You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#HerChoice : आईबाबा जिवंत असतानाही मी पोरकी झाले तेव्हा...
बेचव अन्नाला कोणी वाली नसतं. न होणारे कपडे टाकाऊ होतात. तशी मी 'नकोशी' आहे. अगदी लहान असतानाच माझ्या पालकांनी मला सोडून दिलं.
ते देवाघरी गेले? नाही! मी अनाथ नाही. पण म्हणूनच त्यांचं मला सोडून जाणं वेदनादायी आहे.
माझे आईवडील जिवंत आहेत. ते आणि मी एकाच गावात राहतो. मात्र ते माझ्याशी एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे वागतात.
माझे खळखळून हसण्याचे दिवस होते. मागितलेली गोष्ट मिळाली नाही की धाय मोकलून रडण्याचे दिवस होते. अंगाईगीत ऐकल्याशिवाय झोपणं शक्य नसे. अशा लहानग्या दिवसात आईबाबांनी मला सोडून दिलं.
मी काय गमावलं हे कळण्याचंही वय नव्हतं.
माझा जन्म झाल्याझाल्या वडील आईला सोडून गेले. त्यांना दुसरं लग्न करायचं होतं.
मग आईही सोडून गेली. तिलाही कोणीतरी दुसरं आवडू लागलं होतं.
माझं काय? प्रेमाला पारखं होणं म्हणजे काय असतं हेही तेव्हा उमगत नव्हतं.
प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.
सहानुभूती म्हणून आईच्या नातेवाईकांनी माझा सांभाळ केला. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा त्यांनीच मला माझे आईवडील कोण हे सांगितलं. मी खिन्न मनानं त्यांच्याकडे पाहिलं.
मला पाहिल्यावर ते आपल्याकडे ओढून मला घट्ट मिठी मारतील असं वाटलं होतं. परंतु त्यांनी एखाद्या अनोळख्या माणसाकडे पाहावं त्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं.
मी त्यांची नव्हते; खरंतर कुणाचीच नव्हते हे तेव्हा स्पष्ट झालं.
एका स्वयंसेवी संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात काकांनी मला प्रवेश घेऊन दिला.
त्या वाटेवरही काचा असतील याची मी कल्पना केली नव्हती.
माझ्या वडिलांनी माझ्या सावत्र बहिणीला त्याच वसतिगृहात दाखल केलं होतं.
तिला पाहताना माझ्या मनात सगळ्या नकोशा आठवणी दाटून येत. मी कोणालाही नकोय याची सल जाणवत असे.
तिच्याविरुद्ध माझ्या मनात कोणतीही कटुता नव्हती. आम्ही एकमेकांशी बोलायचो. ती कोण आहे हे मला ठाऊक होतं. आणि मी कोण आहे हे तिला ठाऊक होतं.
तरीही यातना होत असत. माझे बाबा तिला भेटायला वसतिगृहात अनेकदा यायचे. सुट्टी लागली की ते तिला घरीही घेऊन जात.
मी शांतपणे सगळं पाहत असे. कधीतरी ते मलाही घरी घेऊन जातील अशी भाबडी आशा मला वाटत असे.
पण प्रत्येकवेळी माझी खंत आणखी गहिरी होत जात असे. घरी घेऊन जाणं दूरच; ते माझ्याकडे ढुंकूनही पाहत नसत.
माझ्याबद्दल त्यांच्या मनात काही ओलावा होता का, याबाबत मला खात्री वाटत नसे. माझी सावत्र आई त्यांच्या घरी मला येण्यापासून रोखत असेल का?
म्हणूनच बाबा वसतिगृहात आले की त्यांच्यापासून दूर पळत असे. कोपऱ्यात जाऊन मी ओक्साबोक्शी रडत असे.
सुट्ट्या लागूच नयेत असं मला वाटायचं.
सुट्यांचा अर्थ म्हणजे जीव जगवण्यासाठी पैसे कमवावे लागत. त्यासाठी मान मोडून काम करावं लागे. काम नाही केलं तर मला जेवायलाच मिळणार नाही अशी अवस्था होती.
काही वेळेला मी गुरंही राखत असे.
मी सगळी कमाई घरी देऊन टाकत असे. मोबदल्यात ते मला दोन वेळचं जेवायला देत आणि मुख्य म्हणजे डोक्यावर छप्पर त्यांनीच पुरवलं. शाळेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी थोडे पैसे साठवण्याची मुभा त्यांनी मला दिली होती.
पण तरीही आईवडील मला आवडत असत. माझा त्यांच्यावर राग नव्हता.
त्यांच्या प्रेमासाठी मी आसुसलेले होते. सगळे सण त्यांच्याबरोबर साजरे करण्याचं स्वप्न मी पाहत असे. पण त्या दोघांचंही आयुष्य वेगळं होतं. त्यांची आपली माणसं वेगळी होती. त्यांच्या आयुष्यात मला काहीही स्थान नव्हतं.
त्यांच्या घरी माझं स्वागत होण्याची शक्यताच नव्हती. तसं करण्याच्या विचारानंही मला भीती वाटत असे.
असंख्य सणसमारंभ येऊन जात असत. आपल्या सख्ख्या कुटुंबासह सण साजरे करण्याचं भाग्य माझ्या नशिबी नव्हतं.
माझे मित्रमंडळी त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून सांगत. त्यांच्या सुट्ट्या माझ्यासाठी स्वप्नवत असत.
माझे मित्रमैत्रिणीच माझी भावंडं झाली होती. त्यांच्याबरोबर मी सुखदु:खाची वाटणी करत असे.
मी माझं मन त्यांच्यासमोर हक्कानं मोकळं करत असे. एकट्यानं लढण्याची माझी शक्ती कमी होत असे तेव्हा तेच मला बळ देत.
वॉर्डन या माझ्या आई झाल्या होत्या. त्यांच्यामुळेच मला आईचं प्रेम काय असतं हे समजलं.
माझ्या मैत्रिणींपैकी कोणी आजारी पडलं की वॉर्डन त्यांच्या घरच्यांना बोलावत असत. पण माझ्यासाठी त्याच सगळं काही होत्या.
त्यांनी त्यांच्या परीनं माझ्यासाठी सगळं काही केलं. त्यांनी मला कपडेलक्ते पुरवले. तेव्हा मला अनोखं वाटलं होतं. या जगात आपलं कुणीतरी आहे याची जाणीव त्यांनीच मला करून दिली.
मात्र जगण्यातल्या छोट्या आनंदाच्या गोष्टींना मुकावं लागलं. हे सत्य मी स्वीकारलं होतं. उदाहरणार्थ मला आवडणारा पदार्थ कोणीतरी माझ्यासाठी करेल असं घडणं शक्य नव्हतं.
मी आता नववीत शिकते आहे. या वसतिगृहात दहावीपर्यंतचेच विद्यार्थी राहू शकतात.
दहावी झाल्यावर पुढे कुठे जायचं हे मला ठाऊक नाही. आईचे नातेवाईक यापुढे माझा सांभाळ करतील असं वाटत नाही.
दहावीनंतर शिकण्यासाठी मला स्वत: कमवून शिकावं लागेल असं दिसतंय.
शिक्षण सोडायचं नाही असा निर्धार मी केला आहे. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मला शिकायलाच हवं. मला डॉक्टर व्हायचं आहे.
मी गावी परत गेले तर माझ्यावर लग्नाची सक्ती करण्यात येईल.
लग्नाला माझा विरोध आहे किंवा कुटुंब मला आवडत नाही असं नाही, पण आता मला स्वतंत्र व्हायचं आहे.
मी जेव्हा मोठी होईन तेव्हा माझ्या मनाप्रमाणे जोडीदाराची निवड करेन आणि माझं छानसं प्रेमळ कुटुंब असेल याची मला खात्री आहे.
(दक्षिण भारतातल्या एका युवतीची ही कहाणी. बीबीसी प्रतिनिधी पद्मा मीनाक्षी यांनी वृत्तांकन केलं आहे तर दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. मुलीच्या विनंतीवरून तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. )
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)