प्रियंका चोप्राच्या यशाचं रहस्य काय? वाचा 'देसी गर्ल'चे बारा मंत्र

    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रियंका चोप्रासारखं यश संपादन करायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर प्रियंकापेक्षा चांगलं दुसरं कोण देणार? दिल्लीच्या सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये एका कार्यक्रमात प्रियंकाने स्वत:च मग याचं उत्तर दिलं.

पेंग्विन प्रकाशनाने आपल्या वार्षिक कार्यक्रमाला भाषण देण्यासाठी प्रियंकाला बोलावलं होतं. विषय होता- 'Breaking the Glass Ceiling- Chasing the dream'.

गुलाबी रंगाच्या पोशाखात जेव्हा प्रियंका चोप्रा मंचावर आली तेव्हा हळूहळू या रंगाशी संबंधित असलेल्या समजुतींना तिनं फाटा दिला.

प्रियंका सांगते, "मला कोणतंही ग्लास सिलिंग ब्रेक करायचं नाही. मी अशा कोणत्याही मिशनवर नाही. मला कोणतीही रूढी परंपरा मोडायची नाही. मी फक्त आपल्या स्वप्नांमुळे आणि महत्त्वाकांक्षांमुळे यशस्वी झाले आहे."

'जर मी करू शकते तर कोणीही करू शकतं'

मंचावर बसलेल्या प्रियंकाला प्रेक्षकांमधून कोणी लग्नाचं प्रपोजल देत होतं तर कोणी आपल्या प्रेमाची कबुली. कुणी फुलांचा गुच्छ देण्यासाठी बेचैन होत होतं तर कुणी फ्लाईंग किससाठी.

प्रियंका कोणासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीची अभिनेत्री होती तर काहींसाठी देसी गर्ल. पण जेव्हा तिला विचारलं की ती स्वत:ला कसं बघते, तेव्हा तिनं उत्तर होतं, 'पाण्यासारखं'.

"मी काय आहे हे मी सांगू शकत नाही, पण जिथे जसं ठेवाल तसा आकार घेणाऱ्या पाण्यासारखं व्हायला मला खूप आवडेल."

तिच्या यशाची व्याख्या

"माझ्यासाठी यश म्हणजे चेकचे आकडे किंवा दारात उभ्या असलेले गाडया घोडे वगैरे नाही. माझ्या चाहत्यांना माझ्यावर प्रेम करावंसं वाटत राहणं तसंच त्यांना आवडणारं काम सतत करत राहणं हीच माझी यशाची व्याख्या आहे."

2017 साली सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची फोर्ब्स मासिक एक यादी तयार करतं. त्यात टॉप 10 मध्ये प्रियंकाचा क्रमांक लागतो. प्रियंका सांगते, "मी पुरुष अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून काम करते, भरपूर मेहनत घेते याचा मला अभिमान आहे. पण फोर्ब्सच्या यादीत स्त्रियांची नावं जास्तीत जास्त असावी, असं मला मनापासून वाटतं."

हॉलीवूड आणि बॉलिवूडमध्ये काय अंतर आहे?

प्रियंका सांगते की प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. त्याप्रमाणेच तिथं काम चालतं. पण हॉलिवूडचे लोक वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहेत, हे सांगायला ती अजिबात विसरत नाही.

दोन्ही ठिकाणी काही बऱ्यावाईट गोष्टी आहेतच.

पद्मावती वादावर बोलताना ती म्हणाली की, तिने दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साली दोघांनाही फोन करून सांगितलं की तिचा दोघांनाही पूर्ण पाठिंबा आहे.

"सगळ्यांना फक्त कलाकाराकडूनच समाजाला बदलण्याची अपेक्षा असते. पण आजकाल देशात जे काही होतं आहे, जात, धर्म, लिंग यांच्या नावावर जे ध्रुवीकरण होतं आहे, त्याबद्दल राजकारण्यांना कोणी प्रश्न का विचारत नाही?" असा सवाल ती पुढे उपस्थित करते.

सिनेमा जगतातल्या लैंगिक शोषणावर ती काय म्हणते?

प्रियंका सांगते की लोक सिनेमा जास्त बघतात असतात म्हणून त्याची चर्चा पण खूप होते. पण महिलांसोबत छळ प्रत्येक ठिकाणी होतो.

आपण आपल्या मुलांना जे शिकवतो ती आपली जबाबदारी असते. स्त्रियांचा सन्मान करतो, तोच खरा पुरुष, असंही ती सांगते.

मी पण खूप भोगलं

प्रियंका सांगते की तिला जे यश मिळालं ते सहजासहजी मिळालेलं नाही. "मला पण अनेक अडचणी आल्या. अनेकदा असं झालं आहे की मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. माझ्याजागी हिरोच्या गर्लफ्रेंडला रोल मिळाला किंवा ऐनवेळी कोणाचीतरी शिफारस आली आणि मला हटवलं, पण मी कधीही तडजोड केली नाही."

शेवटी यश हेच लोकांना दिलेलं सडेतो़ड उत्तर आहे असं मला वाटतं.

लहानपणीची एक आठवण प्रियंका सांगते, "माझ्याबरोबर लहानपणीही भेदभाव झाला होता. तेव्हा मी दहावीत होते. माझ्याबरोबरचे लोक मला 'करी' आणि 'ब्राऊनी' म्हणायचे. पण यश हे लोकांची तोंड बंद करण्याचं उत्तम साधन आहे."

'हा प्रश्न मलाच का?'

एका अमेरिकन शोसाठी काम करणाऱ्या प्रियंकाला देशाबाहेर शूटिंग करावं लागतं. त्यामुळे तिला एक प्रश्न विचारण्यात येतो, तो इथेही आलाच, की इंडस्ट्रीतून वेगळं झाल्याची भावना कधी येते का?

या प्रश्नाचं उत्तर देताना ती सांगते, "हा प्रश्न मला का विचारला जातो? माझा शेवटचा पिक्चर बाजीराव मस्तानी होता. तो 2015मध्ये आला होता, याची मला कल्पना आहे. पण ऋतिक रोशन आणि रणबीर कपूर यांचा शेवटचा पिक्चर कोणता होता, हे तुम्हाला माहिती आहे का?"

"त्यांना कोणी का विचारत नाही? त्यांना उत्तम चित्रपटांची निवड करण्याचा हक्क आहे, त्यासाठी ते हवा तितका वेळ घेऊ शकतात. त्यांना कोणी हिशोब विचारत नाही. मी सतत काम करते तरी मला हा प्रश्न का विचारल जातो?"

सगळ्यांत मोठी अचिव्हमेंट कोणती?

"आपल्या भीतीवर मात करणं, हे माझं सगळ्यांत मोठं यश आहे." प्रियंका सांगते.

"मी माझी भीती हीच माझी मोठी ताकद बनवली आहे. माझा स्वत:वर विश्वास आहे आणि तेच माझं सगळ्यांत मोठं यश आहे."

पण दु:ख तिलाही चुकलेलं नाही. "मला माझ्या वडिलांबरोबर आणखी वेळ घालवायचा होता. या गोष्टींचं मला खूप दु:ख आहे."

या कार्यक्रमात प्रियंकाने प्रेक्षकांना आपल्या यशाचे 12 मंत्र सांगितले -

  • स्वत:सारखं दुसरं कोणी नसतं. म्हणून स्वत:ला ओळखणं अत्यावश्यक आहे.
  • स्वप्नांना पंख द्या. बदलाच्या भीतीने स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या बंधनांमध्ये अडकवून घेऊ नका.
  • स्त्रियांनी महत्त्वाकांक्षी होणं अत्यंत गरजेचं आहे.
  • आपल्या स्वप्नांबद्दल निर्णय घेण्याचा हक्क कोणालाही देऊ नका.
  • अल्पसंतुष्ट राहू नका. मोठी स्वप्नं पाहा.
  • अयशस्वी होणं वाईट नाही. पण त्यानंतर पुन्हा पाय रोवून उभं राहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
  • धोके जरूर पत्करावेत पण त्याआधी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.
  • आपल्या आजूबाजूच्या लोकांची निवड काळजीपूर्वक करावी.
  • तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळे तसा प्रयत्नही करू नका
  • माणुसकी जिवंत असणं गरजेचं आहे. जर कोणी तुमच्यासाठी काही केलं असेल तर तुमचीसुद्धा जबाबदारी आहे.
  • आपण कुठून आलो आहोत ते अजिबात विसरू नका.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)