कॉलेजच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्षात प्रवेश, थर्ड इअरची फायनल परीक्षा मात्र होणार

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता फक्त थर्ड इअरची अंतिम परिक्षा होणार आहे. इतरांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याता आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधला.

परीक्षा रद्द करण्यात आलेल्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील मार्क्सचा विचार करून मार्क देण्यात येतील. मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा आहे. असे विद्यार्थी असतील तर संबंधित युनिव्हर्सिटीने त्या परीक्षांचं वेळापत्रक पुढच्या वर्षी ठरवावं, असं सामंत म्हणाले.

नापास विद्यार्थ्यांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षात एखादा विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील वर्षी होतील. एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्षी प्रवेश देण्यात येईल. त्यांच्या परीक्षा पुढील वर्षी कॉलेज सुरू झाल्यानंतर 120 दिवसांत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोरोना
लाईन

अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती न बदलल्यास 20 ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येईल.

अंतिम वर्षात सध्या महाराष्ट्रातील 8 ते 9 लाख विद्यार्थी आहेत. या परीक्षा घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा वैयक्तिकपणे न घेता जर्नल आणि ऑनलाईन तोंडी परीक्षा घेऊन मार्क देण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितलं.

अंतिम परीक्षा रद्द करणं सध्याच्या युजीसीच्या गाईडलाईनमध्ये नाही. तीन तासांच्या परीक्षा दोन तासांवर घेण्यात येऊ शकतात. 100 गुणांच्या परीक्षा 50 गुणांच्या स्वरूपात घेण्यात येऊ शकतात.

पुढील वर्षाचं शैक्षणिक वेळापत्रक कुठल्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून सुरू करायचं आहे. उन्हाळी सुटीच्या बाबतीत निर्णय युनिव्हर्सिटीनं स्वतः घ्यावेत. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा नाही याचा निर्णय त्या-त्या वेळी परिस्थिती बघून घेण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.

स्वायत्त युनिव्हर्सिटींनी शासनाशी चर्चा करून परीक्षांचा निर्णय घ्यावा. त्यांनी याच फॉरमॅटमध्येच वेळापत्रक तयार करावं, असा सल्ला सामंत यांनी दिला.

विद्यार्थ्यांना शंका असल्यास कुलगुरूंकडून माहिती घ्यावी. येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचं शंकानिरसन करण्यासाठी केंद्र तयार करावं. युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी केंद्र निर्माण करण्याची सूचना मंत्री सामंत यांनी कुलगुरूंना केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)