संघाचं आमंत्रण स्वीकारणारे प्रणब मुखर्जी काही पहिले नेते नाहीत

    • Author, के. एन. गोविंदाचार्य
    • Role, माजी प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बीबीसी हिंदीसाठी

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एक महिन्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या उपस्थितीने काँग्रेसचे नेते नाराज आहेत, प्रसारमाध्यमांत खळबळ माजली आहे आणि आता तर त्यांच्या मुलीनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पण या घडामोडींमुळे आणि पक्षीय राजकारणाच्या गदारोळात संघाच्या कार्यशैलीच्या अनेक पैलूंकडे दुर्लक्ष होत आहे.

तसं पाहिलं तर अनेक ज्येष्ठ राजकीय नेते विविध प्रसंगी संघाच्या शिबिरात, संघाच्या मंचावर, किंवा अनौपचारिक विचार विनिमय करण्यासाठी संघाच्या लोकांची भेट घेत होते. पण प्रणबदांच्या उपस्थितीचीच जास्त चर्चा होत आहे.

संघाची कार्यपद्धती

प्रसारमाध्यमांशी निगडीत एका व्यक्तीनं सांगितलं की संघातर्फे प्रणब मुखर्जींचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं जाऊ शकतं. पण ही गोष्ट संपूर्णपणे निराधार आहे.

संघाच्या कार्यपद्धतीचा विचार केला असता नवीन लोकांशी संपर्क साधणं हे संघाच्या विस्ताराचं पहिलं पाऊल आहे. त्यानंतर त्यांचा स्वभाव, प्रकृती आणि संघाबदद्ल असलेली माहिती, या सगळ्या गोष्टी समजून संघाच्या कार्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला जातो.

संघाचे स्वयंसेवक नवीन व्यक्तींना संघाची ओळख करून देतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. उत्तर देणं शक्य नसेल तर उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर देण्याचं आश्वासन देतात. त्यामुळे संवाद पुढे सुरू राहतो.

संपूर्ण समाज स्वयंसेवक

समाजातील सगळी माणसं स्वयंसेवक आहेत, असं संघाला वाटतं. त्यातले काही आज आहेत, तर काही उद्याचे.

स्वयंसेवक तयार करण्यासाठी नवीन लोकांशी संपर्क, हे पहिलं पाऊल आहे. मग कार्यक्रमाला येणं जाणं, रोज शाखेत काही योगदान, त्यानंतर पुन्हा नवीन लोकांशी संपर्क करणं, त्यांना संघात आणणं अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरू असते. प्रत्येक स्वयंसेवकाच्या विकासाचा हाच क्रम असतो आणि घडामोडींचं केंद्रस्थान असते ती संघाची शाखा.

शाखा भरते त्या एक तासात मैदानात शारीरिक, मानसिक, बौद्धिक संस्कार दिले जातात. स्वयंसेवक इतर 23 तासात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, तिन्ही पातळींवर संतुलन राखत जगण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

याचबरोबर शिक्षण, सेवा, प्रबोधन, राजकारण या गोष्टींचा विचार संघ करतंच. पण एखाद्या व्यक्तीत रचनात्मक किंवा आंदोलनात्मक प्रयत्न होत असतील तर त्या व्यक्तीत होणाऱ्या बदलांचा विचार देखील संघ करतं.

संघाचं कार्य सर्व भाषा, जाती, संप्रदाय तसंच सुशिक्षित, निरक्षर, डॉक्टर, वकील, शेतकरी, मजूर अशा सगळ्या पातळीतील लोकांपर्यंत पोहोचावं, अशी अपेक्षा असते. संघाच्या या अभियानात सगळ्याचं समर्थन आणि सहकार्य मिळावं अशी त्यांना आशा असते.

विरोधकांकडून आत्मीयतेची आवश्यकता

संघाच्या विचारधारेचा कोणी विरोधक असेल तर संघाच्या आत्मीयतेमुळे त्यांचा विरोध कमी होईल, तो संघाचं कार्य जवळून बघेल आणि त्याचा भ्रम मिटेल.

जे तटस्थ आहेत ते देखील आपल्या संपर्कांमुळे संघाच्या विचारसरणीशी अनुकूल होतील. जे अनुकूल होतील ते शाखेत दिसावेत, जे शाखेत आहेत त्यांनी सक्रिय होऊन शाखेचा विस्तार करावा, आणि समाजासाठी एका जागरूक नागरिकाची भूमिका निभवावी ही अपेक्षा असते.

प्रणब मुखर्जी यांच्यासंदर्भात सार्वजनिक पातळीवर जी चर्चा सुरू आहे त्या मागे प्रत्येक घटनेमागे किंवा राजकारणाच्या दृष्टीने पाहणं हेसुद्धा एक कारण आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील अशा अनेक व्यक्ती शाखेत आल्या आहेत. जयप्रकाश नारायण हे त्याचं एक उदाहरण आहे. संघाशी त्यांचा संपर्क 1967 साली आलेल्या दुष्काळात जे स्वयंसेवक काम करत होते त्यांच्या माध्यमातून आला.

त्यावेळी बिहार, नवादा जिल्ह्यातील पकडी बारावा प्रखंड या भागात दुष्काळ पीडितांच्या मदतकार्यासाठी असलेल्या एका प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जयप्रकाश नारायण तिथे आले होते.

संघात सगळी कार्य स्वेच्छेने होतात. कोणालाही त्याचा पगार मिळत नाही. सगळे सुशिक्षित आहे. अगदी 15-15 दिवसांचा वेळ या कार्यासाठी ते देतात. हे पाहून जयप्रकाश नारायण प्रभावित झाले होते.

जनसंघ फॅसिस्ट तर मी पण फॅसिस्ट

संघाची देशभक्ती ही पंतप्रधानांपेक्षा कमी नाही, अशी टिप्पणी जयप्रकाश नारायण यांनी केली होती. कालांतराने ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला संघाचा पाठिंबा होता.

इतकंच काय तर या आंदोलनाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं. जेपी आंदोलनाच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात जयप्रकाश नारायण म्हणाले की "संघ फॅसिस्ट आहे तर मीसुद्धा फॅसिस्ट आहे."

1978 साली जनता पार्टीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी संघाने आयोजित केलेल्या प्राथमिक शिक्षा वर्गाला संबोधित केलं होतं.

अशा प्रकारे कन्याकुमारीमध्ये विवेकानंद सेवा स्मारक निर्माण होण्यात ज्यांची विशेष भूमिका आहे ते एकनाथ रानडे संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना काँग्रेस, कम्युनिस्ट अशा सगळ्या पक्षांकडून तसंच सरकारतर्फे सहकार्य मिळालं. सगळ्यांनी एकनाथजींना आपलंसं मानलं.

सर्वपक्षीय स्नेहभाव

संघाचे स्वयंसेवक रज्जूभैय्या (जे नंतर सरसंघचालक झाले) यांच्याप्रति उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभान गुप्ता यांची आत्मीयता सर्वज्ञात आहे.

त्याच प्रकारे नानाजी देशमुख यांचं काँग्रेससकट सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांत नेहमीच येणंजाणं राहायचं. ते लोकही नानाजींना आपल्या घरातलंच मानायचे.

रोज फिरायला जाणारे केरळचे कम्युनिस्ट नेते अच्युत मेनन असो वा दिल्लीत सकाळी फिरत असलेले नॉर्थ एव्हेन्यूमधले प्रणब दा किंवा अशोक रोडमधील काँग्रेसचे महासचिव के. एन. सिंह असतील, हे लोक जेव्हाही घरून निघायचे, तेव्हा या लोकांना स्वयंसेवक दिसले तर वाकून नमस्कार करायचेच.

प्रणब मुखर्जींमुळे अडवाणी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खंडुरी, हरीश रावत, अजित जोगी, डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांचं कुटुंब, जयराम रमेश, उमा भारती यांच्या सहयोगाने गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा मिळाला.

पक्षीय सीमांना दूर सारून देश, समाजासाठी परस्पर सहकार्य करण्यासाठी भारतीय परंपरा फार जुनी आहे. निवडणुकांच्या राजकारणात असलेले डावपेच, मर्यादा उल्लंघन, यामुळे भारताच्या शालीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.

प्रत्येक धातूला उष्णतेची गरज

संघाच्या कार्यपद्धतीविषयी ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा. यशवंत राव केळकर बरंच काही सांगायचे, बोलायचे. ते म्हणायचे, पर्यावरणात असलेला प्रत्येक धातू वितळतो. असा कोणताही धातू नाही जो वितळत नाही. त्यासाठी फक्त आवश्यक तितकं तापमान हवं.

जर एखादा धातू वितळत नसेल तर त्याचा दोष नाही, जो तो धातू वितळवायला गेला त्याला दिली जाणारी उष्णता कमी आहे. म्हणून तो धातू वितळत नाही. त्यामुळे आपण जी उर्जा देतो ती वाढवण्यासाठी स्वयंसेवकाला आपली साधना वाढवण्याची गरज आहे, असं ते म्हणायचे.

हा धातू म्हणजे नवीन व्यक्ती. ते सांगायचे की संपूर्ण समाज एक आहे. सगळे स्वयंसेवक आहेत. काही आज शाखेत येतील काही उद्या येतील. त्यासाठी सगळ्यांसाठी नि:स्वार्थ आणि सकारात्मक इच्छा हवी.

जो एकदा शाखेत येतो किंवा स्वयंसेवक होतो तो आयुष्यभर स्वयंसेवक राहतो. त्याच्याकडून तशा संस्काराची आणि व्यवहाराची अपेक्षा आहे.

या अर्थाने संघात प्रवेश करण्याची कायम संधी आणि संघातून बाहेर पडणं निषिद्ध मानलं जातं.

प्रणब मुखर्जी असो किंवा जयप्रकाश नारायण, वेळोवेळी अनेक नेते संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सामील झाले आहेत. संघाचे स्वयंसेवक आपल्या क्षमतेनुसार आणि संपर्कक्षमतेनुसार नवीन लोकांची भेट घेतात, त्यांच्या घरी जातात आणि त्यांचा विश्वास संपादन करतात.

आज संघाच्या जवळजवळ 50 हजारहून अधिक शाखा आहेत. रोज शाखेत जाणारे लाखो लोक आहेत. कोट्यवधी लोक संघाची कामं करतात. हा संघाच्या 90 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या स्नेहावर आधारित कार्यपद्धतीचा परिणाम आहे.

जनतेत एका विशिष्ट आणि प्रसिद्ध पदावर असल्यामुळे प्रणबदांचं नागपूरला जाणं चर्चेचा विषय झाला आहे. या सगळ्या गोंधळात निस्वार्थ स्नेहावर आधारित नित्य सिद्ध शक्ती उभी होण्यासाठी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी रुजवलेल्या सर्वजन सुलभ, अचूक कार्यपद्धती कडे लक्ष देणं जास्त उपयोगी होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)