कोरोना व्हायरस : मुंबईत असं उभं राहतंय 1000 खाटांचं कोव्हीड-19 स्पेशल हॉस्पिटल

फोटो स्रोत, MayankBhagwat
- Author, मयांक भागवत
- Role, मुक्त पत्रकार
मुंबई शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजाराचा टप्पा ओलांडलाय. कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईत कोरोनाचं संकट भीषण आणि गंभीर असल्याचं केंद्र सरकारनेही मान्य केलंय.
मुंबईत मे अखेरपर्यंत कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या 75 हजारांवर पोहोचण्याची भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) 1000 खाटांचं खास कोव्हिड-19 रुग्णालय आणि आयसोलेशन सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. या सेंटरमध्ये सेमी-क्रिटिकल रुग्ण आणि कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डिव्हल्पमेंट अॅथॉरिटीचे (MMRDA) आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले, "बीकेसीत 1008 बेड्सचं खास कोव्हिड-19 सेंटर उभारण्यात येणार आहे. हे सेंटर भारतातील पहिलं ओपन ग्राउंडवर बनवण्यात आलेलं सेंटर असेल. या सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या 11-12 दिवसांत हे सेंटर पूर्णतः बनून तयार होईल. त्यानंतर हे सेंटर मुंबई महापालिकेला सूपूर्द करण्यात येईल."
असं असेल कोव्हीड-19 सेंटर
MMRDAचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या माहितीनुसार,
1) कोव्हिड-19 सेंटर 1008 खाटांचं असेल
2) यातील 50 टक्के म्हणजेच 504 खाटांना ऑक्सिजन सप्लाय असेल
3) रुग्णांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल
4) 58 नॉन-आक्सिजन खाटांचं एक क्युबिकल असेल
5) ऑक्सिजन सप्लाय असलेल्या 28 खाटांचं एक क्युबिकल असेल
6) या सर्वांसोबत वॉशरूम आणि टॉयलेट अटॅच असणार
7) 1.25 लाख फूट जागेवर हे सेंटर उभारण्यात आलंय
8) 40 मीटर रुंद आणि 240 मीटर लांब एवढा याचा आकार आहे
9) रुग्णांसाठी इन हाऊस किचन असणार आहे
10) तसंच पार्टिशनची व्यवस्थाही करण्यात येणार आहे
कोणत्या रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार?
"या सेंटरमध्ये आयसीयूची व्यवस्था नसेल. कोव्हिड-19 चे सेमी-क्रिटिकल रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. अशांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्याचसोबत, लक्षणं नसलेले म्हणजे ए-सिंप्टोमॅटीक रुग्ण, तसंच ज्यांना घरात जागा नसल्यामुळे होम-क्वारंटाईन करणं शक्य नसेल त्यांना इथं आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे," अशी माहिती आर. ए. राजीव यांनी दिली.

फोटो स्रोत, MayankBhagwat
MMRDAच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या सेंटरमध्ये डॉक्टरांसाठी एक विशेष जागा निश्चित करण्यात आली आहे. तपासणीसाठी लॅब, एक्स-रे, स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
चीनच्या वुहान प्रांतात कोव्हिड-19चा प्रसार झाल्यानंतर चीन सरकारने अशाच प्रकारे काही दिवसांत एक रुग्णालय बांधून तयार केलं होतं. त्याच धर्तीवर मुंबईत हे रुग्णालय उभं रहातंय.
या रुग्णालयाच्या उभारणीचं काम १० दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं आहे.
MMRDAचे आयुक्त पुढे म्हणतात, "कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी उभारण्यात आलेलं तात्पुरत्या स्वरूपाचं हे भारतातील बहुदा एकमेव कोव्हिड-19 सेंटर आहे. जे इतक्या वेगाने बांधण्यात येईल. इथं गरजेनुसार आणखी 500 बेड्स वाढवता येऊ शकतात."
हे सेंटर उभारण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करतायत. या सेंटरसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रीकल आणि इतर टेक्निकल गोष्टींची जबाबदारी MMRDAवर सोपवण्यात आली आहे. तर ज्युपिटर रुग्णालय इतर मदत देणार आहे.
याबाबत माहिती देताना आर. ए. राजीव म्हणाले, "रुग्णालयाचं डिझाईन कसं असेल. पाईप ऑक्सिजनची लाईन कशी असावी, लॅब आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा याबाबत ज्युपिटर हॉस्पिटल सल्ला देणार आहे."
ज्युपिटर रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युपिटर रुग्णालयात एमएमआरडीएला 1000 बेड्सचं रुग्णालय तयार करण्यासाठी आवश्यक ते टेक्निकल सहकार्य करत आहे.

फोटो स्रोत, MayankBhagwat
शिवाय खाटा,ऑक्सिजनची व्यवस्था, आणि डॉक्टरांना लागणारी वैद्यकीय उपकरणं यांची खरेदी MMRDA तर्फे करण्यात येत आहे. ज्याचा खर्च राज्य सरकार उलचणार आहे.
हे सेंटर लवकरात लवकर तयार करण्यात यावं यासाठी 600 पेक्षा जास्त कामगार दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
या सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच काम सुरू असताना कामगार मास्क लावत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








