जनजागृती झाली तर लोक पुढे येऊन लस घेतील.'

भारतात किती प्रकारच्या लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे?

फायझर आणि बायोकेटची लस 'एमआरएनए' वर आधारीत लस आहे. त्या साठवण्यासाठी थंड तापमानाची गरज आहे. भारतात लस साठवण्यामध्ये खूप अडचणी आहेत. डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'भारतात उपलब्ध असणारी कोल्डचेन इतक्या कमी तापमानासाठी नाही. कंपन्यांनी लस मंजुरी मिळण्यासाठी दिली होती. मात्र या लशी उपयोगात आणणं फार कठीण आहे.'

कोरोना, लस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कोरोना लस

याच्या तुलनेत सीरम आणि भारत बायोटेकची लस भारतात जास्तीत जास्त वापरली जाण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, या लशी फ्रीजमध्ये ठेवता येणं शक्य आहे.

ड्रग्ज कंट्रोलची मंजूरी मिळणं म्हणजे काय?

डीजीसीआयच्या मंजूरीप्रमाणे भारत बायोटेकची लस बाजारात येण्यास अजूनही काही कालावधी लागेल. सद्यस्थितीत ऑक्सफर्डच्या लशीचा वापर केला जाईल.

लस घेतल्यानंतर मास्क घातला नाही तरी चालेल का?

लस घेतल्यानंतरही मास्क वापरणं गरजेचं आहे. डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'लस हा एक उपाय आहे. लस घेतल्यानंतरही मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं असणार आहे.'

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मास्क

डॉ. बुद्धीराजा म्हणतात, 'मास्क न वापरण्याचा विचार अयोग्य आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यापुढे जवळपास दीड वर्ष सुरूच राहील. मास्क सर्वात जास्त सुरक्षित आहेत.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)