दृष्टिकोन : मोहन भागवत संघाला लष्कर करू पाहताहेत का?

    • Author, राजेश जोशी
    • Role, रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा कोणत्या संघर्षाची वाट बघत आहे ज्यासाठी भारताचं धर्मनिरपेक्ष लष्कर संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात जाऊन त्यांना स्वयंसेवकांची भर्ती करण्यासाठी आवतण देईल?

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कदाचित कल्पना करत असतील की एक दिवस भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख नागपूरला पोहोचतील. नंतर संघाला विनवणी करतील - देशावर एक भीषण संकट आलं आहे आणि आम्हाला युद्धाची तयारी करण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील. तेव्हा तुम्ही तीन दिवसांच्या आत स्वयंसेवकांची फौज निर्माण करून आमची मदत करा.

यानंतर भारतातल्या प्रत्येक गावात गल्ली आणि माथ्यावर भगवा पट्टा बांधून बजरंग दलाचे स्वयंसेवक तकलादू बंदूक आणि गंजलेली त्रिशुळं हातात उचलून भारत मातेचं रक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावायला जातील. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारताचे लष्कर त्यांच्या मागे मागे पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर जाऊन शत्रूची पळताभुई थोडी करतील.

मेसमधला विनोद आणि अतिशयोक्ती

मोहन भागवत आणि त्यांच्या स्वयंसेवकांना हे मानण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे की राष्ट्रनिर्मितीच्या निविदा त्यांच्या नावे उघडल्या आहेत आणि त्यांना सोडून बाकी सगळ्या शक्ती देश उद्धवस्त करायला निघाल्या आहेत. पण ज्यांना लष्कराची संस्कृती माहिती आहे ते, भागवतांच्या तीन दिवसांत सैन्य उभारण्याच्या विनोदावर बारामुला ते बोमडिला पर्यंत संध्याकाळी मेसमध्ये एकत्र बसून हसत असतील.

मुजफ्फरपूरच्या जिल्हा विद्यालयात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना ज्या भाषेचा वापर केला, त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात. एखाद्या प्रियकरानं प्रेयसीला चंद्र-तारे तोडून आणण्यासारखी भाषा भागवत यांनी वापरली.

भागवत म्हणाले, "तसं तर सैन्याला प्रशिक्षण देऊन तयार करण्यासाठी सहा-सात महिने लागतात. पण जर देशाला गरज भासली आणि घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघाच्या स्वयंसेवकांना घेऊन तीन दिवसांत सैन्य तयार होईल."

त्यात त्यांनी स्वत:च्या बाजूने एक डिस्क्लेमर सुद्धा दिला - "घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर..."

घटनेत असं करण्याची परवानगी मिळणार नाही, याची भागवतांना पूर्णपणे जाणीव आहे. घटना कोणालाच खासगी सैन्य बनवण्याची परवानगी देत नाही. घटनेत भारत सरकारला आपले धोरणं धर्माच्या आधारावर तयार करण्याची परवानगी नाही. म्हणूनच भारत धर्मनिरपेक्ष आहे.

याच घटनेने लष्कराला राजकारणापासून दूर ठेवलं आहे, आणि हीच घटना राजकरत्यांना न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू देत नाही. त्यामुळे आकाशातून चंद्र, तारे तोडून आणण्याच्या कामात सगळ्यांत मोठा अडथळा हा संविधानाचाच आहे.

म्हणूनच संघ परिवाराकडून संपूर्ण घटनाच बदलण्याची भाषासुद्धा अधूनमधून बारीक आवाजात कानावर पडते. घटना बदलण्याची गोष्ट कधी त्यांचे जुने स्वयंसेवक के. एन. गोविंदाचार्य करतात, तर कधी नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधले मंत्री अनंतकुमार हेगडे सांगतात की 'आम्ही संविधान बदलण्यासाठी इथे आलो आहोत!'

वाद वाढताच असली वक्तव्यं करणारे आपली वक्तव्यं मागे घेतात किंवा 'प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला', असं सांगून पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी एका वाक्यात दिलगिरी व्यक्त करून वाद संपवतात.

अशातच मोहन भागवतांचं लष्करासंदर्भातलं वक्तव्य लष्करविरोधी आहे, अशी टीका झाली. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून, संदर्भ वगळून हे वाक्य सादर करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण नंतर संघातर्फे देण्यात आलं.

संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात निवेदन जाहीर केलं, "सामान्य नागरिकांमधून सैन्य उभारण्यासाठी भारतीय लष्कराला सहा महिने लागतील, असं भागवतजी म्हणाले होते. संघाला स्वयंसेवक तयार करण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत. दोन्ही प्रसंगांमध्ये लष्करकडूनच प्रशिक्षणाची गरज असेल. नागरिकांमधून लष्करासाठी माणसं लष्करच तयार करेल आणि स्वयंसेवकांमधून लष्करासाठी माणसं तयार करण्याचं कामही लष्करच करू शकेल."

मोहन भागवत आणि डॉ. मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला की एक गोष्ट लक्षात येते - सामान्य माणसाच्या नजरेत लष्कर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात मोठा फरक नसल्याचं दाखवून देण्याचा संघाच्या दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

संघाची व्यूहरचना अशी आहे की सामान्य माणसाला लष्कर आणि संघ, तसंच सैनिक आणि स्वयंसेवक, यांच्यात साधर्म्य वाटावं. त्यांची इच्छा आहे की लोकांनी हे मानावं की लष्कर आणि संघ दोन्ही शिस्तबद्ध मनुष्यबळांचे गट आहेत आणि दोन्हींचे सैनिक देशासाठी आपली प्राणाहुती देण्यास तत्पर आहेत.

जसं सैनिक लष्करी गणवेशात दररोज सराव करतात तसंच संघाचे स्वयंसेवक शेजारच्या मैदानावर भरणाऱ्या शाखेत सराव करतात. स्वयंसेवक खो-खो आणि कबड्डीही खेळतात. सैनिक भव्य असं संचलन करतात तर स्वयंसेवक झेंडा आणि दंडा घेऊन शहरातल्या मुख्य रस्त्यांवर संचलन करतात.

दोन्ही संघटनांची कार्यपद्धती, विचारप्रणाली आणि ध्येय यांच्यात फरक थोडाच आहे?

लष्कराला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्ती एका काश्मिरी युवकाला जीपच्या बोनेटला बांधून फिरवण्याचं समर्थन करतात. म्हणूनच देशाचं राजकारण आणि परराष्ट्र धोरण यावर लष्करी अधिकाऱ्यांच्या जाहीर वक्तव्याला त्यांचा आक्षेप नसतो.

संघ आणि सेनेत साधर्म्य असल्याचं सिद्ध करणं संघासमोरचं सर्वांत मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान पेलल्यास ते विनायक दामोदर सावरकरांचं स्वप्न साकार करू शकतील. कारण हिंदुत्ववादी विचारसरणीला जहालमताचा सूर देत सावरकर म्हणाले होते - राजकारणाचं हिंदूकरण करा आणि हिंदूंचं लष्करीकरण करा.

गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात जेवढ्या वेगात राजकारणाचं हिंदूकरण होत आहे त्या वेगाची कल्पना संघाने देखील नव्हती.

कथित सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणुक प्रचाराची सुरुवात मंदिरात जाऊनच करतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला संघाच्या ध्रुवीकरणाला कोणताही सबळ उतारा न सुचल्याने त्यांनी ब्राह्मण संमेलन आयोजित करणं, आणि भगवद्गीतेचं वाटप करणं, असे पर्याय अंगीकारायला सुरुवात केली आहे.

भारतीय जनता पक्षाला काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचं हे हिंदुत्व पचनी पडलेलं नाही. मात्र संघासाठी यापेक्षा आनंदाची बातमी असू शकत नाही.

आता प्रश्न उरला हिंदूंच्या लष्करीकरणाचा. त्यांना शिस्तबद्ध, आक्रमक आणि तयार करण्याचा विषय आहे.

हेच कारण समोर ठेऊन बजरंग दल गेली अनेक वर्षं काम करत आहे. बजरंग दलाच्या आत्मरक्षा शिबिरांमध्ये तरुण मुलांना हातात काठी, त्रिशूळ आणि छर्रे बंदूक देऊन दहशतवाद्यांचा खात्मा कसा करायचा, हे शिकवलं जातं.

या शिबिरांमध्ये बजरंग दलाचेच दाढीवाले स्वयंसेवक मुसलमानांप्रमाणे टोपी परिधान करून दहशतवाद्यांची भूमिका करतात. देशाचे शत्रू कोण आणि त्यांचा बीमोड कसा करायचा, हे त्यांच्या वेशभूषेवरून ठरतं.

लष्करीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाजात त्याचा सर्वव्यापी प्रसार होईल, असा संघाला विश्वास आहे. त्यानंतर संसद, न्यायव्यवस्था, शिक्षणसंस्था, पॅरामिलिटरी आणि अखेरीस लष्कराचे तिन्ही दल संघासमोर झुकून उभे असतील.

पण तूर्तास भारतीय लष्कर धर्मनिरपेक्ष आणि प्रोफेशनल पद्धतीनं काम करणारी यंत्रणा आहे. देशातले हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख यांच्यासहित बहुतांश धर्मीयांचा लष्करावर विश्वास आहे. म्हणूनच दंगल उसळल्यानंतर किंवा नागरी भागातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर लष्कराला पाचारण केलं जातं.

भारताचं धर्मनिरपेक्ष लष्कर दंगलग्रस्त भागात संचलन करतं, तेव्हा दंगलखोरांना चाप बसतो आणि दंगली थांबतात.

मग मोहन भागवत आणि डॉ. मनमोहन वैद्य यांनी काय विचार करून ही अपेक्षा ठेवली आहे की लष्कर संघाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)